कामा पुरता मामा अंतिम भाग

Selfish Mother In Law
कामा पुरता मामा अंतिम भाग

“रात्रीचे अकरा वाजले तरीही तुझी कामं अजून संपली नाहीत का?” नवऱ्याने काळजीच्या स्वरात तिला विचारलं. “रोज रात्री तू इतक्या उशिरा झोपते का?”

“रोज रात्री म्हणून असं नाही पण कधी कधी होतो वेळ. तुमचे हे दोन शर्ट प्रेस करायचे राहिलेत. तेवढे प्रेस करून येते.” तिला डोळ्यासमोर काम दिसत होतं.

“एवढ्या रात्री कशाला प्रेस करतेस? उद्या सकाळी कर.” नवऱ्याच्या आवाजात तिला अधीरता जाणवली.

“नाही नको सकाळी कधी कधी लोड शेडिंग असतं मग सगळ्याच कामांचा खोळंबा होतो. एवढे शर्ट प्रेस करते मग येते.” इच्छा असूनही ती कपडे प्रेस करायला लागली.

तो मात्र तिच्यासाठी अजूनही जागाच होता. तिलाही खूप बरं वाटत होतं. दिवस-रात्र ज्या घरासाठी, घरातल्या लोकांसाठी आपण राबराब राबतो त्याची दखल कोणी नाही, पण निदान नवऱ्याने तरी घेतली हा विचार करूनच तिला हायसं वाटलं.

“अगं कपडे उद्या प्रेस केले असते तरी चालणार होतं.” काय बोलावं या विचारात नवऱ्याने सहजच बोलायला सुरुवात केली.

“नको सकाळी पुष्कळ काम असतात. सगळ्यांना जायचं असतं त्यामुळे वेळेत चहा नाश्ता आणि स्वयंपाक होणं गरजेचं आहे. एखादं काम रात्री केलं नाही तर दुसऱ्या दिवशीच वेळापत्रक कोलमडत. मनाला बोच लागून राहते मग.”

“मला तुला काही विचारायचं आहे.” नवरा दुविधा मनस्थितीत तिला काहीतरी विचारु पाहत होता.

“काय विचारायचं आहे? तुम्ही मला काहीही विचारू शकता. मी, तुम्हाला आणि या घराला बांधील आहे.” तिने समजूतदार पत्नीच्या भूमिकेतून उत्तर दिले.

“बिट्टूचं लग्न दोन महिन्यावर आलेलं आहे. आईने तर तिच्या परीने बिट्टूसाठी सगळचं केलं आहे, पण ती मोठ्या घरची सून होणार आहे म्हणून मग आईला असं वाटत होतं की तू तुझे काही दागिने बिट्टूला लग्नात द्यावे. म्हणजे जर तुझी इच्छा असेल तर.” मनात इच्छा नसतानाही नवऱ्याने तिला तिचे दागिने मागितले होते.

आपला नवरा आपल्यासाठी नव्हे तर आपल्या दागिन्यांसाठी जागा आहे हे बघून तिला मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. आणि तिच्या भ्रमाचा भोपळा फुटला. मनात खोलवर कुठेतरी तिला खूप त्रास झाला होता पण चेहऱ्यावर तसे भाव न दाखवता, ती सगळे दागिने बिट्टूला म्हणजेच नंणदेला द्यायला तयार झाली.

“माझं सर्व तुमचंच आहे. तुम्ही म्हणाल ती माझ्यासाठी पूर्व दिशा. माझे सगळे दागिने मी बिट्टूला द्यायला तयार आहे.” मनात नसतानाही उसनं अवसान आणून तिने नवऱ्याला दागिन्यांकरिता होकार दिला.

