Login

कथामालिका

कथामालिका


डोळयात वाच माझ्या..1


    " अग कमल... अशी कोण राजकुमारी मिळणार आहे मग तूझ्या लेकाला.. आता पर्यंत कमी मुली पाहिल्या का?? सगळी कडूनच नकार येतो ना..? असं अडून बसलात तर बायको मिळणार कशी त्याला..?"

  " म्हणून काय अशी मुलगी रमा ताई?? अग माझ्या मुलात काय कमी आहे ग? धडधाकट आहे.. घर दार आहे.. दुकान सांभाळतो.. खाऊन पिऊन सुखी आहोत.. अजून काय पाहिजे एका मुलीला संसारासाठी.. पण नाही.. सगळी कडून नकार च येतो.."

  "तेच म्हणतेय ना मी.. अग अर्जुन चांगलाच आहे.. पण आपल्या खेड्यातल्या मुलींना ही हल्ली चांगला शिकलेला, शहरात नोकरी करणारा,स्वतः चा फ्लॅट असणारा , स्वतः ची गाडी असणारा नवरा हवा असतो.. त्यात आपण खेड्यात राहणारे.. अर्जुन फक्त सातवी शिकलेला.. लहान बहिणीची जबाबदारी, तीचे शिक्षणं, लग्न.. अग मुलांना नवऱ्याचे आई वडील नको असतात जवळ.. तिथे नणंद कोण खपवून घेणार? ती ही अविवाहित?"

   "हम्म.. गरीबातल्या गरीब मुलीने पण लग्ना नंतर वेगळा राहण्याच्या अटीवर लग्न करायला तयार असल्याचे सांगितले.. मी पण म्हटले होतें त्याला..तू रहा इथे..मी आणि अनु राहतो दुसऱ्या खोलीत..पण आपला अर्जून तर काय? एक वेळ बिन लग्नाचा राहीन पण तुमच्या पासून एक दिवस ही दूर नाही... ज्या मुलीला माझी आई, बहीण सोबत नको अशा मुलीशी मीच लग्न करणार नाही. असे म्हणून तोंडावर नाही म्हणतो.." कमल बाई पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या.

      "मग काय करावं त्यानें! आपण एवढे खस्ता खाऊन मुलांना वाढवतो ते काय अशा मुलींसाठी.. की त्यांनी अचानक आयुष्यात यावं आणि आपल्याला तांदळा तल्या खड्यासारखे बाजूला काढावे.. अग.. चार वर्ष झाले आपण प्रयत्न करतोय ना.. आता तर लग्नाचे वय ही निघून चालले.. यावर्षी एकतीस चा झाला अर्जुन.. आपल्या कडे गावात चोवीस पंचवीस ची झाली की लग्न होतात मुलांची... तरी बरं आपल गाव तालुक्याचं आहे. बऱ्यापैकी पुढारलेल आहे.. कोणी कोणामध्ये लक्ष घालत नाही.. तरी आडून आडून बोलतातच ना ओळखितले.."

  " हो पण ती.. ती मुलगी बावीस ची आहे.. तसे ही एवढे नऊ वर्षांचे अंतर दोघात..?"

  " मग काय झालं? आपल्या वेळी तर दहा बारा वर्षांनी लहान असायची बायको.. झालेच ना संसार? आत्ता उगाच नाटक मुलींची.. वयात अंतर नको म्हणून... बघ बाई तू.. एवढी सुंदर शिकलेली मुलगी चालून येतेय घरात.. तर तुमचं आपल काही तरीच... नाहीतरी सातवी शिकलेल्या मुलाला ग्रॅज्यूएट मुलगी मिळेल तरी का? शिवाय हुशार.. बास थोडस व्यंग आहे.. म्हणून तीचे लग्न होत नाहीये.. त्यामुळे तीचे आई बाबा तयार आहेत द्यायला. त्यांना फक्त मुलगा निर्व्यसनी आणि घरा दाराला सांभाळून घेणारा हवाय.. त्यांची मुलगी अशी अबोल म्हणून ते तयार आहेत ना? आणि बरेच आहे की, तुम्ही जे बोलाल ते निमूट ऐकून घेईल.. उलट बोलणार ही नाही.."

   "अग रमा ताई, अबोल काय? मुकी आहे मुलगी..? थोडे दिवस ठीक आहे. आयुष्यभर अशा मुली सोबत कसा संसार करणार माझा मुलगा.."

   "अग मग काय झाले? मुलीला बोलता येत नाही , पण तिला ऐकू येते.. लिहिता वाचता येते.. आणि संसारासाठी शब्दांची काय आवश्यकता? एकत्र राहिले की फुलेल त्यांचाही संसार.."

  "अग हो.. पण त्याला हवे नको ते कळेल का तिला? आणि तिचे काय? तिला काय हवेय हे सांगू शकेल का ती त्याला?"

    "अग मन जुळली की नजरेची भाषा कामाला येते. बोलायची काय गरज? आणि अगदीच नाही कळले तरी ती लिहून दाखवू शकते... नोकरी मिळवण्या इतपत शिकलेला नसला तरी लिहिता वाचता येते की अर्जून ला.. हे बघ कमल.. मला ही वाईट वाटते बघ अशी मुलगी सुचवायला.. पण आपण कमी प्रयत्न केले का? नाही तयार होत कोणी तर काय करणार? "

   "मागे दोन वर्षांपूर्वी ती आपल्या गावातल्या जनार्दन ची गीता तयार होती लग्नाला.. पण तिथे ही नशीब आडवे आले.."

   "अग दोघांची पत्रिका अजिबात जुळत नव्हती.. मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची आपण? या मुलीची आणि अर्जून ची पत्रिका जुळवून पाहिलीय मी.. उत्तम गुण जुळतात.. अगदी सुखाचा संसार होईल दोघांचा अस सांगितलय पुजारी बाबांनी.."

     
  "बघ बाई तूच अर्जून शी बोलून.. तो तयार असेल तर माझी काही हरकत नाही.. मला फक्त त्याला सुखी झालेलं बघायचाय.. त्याच्या वयाच्या पोरांची पोर खेळताना दिसतात तेंव्हा जीव जळतो ग माझा.. लेकराच सुख कुठ दडून बसले काय माहीत? बाप गेल्या पासूनच पोरगा कष्ट करतोय.. स्वतः शिकला नाही पण बहिणी ला शिकवतोय... त्याच्याच नशिबात सुख नाही.." कमल बाईंनी डोळ्याला पदर लावला..


   क्रमशः


नवीन लघु कथा... कशी वाटतेय नक्की सांगा...


0