Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग १२

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग १२
डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग १२

टॅक्सी जेव्हा 'जहागीरदार व्हिला'च्या भव्य लोखंडी गेटसमोर थांबली, तेव्हा साक्षीचे डोळे विस्फारले. तिने आजवर पुण्यातले अनेक मोठे बंगले पाहिले होते, पण हे काहीतरी वेगळंच होतं. एखाद्या युरोपीय राजवाड्यासारखा तो बंगला पांढऱ्याशुभ्र रोषणाईने न्हाऊन निघाला होता.

प्रवेशद्वारावरच सूट-बूट घातलेले धिप्पाड बाउन्सर आणि व्हॅले पार्किंगसाठी उभा असलेल्या महागड्या परदेशी बनावटीच्या गाड्यांची रांग पाहून साक्षीच्या मनात धडधड वाढली. तिने आपल्या पैठणीचा जरतारी पदर सावरला, गळ्यातील सोन्याच्या पुतळ्यांच्या माळेला स्पर्श केला आणि एका खोल श्वासासह आत पाऊल टाकले.

आत शिरताच तिला एका तीव्र आणि महागड्या 'उंची परफ्युम'चा सुगंध आला. तिथलं वातावरण 'नर्मदा सदन'च्या जुईच्या सुवासापेक्षा पूर्णपणे वेगळं, कृत्रिम , पण तितकच भुरळ घालणारं होतं. पार्टीमध्ये वाजणारं मंद  'इंग्लिश' संगीत, हातात शॅम्पेनचे ग्लास घेऊन वावरणारे उच्चभ्रू लोक आणि मोजक्या शब्दांत चालणारं इंग्रजी संभाषण—हे सर्व एखाद्या परदेशी फिल्ममधील दृश्यासारखं वाटत होतं.

स्त्रियांनी जगप्रसिद्ध डिझायनर्सनी तयार केलेले गाऊन्स, शॉर्ट ड्रेसेस आणि हिऱ्यांचे दागिने घातले होते. अशा वातावरणात साक्षीची ती पारंपरिक जांभळ्या रंगाची पैठणी आणि कपाळावरची टिकली तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या नजरेत 'वेगळी' आणि 'विचित्र' ठरत होती.

तिला आता जाणवु लागले की, ज्या साडीसाठी आईने आयुष्यभराची पुंजी खर्च केली होती आणि ज्याचा तिला सार्थ अभिमान होता, ती साडी या चकचकाटात पूर्णपणे आउटडेटेड आणि मिसफिट वाटत आहे.

अमेय जहागीरदार हॉलच्या मध्यभागी उभा राहून कोणा परदेशी डेलीगेट्सशी हसून बोलत होता. ब्लॅक टक्सिडोमध्ये तो एखाद्या हॉलिवूड स्टारसारखा दिसत होता. त्याने गर्दीतून साक्षीला पाहिले आणि तो एका हाताने ग्लास सावरत तिच्या जवळ आला.

" ओह, साक्षी ! वेलकम ! तू आलीस, मला आनंद झाला,"

अमेयने स्मितहास्य करत तिचे स्वागत केले. मग त्याने तिच्या साडीकडे पाहिले आणि त्याचे हास्य थोडे अधिकृत झाले.

" नाईस साडी... थोडी जास्तच ट्रॅडिशनल आहे आजच्या वातावरणासाठी, पण हरकत नाही. तुला कम्फर्टेबल वाटतंय ना ? "

अमेयच्या त्या हरकत नाही या शब्दाने आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या क्षुल्लक सहानुभूतीने साक्षीचा उरलासुरला आत्मविश्वास क्षणात डळमळीत केला.

त्याच वेळी अमेयची बहीण ईशा तिथे आली. तिने एक स्लीव्हलेस ब्लॅक गाऊन घातला होता आणि तिच्या गळ्यात एक मोठा हिऱ्याचा नेकलेस होता.

" अमेय हीच का तुझी ती नवीन 'फायनान्स स्टार' ? "

ईशाने साक्षीला वरपासून खालपर्यंत अशा तुच्छ नजरेने पाहिले की साक्षीला स्वतःचीच लाज वाटू लागली. ईशाने तिच्या साडीच्या पदराकडे बोट दाखवत उपरोधिकपणे म्हटले,

" नाईस साडी, बट डोन्ट यू थिंक इट्स अ बिट टू इथ्निक अँड लाउड फॉर अ कॉकटेल पार्टी ? असं वाटतंय जणू तू चुकून एखाद्या लग्नाच्या पंगतीतून इथे आली आहेस ! "

ईशाच्या या वाक्यावर आजूबाजूला उभ्या असलेल्या मॉडर्न मुलींमध्ये एकच कुजबुज सुरू झाली आणि त्या हसू लागल्या. साक्षीला तिथे उभं राहणं कठीण होऊ लागलं. तिला पहिल्यांदाच जाणवलं की साधेपणा आणि संस्कृती हे या जगात दागिने नसून एक उणीव मानली जाते.

अमेयने तिला तिथल्या काही बोर्ड मेंबर्सशी ओळख करून दिली, पण साक्षीला तिथले ते कृत्रिम इंग्रजी उच्चार, मार्केट क्रॅश आणि इक्विटीच्या त्या गप्पा काहीच समजत नव्हत्या. तिला जाणवलं की ती दिसायला जरी अमेयच्या जगात आली असली, तरी मनाने आणि संस्काराने ती अजूनही खूप दूर आहे.

पार्टीच्या त्या गर्दीत ती पूर्णपणे एकाकी पडली होती. अमेय पुन्हा त्याच्या बड्या मित्रांच्या कोंडाळ्यात शिरला होता. साक्षी एका कोपऱ्यात उभी राहून स्वतःच्या साडीकडे पाहत होती. तिला आठवला तन्मय, जो तिला म्हणाला होता की

" तू या पैठणीत एखाद्या राणीसारखी दिसतेस."

पण या राजवाड्यात ती राणी नाही, तर एक उपरी वाटत होती. तिने अमेयच्या जगाकडे पाहिलं आणि तिला वाटलं, हे जग जितकं चकाकतंय, तितकंच ते बोचरं सुद्धा आहे.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही