काना मागून आली आणि तिखट झाली
“अरे अरे सुमा वंन्स गर्भवती बाईने असं दुपारी लोळत पडायचं नसतं, काही ना काही काम करत राहायचं असतं, नाहीतर होणारं बाळ मठ्ठ होतं. चला चला उठा, उठून बसा आणि हा एवढा लसूण मला सोलून द्या.” प्रीती तिच्या गर्भवती नंनदेला दुपारी आरामाऐवजी काहीतरी करण्यासाठी सांगत होती आणि तिच्या पुढ्यात दोन-तीन लसणाचे गाठे आणि कटोरा आणून दिला.
सुमा मात्र खाऊ का गीळु या नजरेने तिच्या वहिणीकडे प्रितीकडे बघत होती.
“अहो असं डोळे मोठे करून रागाने माझ्याकडे काय बघताय सुमा वंन्स? तुमच्या पोटातलं बाळही तुमच्या सारखंच रागीट होईल, तुमचं हे पहिलंच बाळंतपण ना! त्याचमुळे तुम्ही स्वतःला आणि स्वतःच्या बाळाला जास्त जपायला हवं स्वतःची आणि बाळाची काळजी घेणं तुमच्याच हातात आहे. मी जेव्हा गर्भवती होते तेव्हा आपल्या आई तर मला नेहमीच म्हणायच्या, गर्भवती बाईने कसं सतत कामात असावं, म्हणजे मोकळं राहतं, आणि बाळंतपण पण नैसर्गिकरीतीने होतं,आणि पुढे चालून कुठलेही त्रास होत नाहीत.”
सुमाला मात्र तिच्या वहिणीच्या अशा रोजच्या किरकिर मुळे वैताग आला होता. ती वहिनीशी एक अक्षरही न बोलता आपल्या खोलीतून तिच्या आईला बोलावु लागली.
“आई ए आई! आई ग, अगं कुठे आहे तू? ही वहिनी बघ परत माझ्या मागे लागली. आई येतेस ना माझ्या खोलीत.” सुमाचा राग तिच्या नाकावर मावत नव्हता. तिला तर वाटलं होतं की आईकडे वहिणीची कागाळी केली म्हणजे आपली आई तिची चांगलीच कान उघडणी करेल.
सुमाची आई मीनाताई चिडचिड करतच सुमाच्या खोलीत आल्या.
“काय ग सुमे, काय झालं? आत्ता कुठे जरा डोळा लागला होता तर तुझा आपला पुकारा सुरू. जरा जीवाला आराम नाही. सतत तुझ्या बाबांच्या मागेपुढे करावं लागतं तेही कमी होतं म्हणून आता तुही……” मीनाताई पुढे काही बोलल्या नाही. त्यांना वाटलं आपल्या बोलण्यामुळे मुलीचं मन दुखावेल.
“काय झालं म्हणून काय विचारते? तुझी सून बघ काना मागून आली आणि तिखट झाली. प्रीती वहिनी, मला सारखी घालून पाडून बोलत असते. सतत माझ्यावरच टपलेली असते. तिला तर वाटतं की या घरातलं सगळं काम मी एकटीनेच करायला हवं, मला म्हणते कशी! ‘सुमा वंन्स, गर्भवती बाईने असं दुपारी झोपू नये होणार बाळ मठ्ठ होतं!’आणि हा टोपलंभर लसुण आणून ठेवलाय माझ्यासमोर सोलून हवा आहे तिला! आता काय अख्या गावाला, गाव जेवण घालणार आहे ती? की वर्षभराचा लसुण आजच माझ्याकडून सोलून घेणार आहे? तू ना तुझ्या सुनेला अजिबात धाकात ठेवलेलं नाही! तुझा तिच्यावर अजिबातच वचक नाही. सासूने कसं सासू सारखंच वागाव! उगाच मुलगी असताना सुनेला मुलगी बनवण्याच्या भानगडीत पडू नको! आपलं ते आपलं असतं! पाणी घुसळलं तर त्यातून लोणी निघणार का आणि सुनेला कधी लेकीची सर येणार का?” सुमा चिडून बोलत होती.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा