Login

अनिश्चित बंधन... लग्न! भाग ४

आर्यव्रत आणि श्रेयसा यांना स्वीकारावे लागलेले हे जबरदस्तीचे बंधन, या दोघांच्या नात्याला कोणते नवे रूप देईल.
डिसेंबर जानेवारी 2025– 26
दीर्घ कथालेखन स्पर्धा.

अनिश्चित बंधन... लग्न!  भाग ४

आर्यव्रत गाडीमधून उतरला आणि आपल्या वडिलांच्या बाजूला येऊन उभा राहिला. रेवती आरतीची थाळी घेऊन दारामध्ये उभी होती. आर्यराज या दोघांना दरवाज्याच्या जवळ घेऊन एकमेकांच्या बाजूला उभे राहायला सांगतात. दोघे अगदी जबरदस्तीने एकमेकांच्या बाजूला उभे असतात.

रेवती हळद-कुंकू लावून श्रेयसा चे औक्षण करते... सोबत आपल्या मुलालाही ओवाळते. श्रेयसा आपल्या उजव्या पायाने तांदळाने भरलेल्या कलश ला हलकच स्पर्श करून पाडते आणि गृहप्रवेश करते. रेवती तिच्यासमोर कुंकवाच्या पाण्याने भरलेली थाळी धरते. ती थाळी मध्ये आपले दोन्ही हात बुडवून मुख्य द्वारावर ती आपल्या हाताचे ठसे उमटवते.

" सुनबाई , आज पासून ते तुमचं घर आहे. आजच्या दिवस तुम्ही इकडे खालच्या रूममध्ये आराम करा. उद्या आपल्या घरी सत्यनारायण पूजा आहे. " रेवती तिच्याकडे पाहून म्हणाली.

" हो.. " श्रेयसा ला तिकडे सगळ्यांसोबत बसण्याची अजिबात इच्छा नव्हती तशी ती पटकन उठून त्या रूम मधे निघून गेली. रेवती ने आपल्या घरातल्या काम करणाऱ्या माणसांकडून तिची बॅग आधीच त्या रूममध्ये पोहोचवलेली असते.

’ हे माझं घर. मला आता कायम या घरात राहायचे आहे. नो sss अजून या घरात येऊन मला काही क्षणही झाले नाही, तरी ही मला सहन होत नाही. पूर्ण आयुष्य मी या घरामध्ये कसे काढणार आहे. ’ श्रेयसा तिकडे असलेल्या बेडवर बसून मनामध्ये विचार करू लागते.

तिच्यासाठी ती जागा नवीन असल्यामुळे रात्रभर तिला व्यवस्थित झोप लागत नाही पहाटे कधी तरी तिचा डोळा लागतो.

" सुनबाई... " तिच्या कानावर रेवतीचा आवाज पडतो तशी ती डोळे किलकिले करत उघडून समोर पाहू लागते.

" काही त्रास होत आहे का ? झोप नीट झाली ना ? " रेवती काळजीने तिच्या चेहऱ्याकडे पाहून विचारते.

" हो... " श्रेयसा

" ते गुरुजींचा फोन आला होता.  ते काही वेळातच आपल्या घरी पोहोचतील. त्या आधी तुमची तयारी झाली पाहिजे ना. आज तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे ना. " रेवती

" हो... सॉरी sss ते नवीन जागा असल्यामुळे रात्री झोपायला उशीर झाला आणि सकाळी जाग आली नाही, पण मी यापुढे लक्षात ठेवेन. " श्रेयसा दिलगिरी व्यक्त करत आजूबाजूला पाहात म्हणाली.

" काही हरकत नाही. मी हे विचारायला आले होते की तुला सकाळी उठल्यावर चहा आवडतो की कॉफी म्हणजे तसं बनवायला. आज पूजा होईपर्यंत तुमच्या दोघांचाही उपास असणार आहे मग उपासाची खिचडी पाठवू का ? " रेवती

" नाही नको... मी फक्त कॉफी घेईन. " श्रेयसा

" ठीक आहे. तयारी कर तोपर्यंत मी गरम कॉफी बनवून पाठवते आणि हो तुझे आई वडीलही काही वेळात पोहोचतील. थोड्या वेळापूर्वीच त्यांना फोन केला होता. " रेवती बोलून तिकडून निघून जाते.

श्रेयसा आपली बॅग उघडून त्यामध्ये असलेली एक छानशी साडी, दागिने बाहेर काढते आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये निघून जाते. काही वेळातच श्रेयसा फ्रेश होऊन बाहेर येते. सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे छान काटापदराची साडी नेसून ती तयार होते.

" हे घ्या काकीने तुमच्यासाठी गरम कॉफी पाठवली आहे. मी तुमची काही मदत करू का ? " तेवढ्यात एक मुलगी बारा-तेरा वर्षाची हसतमुखाने तिच्या रूममध्ये येऊन तिला विचारते.

" नाही. बस फक्त इकडे माझ्यासोबत. " श्रेयसा हसून तिला उत्तर देते.

" माझे नाव आरोही... " आरोही

" माझे नाव श्रेयसा. तू इकडेच राहतेस का ? " श्रेयसा

" नाही. मी दादाच्या चुलत काकांची मुलगी आहे. माझे बाबा प्रोफेसर आहेत. ते दुसऱ्या गावामध्ये कॉलेज ला प्रोफेसर असल्यामुळे आम्ही तिकडेच राहतो. कधीतरी अधून मधून इकडे येत असतो. " आरोही

श्रेयसा तिच्यासोबत बोलतच आपली सगळी तयारी करून घेते. आरोही दोघींसाठी कॉफी घेऊन आलेली असते,  त्या दोघी पण एकत्र बसून कॉफी पितात. श्रेयसाला आता कुठे तिच्या सोबत बोलत असताना थोडे बरे वाटते. त्या दोघी कॉलेज बद्दलच्या गप्पा मारत बसलेले असतात.

