आदानप्रदान-2

आई नसलेलं माहेर
ती माहेरी पोचली तसं तिने पाहिलं, लोकांची गर्दी जमली होती..सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. दबक्या पावलांनी ती आईच्या देहाजवळ आली, सुन्न झाली होती ती..

"रडून घे बाय..रडून घे..मनात दाबू नको.."

आजूबाजूच्या बायका धाय मोकलत तिला म्हणत होत्या..

तिने एकच किंचाळी फोडली आणि आईला बिलगली. तिलाही वडील नव्हते, त्यामुळे आई एके आई हेच तिचं माहेर होतं. भावाचं नुकतंच लग्न झालं होतं त्यामुळे वहिनी घरात होती..

पंधरा दिवस उलटले, सगळे कार्यक्रम पार पडले, एकदा माहेरच्या घराकडे डोळे भरून बघत तिने निरोप घेतला.

घरी आली तसं 2-3 महिने तिला भेटायला पाहुणे सुरू राहिली..हळूहळू त्या दुःखातून ती बाहेर आली आणि आपला नित्यक्रम सुरू झाला.

मुलांच्या परीक्षा सम्पल्या, नेहमीप्रमाणे सुट्ट्या लागल्या की ती माहेरी जायची, चांगलं महिनाभर राहायची..आई आणि भाऊ तिचे सगळे लाड पुरवत. त्यात नवीन आलेली वहिनी, तिची गाऱ्हाणी करत या मायलेकी तिला तुसडेपणाने वागवत..आई होती तेव्हा वहिनी घाबरून असायची, आईचं सगळं तिला ऐकावंच लागे.. पण आता..

परिस्थिती बदलली होती, मुलांना सुट्ट्या लागल्या की आई फोन करायची..यावेळी भाऊ फोन करेल असं तिला वाटलेलं..पण त्याचा फोनच आला नाही.. आपण आई गमावली आणि माहेरपणही..ही सल तिला आता जास्तच बोचू लागली..

तिने स्वतःहून माहेरी फोन केला, वहिनीने उचलला..

नेहमी बोलण्यात धाक असलेली वहिनी आज चुरचुरू आणि मोठ्या आवाजात बोलत होती,

"बोला ताई, काय म्हणताय.."

"काही नाही, सहज फोन केलेला..दादा कुठे आहे..?"

"ते गेलेत मार्केटमध्ये... बाजरी काढलीये यावर्षी, चांगला भाव येईल असं वाटतंय.."

हे ऐकून तिला आनंद झाला, एरवी मालाला भाव मिळाला की आई हक्काने तिच्यासाठी थोडसं सोनं करून द्यायची...तिला त्याचीच आठवण झाली, आई नाही पण भाऊ करेल अशी तिला खात्री होती..

"अरेवा वहिनी, बरं झालं..चांगली कमाई होईल आता.."

"हो, यांना सांगितलं मी..आता कमाई हातात आली की मला एक राणीहार करून घ्या, दुसरं काही म्हणजे काही नक्को.."

वहिनीच्या बोलण्यातील रोख तिला समजला होता, यात वाहिनीचीच काय चूक म्हणा..गेली कित्येक वर्षे तिला एकटं पाडून आम्ही मायलेकी तिचे गाऱ्हाणे करत राहिलो...तिला तुसड्यासारखं वागवत राहिलो...आज तिची वेळ आहे तर ती का गप बसेल?

तिला कळून चुकलं, की आता आपलं माहेर संपलं..

वहिनीने बोलण्यातून एकाही शब्दाने घरी या म्हणून म्हटलं नाही..काहीवेळाने भाऊ बोलला, त्यालाही बहिणीला बोलवावं असं वाटलं नाही..

"शेवटी प्रत्येकाला आपला संसार प्यारा असतो.."

असं म्हणत तिने स्वतःची समजूत काढली...

क्रमशः

🎭 Series Post

View all