Login

वाळवण विशेष गाजर टमाटा मुळ्याचे सांडगे

गाजर टमाटा मुळ्याचे सांडगे
वाळवण विशेष गाजर टमाटा मुळ्याचे सांडगे

साहित्य

१) एक किलो गाजर

२) अर्धा किलो मुळा

३) एक पाव टमाटे

४) हिरवी मिरची 200 ग्रॅम किंवा चवीनुसार

५) जाड पोहे एक पाव

६) मुरमुरे एक पाव

७) पांढरे तीळ 100 ग्रॅम

८) जीरो 50 ग्रॅम

९) ओवा दोन टेबलस्पून.

१०) मीठ चवीनुसार

कृती

१. सर्वप्रथम गाजर मुळा टमाटे मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या करून घ्याव्या.

२. किसणीने मुळा आणि गाजर किसून घ्यावं.

३. टमाटा मिक्सरमध्ये फोडी करून टाकावा आणि 100 ग्रॅम मिरचीचे तुकडे यांचे पातळ मिश्रण बनवावं पाणी अजिबात टाकू नये.

(जेवढ्या मिरच्या घेतल्या असतील त्याच्या अर्ध्या मिरच्या टमाट्याबरोबर बारीक कराव्या व उरलेल्या अर्ध्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून ते गाजर आणि मुळ्याच्या किसामध्ये एकत्र करावे.)

४. एका मोठ्या ताटात किंवा परातीमध्ये मुरमुरे, पोहे, गाजराचा कीस, मुळ्याचा किस, तीळ, जिरे, मिरचीचे तुकडे आणि मीठ एकत्र करावे.

५. तयार झालेल्या मिश्रणावर मिक्सर मधून काढलेल्या टमाटे मिरची पातळ सारण टाकून त्याचे छान वडे बांधून घ्यावे.

(महत्त्वाची टीप - वडे बांधताना ते अगदी अलगद आणि हलक्या हाताने बांधावे. फार गच्च किंवा दाबून घट्ट बांधले तर पोटात कच्चे राहतात आणि मग त्याला कीड लागण्याची शक्यता असते.)

६. तयार वडे कडक उन्हात कडकडीत वाळवावे.

७. स्वच्छ धुऊन कोरड्या केलेल्या हवाबंद बरणीमध्ये खाली जाडे मीठ टाकून त्यावर वाळलेले वडे ठेवून झाकण फिट बंद करावे.

खिचडी बरोबर, किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावणं म्हणून हे सांडगे खूप छान लागतात.