" सुनबाई , खूप छान तयारी केली हो. खूपच सुंदर दिसत आहेस. " रेवती रूम मध्ये येत असताना तिच्याकडे पाहून कौतुकाने म्हणाली.

" थँक्यू.. " श्रेयसा

" गुरुजींनी पूजेची सगळी मांडणी केली आहे. सगळी पाहुणे मंडळीही आली आहे. तुम्हा दोघांनाही बाहेर बोलवले आहे. " रेवती

" हो... " श्रेयसा बोलून जागेवरून उठून उभी राहते आणि आपला पदार हलकाच डोक्यावर घेते.

" असे पदर डोक्यावर घेण्याची काही गरज नाही. या सगळ्या जुन्या रीती परंपरा आहेत या तुला पळायला पाहिजे असे काही नाही. " रेवती मायेने तिच्याकडे पाहून तिचा पदर दुसऱ्या हातामध्ये देत म्हणाली. आपल्या सासूमध्ये असलेली समजदारी पाहून श्रेयसा ला थोडे बरे वाटले.

त्या तिघी पण तिकडून बाहेर आल्या. आरोही आणि रेवती त्या दोघींनी तिला पूजेच्या पाटावर नेऊन व्यवस्थित बसवले. श्रेयसा मनापासून आपले दोन्ही हात जोडून डोळे बंद करून देवाला नमन करत होती. बंद डोळ्याच्या आडूनच तिला आपल्या बाजूला कोणीतरी येऊन बसल्याची जाणीव झाली परंतु तिने डोळे उघडून बाजूला पाहिले नाही.

आर्यव्रत ही पूजेसाठी सिम्पल असा कुरता पायजमा घालून आला होता आणि तिच्या बाजूला येऊन बसला होता. गुरुजींनी पूजेला सुरुवात केली. श्रीकांत आणि सुरभी दोघेपण येऊन मागे बसले होते. रेवती आणि आदित्य राज ते त्यांच्या सोबतच होते. आजही सत्यनारायणाच्या पूजेसाठी गावातील खूप सारी मंडळी उपस्थित होती. आजही या पूजेच्या निमित्ताने श्रीकांत यांनी संपूर्ण गावासाठी गाव जेवण आयोजित केले होते.

पूजेचे विधी करत असताना हलकास त्या दोघांच्याही हाताचा एकमेकांना स्पर्श होत असताना अचानक त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होत होत्या परंतु त्या दोघांनीही एकमेकांकडे नजर वर करून पाहण्याचा विचार केला नाही.


" पूजा संपन्न झाली. " गुरुजींनी अखेर सगळ्यांकडे पाहून सांगितले. त्या दोघांनाही गुरुजींनी मनापासून देवाच्या पाया पडायला सांगितल्या. रेवती पुढे आली आणि तिने त्या दोघांनाही गुरुजींच्या पाया पडायला सांगितल्या.

पुन्हा एकदा आपल्या वडीलधाऱ्या लोकांच्या आणि गावातील प्रतिष्ठित लोकांच्या ते दोघेही मिळून जोडीने पाया पडत होते.

" रेवती,  सुनबाई थकल्या असतील...  त्यांना आतल्या खोलीमध्ये जाऊन थोडा वेळ आराम करू दे...  त्यांच्या आईलाही तिकडेच घेऊन जा... दोघींना व्यवस्थित भेटता येईल... " श्रीकांत पाहुण्यांची गर्दी काही कमी होत नाही हे पाहून हळू आवाजात म्हणाले.

" चला सुनबाई. " ते दोघेही एकत्रच उभे होते परंतु त्यांनी एकमेकांकडे पाहिले नव्हते अचानक रेवती श्रेयसा जवळ येऊन तिला आतल्या खोलीमध्ये घेऊन गेली आणि श्रीकांत आपल्या मुलाजवळ उभे राहून सगळ्या गावकऱ्यांना भेटत होते.

" कशी आहेस बाळा? " रेवती तिला सोडून परत बाहेर आली. तिकडे सुरभी बसली होती ती मायेने आपल्या मुलीच्या जवळ येऊन तिला विचारू लागली.

" ठीक आहे. " श्रेयसा ने गंभीर आवाजात उत्तर दिले.

" घरातले सगळे ठीक आहेत ना ? तुझे सासू सासरे आणि नवरा मुलगा ? " तिच्या आईने काळजीपोटी विचारले. एकच दिवस तर झाला होता आपल्या मुलीला आपल्या नजरे पासून दूर करून तरीही तिची खूप काळजी वाटत होती.

" आई आता फक्त एकच दिवस झाला आहे मला इकडे येऊन. एका दिवसात मी कसे काय सांगू शकते आणि ज्या नवऱ्या मुलाविषयी तू बोलत आहेस ना त्याला अजून मी धड बघितलेही नाही आणि अशा मुलासोबत मला माझं पूर्ण आयुष्य काढायचे आहे. " श्रेयसा च्या आवाजात असलेला राग स्पष्टपणे समजतो.

क्रमशः

" सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फोलो सेटिंग मध्ये जाऊन " favourite" ऑप्शन घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.


0

🎭 Series Post

View all