डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग १४
रविवारची ती निवांत सकाळ होती. सदाशिव पेठेतील 'नर्मदा सदन'च्या शांत वातावरणात फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट आणि दूरवर कुठेतरी चाललेल्या सुप्रभातच्या गाण्याचा आवाज ऐकू येत होता. वाड्याच्या ओसरीवर तन्मय आपल्या सायकलची साखळी दुरुस्त करण्यात मग्न होता. अंगात एक जुना मळका बनियन, हाफ पँट आणि हाताला ग्रीसचे काळे डाग लागलेला तन्मय कोणालाही बँकेचा शार्प ऑफिसर वाटला नसता.
त्याच्यासाठी रविवार म्हणजे स्वतःच्या छंदांना आणि घराला वेळ देण्याचा दिवस होता. तो अत्यंत तन्मयतेने सायकलच्या साखळीला तेल लावत होता.
तेवढ्यात, गल्लीच्या कोपऱ्यातून टायर घासल्याचा एक मोठा आवाज आला. एक चकाकती पांढरी मर्सिडीज अतिशय वेगाने त्या अरुंद गल्लीत शिरली आणि 'नर्मदा सदन'च्या जुन्या लाकडी कमानी समोर करकचून ब्रेक दाबून थांबली. त्या शांत गल्लीत एवढी महागडी गाडी येणं म्हणजे एक मोठी घटना होती. खिडक्यांतून आजूबाजूचे लोक डोकावू लागले.
गाडीचा दरवाजा उघडला आणि अमेय जहागीरदार बाहेर उतरला. चकाकते काळे बूट, अंगावर फिट बसलेला डिझायनर शर्ट, डोळ्यांवर महागडे सनग्लासेस आणि त्याच्या वावरातून दरवळणारा तो उग्र फ्रेंच परफ्युमचा सुगंध संपूर्ण ओसरीवर पसरला.
अमेयने गाडीतून उतरताच आपल् नाक अधिकच आकसून घेतल. त्याने तिरस्काराने वाड्याच्या त्या शेवाळ उगवलेल्या भिंतींकडे, जुन्या लाकडी खांबांकडे आणि तिथे वाळत घातलेल्या कपड्यांकडे पाहिले. त्याला इथे येण्यात काडीचाही रस नव्हता, पण साक्षी आदल्या दिवशी ऑफिसमधून निघताना स्कायलाईन प्रोजेक्टची एक अत्यंत महत्त्वाची टेक्निकल फाईल चुकून घरी घेऊन आली होती. अमेयला ती फाईल एका महत्वाच्या झूम मिटिंगसाठी हवी होती, म्हणून वैतागून तो स्वतः पत्ता शोधत इथे आला होता.
" एक्सक्यूज मी. "
अमेयने खाली वाकून सायकल दुरुस्त करणाऱ्या तन्मयकडे ढुंकूनही न पाहता, केवळ आवाजाच्या जोरावर त्याला साद घातली. त्याच्या आवाजात एक प्रकारची सत्ता आणि घमेंड होती.
" साक्षी देशपांडे याच वाड्यात राहते का ? "
तन्मयने शांतपणे हातातील कापडाने ग्रीस पुसत उभे राहून अमेयला पाहिले. त्याने अमेयला पाहताच ओळखले होते. साक्षीच्या बोलण्यातून ज्याचं वर्णन त्याने हजार वेळा ऐकलं होतं, तो 'अमेय जहागीरदार' आज प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभा होता. अमेयची ती 'पॉवर' आणि 'क्लास' तन्मयला एका क्षणात जाणवली, पण तो डगमगला नाही.
" हो, साक्षी इथेच राहते. तुम्ही अमेय जहागीरदार ना ? " तन्मयने अतिशय शांत आणि स्थिर आवाजात विचारले.
अमेयने आपले सनग्लासेस थोडे खाली केले आणि तन्मयला वरपासून खालपर्यंत पाहिले. अमेयच्या नजरेत स्पष्टपणे घृणा होती. त्याच्यासाठी समोर उभा असलेला हा ग्रीसने माखलेला मुलगा एखादा सामान्य मेकॅनिक, नोकर किंवा फार तर एखादा स्थानिक मुलगा असावा.
" हो. तिला बाहेर बोलवा आणि सांगा की मी वाट पाहतोय. आय डोन्ट हॅव ऑल डे टू वेस्ट इन धिस लेन." अमेयचा आवाज प्रचंड उद्धट आणि कोरडा होता.
तन्मयच्या मनात रागाची एक लहरी आली, पण त्याने आपल्या संस्कारांमुळे तो राग गिळला.
" ती वरच्या मजल्यावर आहे, तयार होत असेल कदाचित. तुम्ही हवा तर आत येऊन ओसरीवर बसू शकता." तन्मयने आदरा तिथ्याचा भाग म्हणून रस्ता दाखवला.
"आत ? ओसरीवर? म्हणजे ? " अमेय उपरोधिकपणे हसला. त्याने वाड्याच्या त्या जुन्या लाकडी दरवाजाकडे पाहिले आणि मान झटकली.
" नो थँक्स. हे ठिकाण खूपच... कंजस्टेड आणि गुदमरल्यासारखं आहे. आय विल वेट इन माय कार." अमेयने पुन्हा एकदा त्या वाड्याकडे कचरा पाहिल्यासारखी नजर टाकली.
तन्मयला अमेयच्या या रिजिड आणि अहंकारी स्वभावाची पहिली झलक मिळाली होती. त्याला जाणवलं की, साक्षी ज्या चकाकीच्या मागे धावत आहे, त्या चकाकीच्या मागे इतका भयानक अहंकार दडलेला आहे की तो समोरच्या माणसाला माणूस मानायलाही तयार नाही.
तन्मयने फक्त एक दीर्घ श्वास घेतला आणि तो साक्षीला हाक मारण्यासाठी जिने चढून वर गेला. दोन जगांची ही पहिली भेट ठिणगी टाकून गेली होती.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा