Login

रसेल्स व्हायपर - घोणस

नमस्कार मित्रानो, एका वेगळ्या विषयावर हा माहितीपूर्ण लेख लिहिण्याचा प्रयत्न. भारतातील मुख्य ??

भारतातील विषारी सर्प
१. रसेल्स व्हायपर - घोणस

पावसाळा संपून हिवाळ्याचं आगमन झालेलं आहे. आता हळू हळू थंडीही जाणवायला लागलेली आहे. आणि अशा दिवसांतच आपल्या घराच्या आजूबाजूला, अडी अडचणीसारख्या ठिकाणी, झुडपांमध्ये सापांचं वावरणं वाढलेलं असतं. आणि त्यातही घोणस या प्रकारातल्या विषारी सापाचं दिसणं, अगदी साहजिकच!

तर "रसेल्स व्हायपर" म्हणजेच "घोणस" हा भारतातील प्रमुख चार विषारी जातींमधील साप. सर्वप्रथम १७९६ मध्ये स्कॉटलंडच्या "पॅट्रिक रसेल" यांनी या सापाची शास्त्रशुद्ध ओळख पटवून दिली. म्हणूनच तो ‘रसेल्स व्हायपर’ या नावाने ओळखला जातो. घोणस ओळखायला अतिशय सोपा. अजगरासारखा दिसतो म्हणून खूप लोक फसतात. पण जरा निरखून पाहिलं कि, कळतं हा अजगर नसून घोणस आहे. त्यांच्या अंगावर मानेपासून ते शेपटीपर्यंत तीन समांतर साखळ्या गेलेल्या असतात. काळसर जाड वर्तुळे आणि त्यांना किंचित पांढरी किनार असते. वरच्या भागातले वर्तुळ एकमेकांना किंचित जोडून असतात तर डाव्या उजव्या बाजूची, वरच्या वर्तुळांच्या मधोमध जरा खाली एकसमान अंतरावर असतात. रंगाने कधी तपकिरी, करडा, तर कधी फिक्कट पिवळ्या, कांचित हिरव्या रंगात हा साप असतो. डोक्याकडचा भाग लहान निमुळता आणि शेपटीही आखूड लहानच असते. पण मधला पोटाचा भाग आकाराने मोठा नी बोजड असतो. सर्वसाधाणपणे अजगरासारखा दिसतो म्हणून खूप लोक, अजगर समजून पकडायला जातात, आणि जीवाशी जातात. अशी खूप उदाहरणं आहेत. याचं डोकं त्रिकोणी आकारचं आणि चपटे, बाणाच्या टोकासारखं असतं. त्यामुळे याला आपण सहज ओळखू शकतो. शिवाय, याला ओळखायची सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे, हा साप जेव्हा रागावलेला किंवा आक्रमणाच्या पावित्र्यात असेल, तेव्हा कूकरच्या शिट्टी प्रमाणे आवाज करतो. पूर्ण वाढ झालेल्या घोणस सापाची लांबी अंदाजे दीड मीटर्सच्या आसपास असते.

स्वभावाने हा साप जरी शांत आणि मवाळ असला, तरी सगळ्या सापांत अत्यंत आक्रमक आणि रागीट. चुकून जरी याच्या अंगावर माणसाचा पाय पडला तर, चावल्याशिवाय हा राहत नाही. म्हणूनच इतर सर्व विषारी सापांपेक्षा सगळ्यात जास्त कडकडून आणि जास्त विष सोडणारा याचा चावा प्राणघातक मानला जातो.

घोणसाचे दात एक ते दीड सेंटीमीटर एवढे मोठे असतात. इतर सर्व सापांपेक्षा याचे दात मोठे असतात. विशेष म्हणजे, तो आपले दात जबड्यामध्ये मुडपून घेऊ शकतो. आणि जेव्हा शत्रूवर हल्ला करायचा असेल तेव्हाच तो पुन्हा बाहेर काढून चावा घेतो.

