Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग २

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल.
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग २

दोन्ही गावांमध्ये लग्नाचे अगदी उत्साहाचे असे वातावरण होते. श्रीमंत घराण्याचे लग्न म्हणजे यांचा थाट ही अगदी तसाच दिसून येत होता. दोन्ही गावाच्या मधोमध असलेल्या मोठ्या पटांगणात लग्न करण्याचे ठरवले होते, तसे त्या अंगणाला सजवण्यात आले. मोठा च मोठा भव्य असा मंडप तिकडे उभारण्यात आला. एका बाजूला मोठा असा स्टेज उभा करण्यात आला आणि त्याच्या भोवतीने गावकऱ्यांना बसण्यासाठी हजारो खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या.

गावातील प्रत्येकाला या लग्नासाठी निमंत्रण देण्यात आले होते. गावचे पंच येऊन तिकडे बसले होते. दोन्ही गावांमध्ये आज चुल जळणार नाही असे आधीच सांगण्यात आले होते सगळ्यांसाठी जेवण या लग्ना मध्येच असणार होते त्यामुळे गावकरीही या लग्नासाठी खूप खुश होते. आज हे लग्न झाल्यामुळे गावालाही शांतीचे वातावरण लाभणार होते...

गावातील सगळे मंडळी छान पैकी तयारी करून त्या लग्नाला उपस्थित झाले होते आता फक्त नवरा नवरीच्या येण्याची सगळे वाट पाहत होते...

आदित्य राज यांनी आपल्या घरापासून ते मंडपा पर्यंत जाणाऱ्या रस्त्यामध्ये वराती चे आगमन केले होते. मोठमोठ्या आवाजात बँड फटाके वाजवत आर्यव्रत यांची वरात लग्नासाठी निघाली होती. आर्यराज राजेशाही शेरवानी घालून अगदी रुबाबात तयार झाले होते आणि त्यांची बायको रेवती ने ही अगदी घरंदाज पद्धतीने सगळा साजशृंगार केला होता..

आर्यव्रत ने लग्नासाठी चंदेरी रंगाची शेरवानी घातली होती आणि त्यावर पिवळ्या रंगाचा फेटा बांधला होता. त्याच्या वडिलांनी खास त्याच्यासाठी ही शेरवानी फार कमी वेळात तिकडच्या महागड्या डिझायनर कडून बनवून घेतली होती. त्यांच्या गळ्यात मोत्याची माळ ही घालायला दिलेली... एका हातामध्ये ब्रँडेड घड्याळ तर दुसऱ्या हातामध्ये हीरेजडित ब्रेसलेट घातले होते.

आर्यव्रत आधीपासूनच दिसायला राजबिंड होता आणि या पोशाखामध्ये तर अगदी रुबाबात उठून दिसत होता. सगळं काही अगदी व्यवस्थित होतं परंतु त्यांच्या चेहऱ्यावर मात्र जरा सुद्धा आनंद दिसून येत नव्हता.

त्यांची वरात आधी गावाच्या कुलदेवताच्या मंदिरामध्ये गेली. तिकडे सगळ्यांनी पाया पडल्या. आर्यव्रत यांच्या हाताने कुलदेवतेची आरती करण्यात आली. त्यानंतर शांत चेहऱ्याने ते लग्न मंडपाच्या दिशेने जात होते. ते त्यांच्या गाडीमध्ये बसले होते. त्यांच्या बाजूला त्यांची आई रेवती आणि पुढे ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचे वडील बसले होते. गाडीच्या मागेपुढे सगळीकडे पाहुणेमंडळीनी  ढोल ताशांचा ताल धरला होता. वाजत गाजत वरात मंडपाच्या दिशेने निघाली होती.

गावामध्ये लग्न असल्याकारणाने लग्न अगदी पारंपारिक पद्धतीने करण्यात येणार होते त्यामुळे श्रेयसा ने पिवळ्या रंगाची त्याला हिरवा काठ असलेली नऊवारी साडी नेसली होती. तिचा मेकअप करण्यासाठी दोन मुलींना बोलावण्यात आले होते. पुढच्या केसाची छान हेअर स्टाईल करून मागे अंबाडा बांधण्यात आला होता. केसांना गजऱ्यांनी छान सजवण्यात आले होते. चेहऱ्यावर हलका सा मेकअप करण्यात आला होता. गळ्यामध्ये सोन्याचा नेकलेस, राणी हार, माथ्यावर नाजूकशी सोन्याची बिंदी, कानामध्ये त्याला मॅचिंग असे कानातले झुमके, हातामध्ये हिरव्या बांगड्यांच्या मागेपुढे सोन्याच्या बांगड्या, कमरेवर सोन्याचा कमरपट्टा, नाकामध्ये सोन्याच्या तारामध्ये जडलेल्या मोत्यांची नथ आणि पायामध्ये देखील सोन्याचे पैंजण घालून तिला अगदी सोन्याने पिवळी केली होती.

