थोरलेपण
जलद लेखन
"दादा, बस झालं... मोठा आहेस म्हणून काय तुझी प्रत्येक गोष्ट आम्ही ऐकलीच पाहिजे का?"
त्याचा सगळ्यात लहान भाऊ सागर तावातावाणे बोलत होता.त्याचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमला, सागरच्या चेहऱ्यावर राग, डोळ्यांत तक्रार होती पण ती नक्की कसली हेच त्याला समजत नव्हतं.
"तेच ना... आम्ही आता काय लहान आहोत का? तुझं सगळंच ऐकायला? आम्हालाही आमचं मत आहेच ना?"
लहान भावाची री ओढत मधला भाऊ रोहन म्हणाला.
एवढा वेळ आई शांत बसली होती. पण आता न राहवून ती म्हणाली,
"म्हणजे दादाने एवढी वर्ष तुमच्यासाठी जे काही केलं, ते वाया गेलं का? त्याला काहीच अर्थ नाही का?"
"अगं आई, म्हणजे दादाने जे काही केलं त्याची परतफेड म्हणून आम्ही सगळंच ऐकलं पाहिजे असं आहे का?"
सागरचं उत्तर थोडं कडवट उत्तर दिल.
क्षणभर खोलीत शांतता पसरली. पंख्याचा आवाज आणि बाहेरचा गोंगाट ऐकू येत होता.
समोरच्या टेबलावर काही कागदपत्रं ठेवलेली होती, घर विक्रीची. त्या कागदावर सहया करून त्याने ते कागदपत्रे टेबलावर ठेवली आणि तो तिथून काहीही न बोलता निघून गेला.
ह्या घरचा दादा म्हणजे अभिजीत देशमुख, कुटुंबातला थोरला मुलगा. देशमुख कुटुंबात तीन भावंडं अभिजित, रोहन, आणि लहान सागर. आई-वडील दोघेही नोकरी करणारे. पण त्यांच्या वडिलांचा अचानक अपघात झाला आणि घरावर संकट आलं.वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा तो फक्त सोळा- सतरा वर्षांचा होता. दहावीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण झालेला. मित्रांच्या गप्पा,त्याच प्रेम, स्वप्नं, सगळं मागे पडलं. कारण घरात जबाबदारी नावाचं मोठं ओझं आलं होतं अंगावर.
त्या दिवशीपासून त्याच आयुष्य बदललं. आईला कामावरून यायला उशीर व्हायचा, म्हणून अभिजीतने स्वतःला वडिलांच्या जागी उभं केलं. सागर आणि रोहनच्या शाळा, त्यांचे कपडे, फी, अभ्यास सगळं काही त्याने सांभाळलं.
त्याचं कॉलेज तर सुरु देखील झालं नव्हतं.त्यामुळे नोकरी मिळाली नव्हती. तरीही तो आईला काळजीत पाहून म्हणाला,
“आई, तू काळजी करू नकोस. मी सगळं पाहतो.”
आई म्हणाली,
“बाळा, तुझं भविष्य आधी ठरव.. तू कॉलेजला ऍडमिशन घे. "
पण अभिजितने आता स्वतःला वडिलांच्या जागेवर ठेवून खऱ्या अर्थाने त्याचा थोरलेपणा जपला, थोरलेपण म्हणजे आधी स्वतः नव्हे, तर सगळ्यांचा विचार करणं.
त्याने आधी स्वतःसाठी गॅरेजमध्ये नोकरी शोधली आणि रात्रशाळेत जाऊ लागला. ऑटोमोबाईल इंजिनिअर होण्याच्या स्वप्नाला त्याने तिथे मुरड घातली.
रोहन आणि सागरच्या वागण्यामागच कारण समजेल का??
क्रमश :-
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा