Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ९

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल...
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ९

श्रेयसा गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती.. तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले.

’ हा तोच मुलगा आहे ना.. ज्याने मला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं होतं की त्याला हे नातच नको आहे ? मी ही या नात्याबद्दल ठाम होते... मग आज अचानक याच्या वागण्यामध्ये दिसणारा हा बदल ! माझ्या मनामध्ये अस्थिरता का निर्माण करत आहे? ’ तिचे मन तिलाच प्रश्न विचारत होते आणि त्या प्रश्नावर स्वतःच उत्तर शोधत होते...

आर्य ने तिचा हात अलगद धरला आणि तिला तिकडे असलेल्या डायनिंग टेबलवर बसवले. प्रथमच त्याचा काळजीने भरलेला स्पर्श तिला जाणवला. त्याच्या स्पर्शाने आपल्या पोटामध्ये असंख्य फुलपाखरे का उडतात हेही तिला समजत नव्हते.

रेवतीने जेवण बाहेर डायनिंग टेबलवर मांडायला सांगितले आणि सगळेजण जेवायला बसले.

" सुनबाई , तुमच्या हाताला खरंच खूप चव आहे.. पण स्वतःची ही काळजी घेत जावा. " आर्य राज जेवण करत असताना तिच्याकडे पाहून काळजीने म्हणाले.

" हो... " श्रेयसा

" श्रेया, तुला हाताने जेवायला जमणार आहे का ? " आर्यव्रत तिच्या हाताकडे पहात म्हणाला.

" हो.. " श्रेयसा ला त्याच्या वागण्याचे त्याच्या मनामध्ये असलेल्या काळजीचे खरच खूप आश्चर्य वाटत होते.

" नाही जमत असेल तर सांग... आर्य तुला जेवण भरवेल. फक्त लग्नामध्येच घास भरवला पाहिजे असं काही नियम नाही बर का... अगदी रोज जरी नवऱ्याच्या हाताने जेवायला मिळाले तरी भाग्यच म्हणायचं.. " रेवती मात्र दोघांचीही छान मजा घेत होती. आपल्या मुलांची लग्न आपण जबरदस्तीने लावून दिले आहे त्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये काही अडचण तर येणार नाही ना ते दोघेही एकमेकांसोबत जोडले गेलेले हे अनिश्चित बंधन... व्यवस्थित निभवतील ना ? रेवती च्या मनामध्ये काळजी होती परंतु ती कोणाला बोलवून दाखवत नव्हती , पण आज आर्य च्या मनामध्ये असलेली तिच्या बद्दलची काळजी पाहून रेवती ला मनापासून समाधान वाटले.

जेवण झाल्यानंतर ते दोघेपण व रूम मध्ये आले. आर्य ने पुढे होऊन स्टडी चा दरवाजा तिला ओपन करून दिला.

" तुला आत स्टडी मध्ये झोपायला जमणार आहे ना का आजच्या दिवस इकडे बाहेर बेडवर झोपतेस ? " त्याने तिच्याकडे पाहून विचारले.

" नाही... मी स्टडी मध्ये माझ्या जागेवर झोपते. तुम्ही काळजी करू नका मी ठीक आहे , फक्त थोडंसं तर लागला आहे. " श्रेयसा

" ओके... हा दरवाजाही उघडाच आहे. जर तुला कसली गरज वाटली तर मला आवाज दे,  मी इकडे बाहेरच आहे... " आर्य

श्रेयसा स्टडी रूम मध्ये असलेल्या सोफ्यावर जाऊन आराम करते परंतु मनामध्ये मात्र आर्य चे त्याच्या अशा वागण्याचे विचार चालू असतात.

’ तिच्या पोटातून आलेले रक्त पाहून माझ्या मनाला का त्रास होता ? मला तर हे नाते नको होते आणि ही गोष्ट मी तिलाही स्पष्टपणे सांगितले होती. माझ्या आई वडिलांनी जबरदस्ती बांधलेले हे अनिश्चित बंधन... मी अजूनही मनापासून स्वीकारले नाही , पण तरीही तिला त्रासामध्ये पाहून माझ्या मनालाही काय त्रास होत होता ? ती माझ्यासोबत लग्न करून या घरात आली आहे म्हणून की माझी जबाबदारी आहे आणि हे माझं कर्तव्य आहे म्हणून कदाचित मला असे वाटले असेल.. ’ आर्य स्वतःच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांना आवर घालत सोयीस्कर असा अर्थ लावून मोकळा झाला.

ते दोघेही या नात्याबद्दल एकमेकांबद्दल विचार करत तसेच रात्री झोपी गेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी श्रेयसा बऱ्यापैकी व्यवस्थित होती आणि तिच्या हातचे दुखणे ही कमी झाले होते. आर्य ने एक दोनदा तिला विचारले,  तिनेही नॉर्मली उत्तर दिले. असेच पुढचे दोन-तीन दिवस निघून गेले.