“माझ्याजवळ पैसे जमा झाले की मी तुला सगळे दागिने पुन्हा बनवून देईन.” नवऱ्याने अपराधी स्वरात, स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

“तुम्ही मला दागिने परत बनवून दिले नाही तरीही चालेल. तसंही मी कुठे दागिने घालून बाहेर जाते? तुम्हाला तर माझ्याकडे बघायला ही वेळ नाही. मग काय करू मी त्या दागिन्यांचं? खूप रात्र झाली आहे, उद्या मला परत पुष्कळ कामं आहेत. मी झोपते आता.” इच्छा नसतानाही तिच्या भावना तिच्या ओठांवर आल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वयंपाक घरात गेली तर सासूने तिला हातात चहा दिला आणि दोन बिस्किट खाण्याची सूचना देखील केली.

“चहासोबत दोन बिस्कीट किंवा टोस्ट खात जा. दुपारी तुला जेवायला फार वेळ होतो. केवळ चहाने ऍसिडिटी व्हायची. काळजी घेत जा स्वतःची.” सासुबाई तिच्याशी प्रेमाने बोलत होत्या.

नवरा कोपऱ्यात बसून पेपर वाचता वाचता चहा पीत होता. सासूबाईंच्या गोड बोलण्याचं कारण आता तिला समजलं होतं. पण त्यानेही तिला आता फारसा फरक पडणार नव्हता.

आज सकाळचा नाश्ता देखील सासूबाईंनीच बनवला. आणि तिला नवऱ्यासोबत गॅलरीत बसून गप्पा मारायला पाठवलं.

अगं सहा महिन्यानंतर तुझा नवरा घरी आलाय त्याच्याजवळ बस जरा. सुखदुःखाच्या गोष्टी बोला तुम्ही दोघेजण.”तिने केवळ मंदस्मित केलं आणि पोह्याची बशी नवऱ्याला नेवून दिली.

सासूबाईंच्या वागण्यात झालेला फरक लगेच तिच्या लक्षात आला, पण ती आता ह्या बदलांना स्वीकारायला तयार नव्हती. ती गच्चीवर झाडांना पाणी देण्याकरता निघून गेली.

दुपारी ती स्वयंपाक करत असताना नवऱ्याने तिला संध्याकाळी बाहेर चालण्याविषयी विचारलं

“आज संध्याकाळी तुला काही काम आहे का? मला थोडं बाहेर जायचं आहे तर तू माझ्यासोबत यावं असं मला वाटतं.” नवऱ्याने तिला विचारलं.

तेवढ्यात सासूबाई तिथे आल्या.“हो हो हिला बाहेर घेऊन जा. दिवस रात्र सतत कामच करत असते ती. बाहेरच्या मोकळ्या स्वच्छ वातावरणात तिलाही छान वाटेल आणि तिचा मूड ही फ्रेश होईल.” सासूबाईंकडून हे शब्द ऐकून तिला आश्चर्याचा परत एकदा धक्का बसला.

लग्न झाल्यावर सुरुवातीला तिला बाहेर जायचं असायचं तर सासुबाई नेहमीच मोडता घालायच्या. घर कामाचं नाही तर स्वयंपाकाचे कारण काढून तिला आणि तिच्या नवऱ्याला त्या कधीच बाहेर जाऊ देत नव्हत्या.

आपल्या केवळ दागिने देण्याचा होकाराने सासुबाई आपल्याशी गोड बोलत आहेत ही गोष्ट लगेच तिच्या लक्षात आली. आणि लांडे च लग्न झाल्यानंतर सासू पुन्हा पाढे पन्नास गिरवणार हे तिला पक्क माहिती होतं.

एक प्रकारे सासूने तिचा कामापुरता मामाच केला होता.

शेवटी न राहून ती तिच्या सासूला म्हणाली, “मी बिट्टूला दागिने देण्यासाठी होकार दिला आहे म्हणून तुमचं हे गोड बोलणं सुरू आहे. काही दिवसानंतर तुम्ही तुमच्या मुळ स्वभावावर येणार हे मला पक्कं ठाऊक आहे. शेवटी काय कामापुरता मामा असतो प्रत्येकाचा.”

एवढं बोलून ती संध्याकाळचा स्वयंपाक करायला स्वयंपाक घराकडे वळली आणि सासू मात्र तिच्याकडे बघतच राहिली.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कुणाशी कसलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.

सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून लेखिकेच्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


🎭 Series Post

View all