Login

चकवा (भाग -2)

Horror And Suspense Story


मागच्या भागात आपण पाहिलं की चौदा वर्षांची आईवडिलांची एकुलती एक मुलगी रमणी शाळेतून घरी आलीच नाही.

एव्हाना रमणीची गावात राहणारे काका-काकू पण रमणीच्या बेपत्ता होण्याची बातमी कळताच हजर झाले.
भावाच्या सल्ल्याने विनायकरावांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

पोलीस निरीक्षक प्रशांत जामनिक ह्यांनी सगळी केस लिहून घेतली... रमणीची माहिती, वर्णन, मोबाईल नंबर आणि फोटो मागवला...

काही वेळातच तिच्या मोबाईलचं लोकेशन मिळाल्याचा निरोप आला अन् इन्स्पेक्टर प्रशांत त्यांच्या टीममधील स्त्री सहकारी सुमित्राबाई, एक हवालदार आणि रमणीच्या वडील आणि काकांसह त्या लोकेशनच्या दिशेने निघाले.

भिरंगी तलावाजवळ मोबाईलचं लोकेशन मिळालं तिथे पोहचताच टॉर्चच्या उजेडात त्यांना रमणी दिसली... तलावाच्या काठाजवळ गुढघ्यात तोंड खुपसून बसलेली...

बाबांना पाहताच तिचा धीर सुटला अन् पटकन जाऊन त्यांच्या कुशीत शिरली. तिचा पहिला आवेग ओसरताच इन्स्पेक्टर प्रशांत ह्यांनी सूत्रं हातात घेतली.. त्यांनी आदेश देताच हवालदार सुमित्राबाईंनी तिचं निरीक्षण नोंदवायला सुरुवात केली ...

अंगात पोलकी डॉट्स चा गुडघ्यापर्यंत असलेला . ओलसर आणि बाहीमध्ये जरा उसवलेला अन् चुरगळलेला भारीतला फ्रॉकवजा ड्रेस,विस्कटलेले केस, रडून सुजलेले डोळे आणि हातापायावर लालसर खुणा.... हवालदार सुमित्राबाईंनी इन्स्पेक्टर प्रशांतकडे सुचक नजरेनं बघितलं!

विनायकरावांच्या विनंतीवरून इन्स्पेक्टर प्रशांतने रमणीला थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन न जाता त्यांच्या घरीच नेण्याची परवानगी दिली.

रमणीनं घरी पोचल्यावर सगळी आपबीती सांगितली. एव्हाना पहाटेचे चार वाजत आले होते. सगळ्यांना आराम करायला सांगून पोलीसांच्या चमूने विनायकरावांचा निरोप घेतला.

जाताना इन्स्पेक्टर प्रशांत हॉलमधून डाव्या हाताला असलेल्या आजीच्या खोलीत सहज म्हणून डोकावले अन् मनाशी काहीतरी विचार करत उजव्या हातातली छडी डाव्या तळहातावर आपटत निघून गेले.

*************************************

दुसरे दिवशी दुपारी तीन वाजता इन्स्पेक्टर प्रशांत हवालदार सुमित्राबाईसह पुन्हा विनायकरावांच्या बंगल्यावर हजर झाले त्यामुळे समोरच सोफ्यावर लोळत असलेली रमणी जरा घाबरली अन् तोंड लपवत आतल्या खोलीत निघून गेली.

"आपल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार इन्स्पेक्टर साहेब! आमची मुलगी आम्हाला सुखरूप मिळाली. आता ही केस बंद करूया!" विनायकरावांनी सूचना केली.

"नाही... ही केस इतक्यात नाही बंद करता येणार! मला ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी लागेल" इन्स्पेक्टरने ठामपणे सांगितलं अन् हॉलचा पडदा भीतीने थरथरला.

"रमणीला बोलवा" सोबत आलेल्या हवालदार सुमित्राबाईंनी हाक दिली.

काही वेळातच रमणी तिच्या आजीच्या पदराशी चाळा करत हजर झाली.

"हम्म... तर तो म्हातारा भिकारी कुठे भेटला म्हटलीस?"

"उम्म... शाळेजवळ" रमणी चाचरत उत्तरली.

"अच्छा! मग त्या भिकाऱ्यासाठी समोसे कुठल्या हॉटेलमधून आणलेस?"

"सुरज कॅफे मधून"....

"हम्म... मग पुढे..."

"सांगितलं ना त्यानं पाणी मागितलं... मी निघाले तर तो माझ्या मागे मागे येऊ लागला.... मला खूण केली... मग मी त्याच्या मागे मागे..."

"अरे हो! तू हे सांगितलंस आम्हाला रात्री... नाही का!" इन्स्पेक्टर प्रशांतने तिचं बोलणं अर्ध्यातच तोडलं.

"सूरज कॅफेच्या मालकाचं लग्न होतं काल म्हणून कॅफे बंद आहे तीन दिवसांपासून" हवालदार सुमित्राबाईंनी बॉम्ब फोडला अन् रमणीच्या तोंडाचा आ वासलेलाच राहिला...

रमणीला चकवा लागला आणि त्यातून ती सुखरूप परतलीय. तिच्या वडिलांनाही आता ही केस बंद करावी असं वाटतंय. मग पोलीस पुन्हा पुन्हा चौकशी का करताहेत ?

काही गौडबंगाल असेल का?
0

🎭 Series Post

View all