" ते sss मला माझ्या घरी जायचे होते. माझ्या कॉलेजची पुस्तक आणि काही डॉक्युमेंट्स तिकडे घरीच आहेत.  दोन दिवसांनी माझे कॉलेज चालू होणार आहे. " श्रेयसा ने रात्री जेवणाच्या वेळी विषय काढला.

" ठीक आहे. तुम्ही दोघेही असे करता का उद्या सकाळी आर्य तू श्रेयसा ला तिच्या माहेरी घेऊन जा... " रेवती ने आर्य कडे पाहून त्याला विचारले.

" मी sss का? " आर्य वैतागलेल्या स्वरात आपल्या आईकडे पाहून म्हणाला.

" अरे, तू त्या घरचा जावई आहे. लग्न झाल्यापासून तू एकदाही त्या घरी गेला नाही. आपल्याकडे मांडव परतावणी ची रीत असते परंतु तुमच्या दोघांचे लग्न ज्या पद्धतीने झाले आहे , आम्ही लग्नानंतरच्या कोणत्याही विधी केल्या नाहीत. असेही तिला तिच्या कामासाठी जायचे आहे त्यानिमित्ताने ही एक विधी तरी पूर्ण होईल.. त्यांनाही असे वाटत असेल ना की,  त्यांच्या जावयाने त्यांच्या घरी यावे त्यांच्यासोबत वेळ घालवावा. " रेवती त्या दोघांकडे पाहून समजावण्याच्या स्वरात म्हणाल्या.

" पण माझा ऑफिस आहे... " आर्य

" एक दिवस सुट्टी सांगा,  काही बिघडत नाही... " आर्यराज मध्यस्थी करत म्हणाले.

" ठीक आहे. " आपल्या आई वडिलां पुढे या आधी तरी आपलं काही चाललं आहे का जे आता चालेल. असा विचार करून नकारार्थी मान हलवतच त्यांनी होकार दिला आणि तिकडून उठून आपल्या रूममध्ये निघून गेला.

" श्रेयसा... खरंतर तुला काही दिवस तिकडे राहायला पाठवले पाहिजे पण आता उद्या आर्य तुझ्यासोबत येणार आहे तर मग तुम्ही संध्याकाळी परत घरी या. नंतर पाहिजे तर तुझ्या आईला विचारून तू काही दिवस तिकडे राहायला गेली तरी चालेल.. " रेवती म्हणाली.

" हो... चालेल " श्रेयसा

" मी सुरभी ताईंना फोन करून तशी कल्पना देतो... " रेवती बोलत तिकडून निघून जातात.

श्रेयसा आपल्या माहेरी जाणार म्हणून खुश असते. ती त्या आनंदानेच वर रूम मध्ये निघून येते. रूम मध्ये आर्य  चिडचिड करत आपल्या वस्तू इकडून तिकडे ठेवत होता. ती रूम मध्ये आली आहे याकडेही त्याचं लक्ष नव्हते. तो आपल्याच धुंदीमध्ये हळू आवाजात काहीतरी बडबड करत त्याचं काम करत होता. ती येऊन बाजूला सोफ्यावर बसली.

" सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला उद्या तुमच्या ऑफिसला सुट्टी घ्यावी लागत आहे ना.. तुम्हाला जमत नसेल तर सांगा,  मी बोलते तुमच्या आई सोबत. तसेही माझे घर कुठे लांब आहे. मी एकटी ही जाऊ शकते. " श्रेयसा हळू आवाजात त्याला विचारते.

" असे काही नाही. मी घेईल उद्या सुट्टी. " आर्यव्रत शांत स्वरात म्हणाला.

" ऑफिस मध्ये काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना ? तुम्हाला माझ्या घरी यायला आवडेल ना ? " श्रेयसा

" नाही होणार... आई म्हणाली होती ना,  त्या लग्नानंतरच्या विधी असतात आणि तसेही आपल्या दोघांचेही लग्न जबरदस्तीने झाले आहे....  तरीही तू तुझी कर्तव्य अगदी व्यवस्थित निभवत आहे,  मग मलाही माझे कर्तव्य निभवायला पाहिजे ना... " आर्यव्रत

" थँक्यू.. मग आता लवकर झोपा,  उद्या सकाळी आपल्याला लवकरच घरी जायचं आहे.  " श्रेयसा हसून त्याच्याकडे पाहून म्हणाली आणि स्टडी रूमच्या दिशेने निघून गेली.

आर्यव्रत ची ही थोड्या वेळापूर्वी होणारी चिडचिड अचानक शांत झाली आणि तो ही शांत पने आपल्या बेड वर झोपला. तिच्या हसून बोलण्याने ही आपला राग शांत झाला, या गोष्टीचे त्यालाही आश्चर्य वाटू लागले. आज तो दोघेही आपापल्या जागेवर झोपले होते , पण दोघांच्याही मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची प्रसन्नता निर्माण झाली होती...


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all