Login

कनिका... एक बदल जीवनाचा भाग ३

आपल्या आत्मसन्मानासाठी एका मुलीने तिच्या स्वभावात केलेला बदल.
“माझ्यामुळे काही झालं का?” त्याने पुन्हा प्रश्न केला.

आत्ता पुढें,

“हो! तुझ्यामुळे!” पहिल्यांदा कनिकाचा रागीट स्वर त्याने ऐकला.

“मग सांग… मी काय केलं?” त्याने तितक्यात शांतपणे तिला विचारले.

“लोक बोलतात. गावात चर्चा आहे. माझ्याबद्दल. तुझ्याबद्दल. मला वाईट वाटतं.” कनिकाने उत्तर दिले.


“लोकांचं काम बोलणं. आपण चुकीचं काही करत नाही. पण तुला त्रास होत असेल तर मी अंतर ठेवेन.” वेदांत शांतपणे समजावण्याच्या स्वरात म्हणाला.


“आज नाही समजत, पण कधीतरी सगळ्यांना कळेल मी चुकीची नाही.” कनिका आपले डोळे पुसत म्हणाली. त्या दिवसापासून कनिका थोडी अबोल झाली, निरुत्साही, थोडी शांत. कॉलेजमध्ये कोणासोबतही जास्त बोलत नव्हती. पण जेव्हा आपली आई आपला आधार बनून आपल्या मागे उभी आहे त्या गोष्टीचं आपणही सार्थक केले पाहिजे या विचाराने तिने जोमाने अभ्यास केला. खूप मेहनत घेतली आणि बारावीची परीक्षा दिली,  बारावीचा निकाल लागला. गावामध्ये सगळ्यात जास्त मार्क मिळवून पहिल्या नंबरने कनिका पास झाली.

रिझल्ट लागल्यानंतर शाळेकडून आणि गावाकडून तिचे खूप अभिनंदन करण्यात आले , तिचे कौतुकही झाले...

“अरे मार्क मिळाले म्हणजे काय! संस्कार शाबूत राहिले पाहिजेत.” मंगला काकू तरीही वाकड तोंड करत म्हणाल्या. पण आता… त्या शांत मुलीत काहीतरी बदलत होतं.

कॉलेज संपलं, कनिका शहरात पुढे शिकायला जायला तयार झाली त्यामुळे तिचे आई-वडीलही तिच्यावर खूप खुश होते.

“मुलगी शहरात राहणार? हॉस्टेल मध्ये? काय गरज? मुलीचं शिक्षण इतकं कशाला?” मंगला काकूंना तिची होणारी प्रगती अजिबात बघवत नव्हती.

’  ही जर आपल्या मुलींच्या पुढे गेली त्यांच्यापेक्षा हुशारीने आपल्या शिक्षण पूर्ण केले तर... ’ अशी भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली म्हणून ते तिला शहरात जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करू लागले.

“काकू, तुम्हाला वाटतं मी काही चुकीचं करणार? किंवा तुमचं घर बदनाम होणार? मला सांगा, मी शिकायला जाऊ नये?” कनिका ने यावेळी पहिल्यांदाच पुढे उभा राहून त्यांना प्रश्न केला.

काकू थबकली.

“इतकं वर्ष मी शांत राहिले. कुणाला उत्तर नाही देत. पण आता माझं आयुष्य आहे. मी शिकणार, पुढे जाणार.” कनिका म्हणाली. यावेळी पण तिचे आई-वडील तिच्या बाजूने उभे होते. काकूला मात्र काय बोलावे ते समजले नाही त्या कुरकुर करतच तिकडून निघून गेल्या.

’ कनिकाला काय झालं ? ही तर नेहमी शांत होती! आज चांगलाच बोलली." काकू आपल्या खोलीमध्ये बसून विचार करू लागल्या. कणिकाने पहिल्यांदा स्वतःसाठी आवाज उठवला होता.

कनिका नागपूर शहरात राहायला आली. छोटं PG , तिच्या रूममध्ये तिच्यासोबत अजून दोन मुली राहत होत्या. वेदांत ही त्याच शहरात होता.

“मदत लागली तर सांग. इथे शहर वेगळं आहे.”  वेदांत  कुठलीही अपेक्षा न ठेवता तिला म्हणाला.

“मला माझं करायचंय. मी स्वतः पुरेशी आहे.” कनिकाने उत्तर दिले.

ती खरोखर बदलत होती. कनिकाच्या वर्गात मुलं मुली तिच्या शांत डोळ्यातल्या क्षणपणा पाहू लागल्या. ती फक्त अभ्यासू नव्हती, वक्तृत्व, लेखन,  प्रस्तुतिकरण यामध्येही आता सराईत होत गेली.


To be continued...
0

🎭 Series Post

View all