घोणसाचे खाद्य म्हणजे उंदीर, बेडूक, टोळ, सरडे. त्यामुळे शेतीच्या बांधाच्या आजूबाजूला, वस्तीमध्ये अडी अडचणीच्या ठिकाणी, जिथं उंदरांचा वावर असतो, तिथं हा साप असण्याची शक्यता असते. हिवाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा त्याचा विणीचा हंगाम म्हणजेच मिलनाचा काळ असतो. जास्त करून तो थंडीच्या दिवसांत पहाटे व रात्री फिरतो. शिवाय, इतर सापांमध्ये ताकदवान आणि विषारी असल्यामुळे तो दिवसादेखील बनादिक्कत फिरताना दिसू शकतो.

घोणस सहसा माणसाच्या वाटेला जात नाही. शत्रूची चाहूल लागली अथवा त्याला धोका जाणवला तर तो आपल्या शरीराचे "S" आकाराचे वेटोळे करून त्यामध्ये आपले तोंड शत्रूच्या दिशेने करून दडवून ठेवतो. कुक्करच्या शिट्टीसारखा एकसारखा आवाज करतो. आणि क्षणार्धात सरळ होऊन, विजेच्या चपळाईने, अतिशय वेगाने शत्रूच्या शरीराचा वेध घेतो.

कुणीही घोणसाला अजगर समजून पकडण्याचे धाडस करू नये. घोणसाची ताकद, त्याची चपळाई, क्षणार्धात शत्रूच्या दिशेने झेप घेण्याची लवचिकता, आणि जहाल विषारी चावा या बद्दलचे अंदाज कुणीही बांधु नयेत. कारण एक चूक जीवावर बेतू शकते.

घोणासाचे विष हे "व्हास्कूलो टॉक्सीक" (Vasculotoxic) प्रकारचे असते. म्हणजे रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम करणारे. वैदयकीय संशोधनात त्याच्या विषाचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. घोणसाच्या विषाने रक्तातील गुठळ्या करू शकणाऱ्या प्रथिनांचा नाश होतो आणि चाव्याच्या जखमेतून वाहणारे रक्त भळभळत राहतं. एक दोन तासांत जर उपचार नाही मिळाले. तर डोळ्यांतून, दाढेतून, नाकातून, कानातून, गुदद्वारातून रक्त यायला सुरुवात होते. आजपर्यंत आपली अशी समजूत आहे कि, विषारी साप हाताला किंवा पायाला चावल्या नंतर हात किंवा पाय वरच्या बाजूला करकच्चून बांधावा. पण घोणस चावल्यानंतर असे कधीही करू नये. कारण, असे केल्यास त्या भागात विष पसरून गँगरीन होऊन शकतं. हात किंवा पाय पूर्णपणे निकामी होऊन अवयव कापावा लागू शकतो. त्यामुळे घोणस चावल्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात जाऊन उपचार घेणे हाच यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. अन्यथा, काहीच तासांमध्ये माणसाचा मृत्यू अटळ आहे. घोणस चावल्यानंतर हाताला किंवा पायाला येणारी सूज बरी होण्यास एक ते सहा महिने लागू शकतात.

शेतामध्ये काम करताना, फिरताना चुकून पाय पडून किंवा धक्का लागून सर्पदंश होऊन मृत्युमुखी पडण्याची खूप उदाहरणे आहेत. भारतामध्ये सगळ्यात जास्त सर्पदंशाने जे लोक दगावतात, त्यामध्ये घोणस चावून मृत्यू येण्याचे प्रमाण खूप आहे. एक तर घोणसाबाबतीतले अज्ञान, घरगुती इलाज आणि उपचार करण्यात दिरंगाई.

मिंत्रानो, हा लिहिण्याचा प्रपंच एवढयासाठीच कि, सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि घोणस सापाचा मिलनाचा काळ. त्यामुळे बाहेर फिरताना शक्यतो सॉक्स आणि शूज घालूनच फिरावे. शेतात जातानाही पायांमध्ये शूज, बूट घालूनच फिरावे.

पुढील भागात आपण पाहूया "कॉमन क्रेट" म्हणजेच "मणियार" या सापाबद्दल.

धन्यवाद.

🎭 Series Post

View all