श्रेयसा ने एकदा स्वतःला आरशामध्ये पाहिले. आज ती खूपच सुंदर दिसत होती, पण ज्या लग्नासाठी तिने एवढी तयारी केली होती ते लग्न जबरदस्तीचे होतं.... तिच्या मनाविरुद्ध!

आपल्या आई वडिलांचा मान राखण्यासाठीच ती आज लग्नासाठी तयार झाली होती. शरीराने ती तयार होती पण मन मात्र अजिबात या गोष्टीसाठी तयार नव्हते.

" या नवरीच्या रूपामध्ये आमची मुलगी खरंच किती सुंदर दिसत आहे ना...  " तिला तिच्या मैत्रिणी रूम मधून खाली घेऊन येत असताना श्रीकांत यांची तिच्यावर नजर जाते आणि एक बापाचे काळीज भरून येते.

" कपड्यांनी आणि दागिन्यांनी तर ती सुंदर दिसत आहे परंतु चेहऱ्यावर जो आनंद दिसायला पाहिजे तो नाही. " सुरभी हळव्या स्वरात आपल्या मुलीकडे पाहून म्हणाली.

" आता हा विषय काढून आम्ही किती वाईट बाप आहे असे दाखवून देण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही जे काय केले आहे ते गावाच्या भल्यासाठी केले आहे आणि यामुळे आमच्या लेकीला ही चांगले सासर मिळाले आहे... इनामदार घराणे खूप प्रतिष्ठित आहे... ते आपल्या लेकीची काळजी नीट घेतील आणि तसेही आपण कुठे लांब राहत नाही.. जेव्हा पण आपल्या लेकीला आपली गरज असेल आपण तिच्याजवळ हजर असू. " श्रीकांत आपल्या लेकीकडे पाहून शांत स्वरात म्हणाले.

" ते सगळं खरं आहे पण असे स्वतःच्या मनाविरुद्ध झालेल्या लग्न ती कसे निभवणार ? " एका आईचं काळीज आपल्या लेकीच्या संसाराची काळजी करत होत.

" जसे तुम्ही निभवल ! गावातील सगळ्या बायका आजपर्यंत निभवात आल्या आहे. तसे आपली लेकही निभावून घेईल. शेवटी त्यांच्या अंगात ही आपले संस्कार आहेत,  आपलं रक्त आहे. " श्रीकांत आपल्या रुबाबात उत्तर देऊन मोकळे होतात.

श्रेयसा त्या दोघांच्या जवळ येऊन उभी राहते. सुरभी तिला घेऊन आधी घरातल्या मंदिरामध्ये जाते. मंदिरात तिच्या हाताने हळदी कुंकू लावून दिवा लावून देवाला मनापासून नमस्कार करायला सांगते.

’ देवा! आज मी माझ्या घरच्यांसाठी हे अनिश्चित बंधन स्वीकारायला तयार झाले आहे , पण हे निभवात असताना मला तुझ्या आशीर्वादाची गरज लागणार आहे. प्रश्न माझ्या आई-वडिलांच्या मानसन्मानाचा आहे त्यामुळे माझ्याकडून असे काही होणार नाही की माझ्या आई-वडिलांना खाली मान घालावी लागेल असा मला आशीर्वाद दे. ’ श्रेयसा मनातून देवाला साकडं घालू लागते.

घरातल्या देवाची पूजा झाल्यानंतर त्यांची गाडी गावातील कुलदेवतेच्या मंदिराजवळ जाते. तिकडून पाया पडून त्यांची गाडी सरळ मंडपाच्या दिशेने जाऊ लागते. श्रेयसा गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत असते. आज मात्र तिला बाहेरच वातावरण, बाहेर दिसणारा निसर्ग सगळं काही तिच्यासाठी अनोळखी वाटू लागते.

’ आज पासून तिला एका अनोळखी वळणावर अनोळखी व्यक्ती सोबत चालायचे आहे. जणू हा निसर्ग तिला याच गोष्टीची साक्ष देत आहे असे वाटत असते. ’

" आर्यव्रत... ” श्रेयसा हलकेच हळू आवाजात त्याचं नाव घेते. गावातील इनामदाराचा हा मुलगा आहे. त्याचा स्वभाव आणि वागणूक याबद्दल थोडेफार गावातल्या लोकांकडून माहीत असते.
एक-दोन वेळा गावांमध्ये फिरत असताना त्या दोघांचाही आमना सामना झाला होता परंतु त्यांनी कधी एकमेकांना एवढ जवळून आणि निरखून पाहिले नव्हते कारण तशी कधी वेळच आली नव्हती.

आज मात्र अशाच एका अनोळखी व्यक्ती सोबत अनिश्चित बंधन मध्ये बंधण्याची वेळ त्या दोघांवर आली होती... लग्न!

आज त्या दोघांचेही लग्न होते.


क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.

0

🎭 Series Post

View all