Login

घरटं भाग ४

घरटं
घरटं भाग ४

विराज घाबरून मागे सरकला. भूतकाळ जणू थेट त्याच्यावर चाल करून येतोय असं वाटू लागलं. त्याचा श्वास घालमेल करू लागला. तो दरवाज्याकडे धावत सुटला पण अचानक ठप्प! असा एक जबरदस्त आवाज झाला आणि दरवाजा आपोआप बंद झाला.असं वाटलं जणू त्या घराने स्वतः सांगितलं,"आता तू इथून बाहेर जाऊ शकत नाहीस."

"कोण आहेस तू?" विराज कासावीस होऊन ओरडलं. पण त्या क्षणी सगळं पुन्हा शांत झालं.मग हळूहळू मागून एक स्थिर, थंडसा स्वर ऐकू आला"फक्त खरं."त्या घरात काहीतरी घडलं होतं. अनेक वर्षांपूर्वी. ज्याचं नाव कोणी घेत नव्हतं. लोक विसरले, पण त्या भिंती नाही विसरल्या. नाही ते घर.

आता...विराज तिथं होता. आणि त्याच्या कॅमेऱ्यातून उलगडणार होतं एक असं सत्य जे जिवंत होतं, पण फक्त वेळेची वाट पाहत होतं.

आणि ती वेळ…आता आली होती.

दार आपटल्याचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. विराज त्या बंद दरवाजासमोर थबकून उभा होता. त्याचे दोन्ही हात दारावर टेकलेले, चेहरा घामाने ओलाचिंब. त्याने एकदा जोरात दार ढकललं पण ते हललंच नाही. त्याचा श्वास वेगानं चाललेला. ओठांवर एकच प्रश्न"कोणतं खरं?" आवाजात असहायता होती.पण उत्तर मिळालंच नाही.

तेव्हाच, घराच्या तळघरातून मंद प्रकाश पसरायला लागला तेच तळघर, जिथून ही सगळी कहाणी पुन्हा एकदा उलगडू लागली होती.

सर्व घडामोडींनी मन सुन्न झालं असतानाही, विराजच्या पायांना थांबणं अशक्य झालं. तो सावकाश खाली उतरला. एक पायरी, दोन पायऱ्या आणि मग मागे वळून पाहिलं. झोपाळा जिथं हालत होता, तिथं आता सगळं स्तब्ध. झोपाळा थांबलेला. चादर गायब. ती बाहुली… कुठं गेली?काही शब्द न उच्चारता तो तळघरात उतरला.

तिथं, तुटलेल्या आरशाजवळ… एक दृश्य त्याच्या डोळ्यांपुढे स्पष्ट होत गेलं.पाठमोरी बसलेली एक लहानशी मुलगी. अंगावर एक जुना पिवळसर फ्रॉक. केस विस्कटलेले. ती काहीतरी गुणगुणत होती हळू, आर्त स्वरात, अगदी काळजाला भिडावं असं:

"माझं घरटं हरवलं गं आई,
सगळं काही निघून गेलं…
मी आजही तिथंच बसलेय,
तू सांगशील ना… का असं झालं?"

विराजच्या अंगावर काटा आला. हळूच एक पाऊल पुढे टाकलं. “तू… तू कोण आहेस?” त्याचा आवाज थरथरत होता. ओलसर. अगदी हलकासा.ती थांबली. तिच्या स्वरातलं गाणं थांबलं. हळूच तिनं मान वळवली आणि विराज थिजून गेला.तेच डोळे. पोकळ. अनंत दु:खाने भरलेले.ती फक्त म्हणाली, “तूच ना… माझा दादा?”

कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all