Login

दिव्याखाली अंधार भाग 1

Marathi Story
जलदलेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025

कथा _ दिव्याखाली अंधार भाग 1


"प्रियंका,सागर लवकर या नाष्टा करून घ्या. मला उशीर होतोय."
वेदिकाने आपल्या दोन्ही मुलांना आवाज दिला.

तिचा आवाज ऐकून महेश ही किचन मध्ये आला.
तो वेदिकाला म्हणाला,

"हे काय आज तर रविवार. आज कुठे निघालीस तू सकाळी सकाळी?"

"तुम्ही विसरलात का मी एक शिक्षिका आहे. एका शिक्षकेचं काम असतं आपल्या विद्यार्थ्यांना हवी तेव्हा हवी ती मदत करणं. आज मुलांचा एक्स्ट्रा लेक्चर आहे त्यासाठी निघाले."

"मी विसरलो नाहीच पण तू विसरते आहे तुझ्याही घरात दोन मुलं आहेत ज्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं तुझं काम आहे."
महेश चिडून म्हणाला. तेवढ्यात त्यांची दोन्ही मुलं प्रियंका आणि सागर तिथे आले.

त्यांना बघून वेदिका महेशला म्हणाली,

"मला उशीर होतोय. मुलांसमोर मला कुठलाही वाद घालायचा नाही,तेव्हा निघते मी.

महेश आणि वेदिका एक मध्यमवर्गीय जोडपं. महेश एका कंपनीत नोकरीला होता. कंपनीच्या कामानिमित्त त्याला सतत टूरवर जावं लागायचे.तर वेदिका शिक्षिका होती.

प्रियंका आणि सागर हे त्यांचे दोन मुलं. प्रियंका बारावी मध्ये होती तर मुलगा सागर नववी मध्ये. बाहेरून बघणाऱ्यांना हे एक सुखी कुटुंब वाटत होते परंतु महेश आणि वेदिका मध्ये असलेल्या मतभेदांमुळे या कुटुंबात सतत तणाव निर्माण होत होता.

महेश ला वाटायचे आपण टूरवर असतो, वेदिका ने नोकरी न करता घरी मुलांबरोबर थांबावे. मुलांचा अभ्यास घ्यावा. तर वेदिकाला स्वतःची नोकरी सोडायची नव्हती. तिचं म्हणणं होतं की,मुलांना संस्कार लावणं त्यांना सांभाळणं हे फक्त आईच काम नाही तर वडिलांचेही काम आहे. त्याचे सततचे टूरवर जाणे तिला पसंत नव्हते. तिचे म्हणणे होते महेशने ती नोकरी सोडून दुसरी नोकरी शोधावी जेणेकरून त्याला कुटुंबासोबत जास्त काळ राहता येईल. पण महेश ही वेदिकाचं ऐकायला तयार नव्हता. या गोष्टींमुळे दोघांमध्ये सतत भांडण होत होती. याचा सगळा परिणाम मुलांवर होत होता.

आपण जास्त दिवस बाहेर असतो म्हणून महेश ने मुलांना खूपच मोकळीक दिली होती. ते मागतील ती गोष्ट तो त्यांना कुठलेही कारण न विचारता पुरवत होता. याउलट वेदिका प्रमाणापेक्षा जास्त कडकपणे मुलांशी वागत होती.

आपल्या आई-बाबांचे असलेले विरुद्ध स्वभाव यामुळे मुलं मधल्या मध्ये भरडली जात होती.

वेदिका सगळ्यांना नाश्ता देऊन बाहेर पडली.तिच्या बाहेर जाण्यामुळे महेशच्या चेहरा उतरला होता. दोघांमध्ये झालेल्या वादामुळे मुलं एकही शब्द न बोलता नाश्ता करायला बसले.

घरातल्या वातावरणातला ताण कमी करण्यासाठी महेश मुलांना म्हणाला,

"चला,तुमच्या आईला जाऊ द्या शिकवायला. आपण तिघे आज मस्त मूव्ही बघायला जाऊ. काय बच्चे कंपनी काय म्हणता."

"बाबा खरंच..."

मुव्ही चे नाव ऐकून सागर भलताच खुश झाला.

"हो, मग काय जोक करतोय का? लगेच आवरा पटकन मूव्ही चे तिकीट बुक करतो."

प्रियंका आणि सागर ने आपला नाश्ता लवकर संपवला आणि तिघेही तयार होऊन बाहेर पडले.
दुपारी दोन वाजता वेदिका घरी आली. घरी कोणीही नाही बघून तिने महेश ला फोन लावला

"महेश कुठे आहात तुम्ही?"

"आम्ही मुव्ही बघायला आलो आहे आणि संध्याकाळी येणार आहे.जेवायला आमची वाट पाहू नको."

महेश ने एकदमच वेदिकाला सगळं सांगून टाकले.

"अरे पण महेश..."
वेदिका पुढे काही बोलणार तोच महेश ने फोन कट केला.
आपला फोन कट केल्यामुळे इकडे वेदिका चिडली होती.
क्रमशः
महेश वेदिका मधील वाद कोणते वळण घेईल वाचा पुढील भागात...