Login

तगमग भाग तीन

दोन जीवांची होणारी घालमेल The Restlessness
तगमग भाग तीन

राज आणि रजनी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. रजनीच कॉलेज पूर्ण झालं की लवकरच ते लग्न करणार होते. राज स्वभावानं खरंच सालस होता. पण रजनी मात्र हट्टी. राजला नानांच्या घरी राहताना कुठेतरी उपरेपणा वाटायचा. नाना आणि माई राजवर भरभरून प्रेम करायचे पण तरीही लहान वयातच आई-वडिलांचे छत्र हरवल्याने राजच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड आणि भयगंड निर्माण झाला होता.

त्या विरुद्ध रजनी आत्मविश्वासाने भरलेली आयुष्याकडे नव्या उमेदीने बघणारी. राजच्या एकट्या मनाला तिने नवसंजीवनी दिली होती. रजनीच्या सहवासाने राज आत्मविश्वासानं जगू लागला होता. सुरुवातीला तो पेंटिंग बनवायचा पण तारुण्य सुलभ भावना आणि रजनीच्या प्रेमानं त्याला कविता आणि चारोळ्या करण्याचा छंद जडला.

“काय रे राज तू स्वतःला मोठा कवी म्हणतोस आणि माझ्यासारखी सुंदर तरुणी तुझ्या आयुष्यात असताना तू माझ्यावर एकही कविता लिहीत नाहीस?”रजनी लटक्या रागाने राजवर चिडे. राजमात्र चेहऱ्यावर मंदस्मित ठेवून मनातल्या मनात तिच्या या चिडण्यावर खुश होऊन जाई. ”अरे मी तुझ्यावर चिडली आहे आणि तुला काय आनंदाच्या उकळ्या फुटत आहे?” रजनी वैतागाने बोले. त्यावर मगराज एखादा हिंदीतला शेर तिच्यासाठी म्हणे

दोस्ती…..
शब्द नही जो कहा जाये
रुह नही जो मिट जाये
सफर नही जो मुकाम पाये
ये तो वो ऐहसास है
जिसके लिए जिया और सिर्फ जिया जाये.

राजने असा एखादा हिंदीतला शेर ऐकवला की रजनी अजूनच फुरंगटून त्याला म्हणे,”स्वतःला कवी म्हणतोस ना मग दुसऱ्या गीतकारांचे शेर नको ऐकवु स्वतःचं काहीतरी ऐकव.

ही मनापासून ही दुवा आहे
हात हाती तुझा हवा आहे
नेहमी तीच ती जडे व्याधी
रोग माझा कुठे नवा आहे?

राजने या अशा चार ओळी म्हंटल्या की रजनी लाजेने लालबुंद होवून जाई.

त्यादिवशी रजनीचा परीक्षेचा रिझल्ट लागला होता. राजुरी अभ्यासात हुशार होता तरी रजनी मात्र अगदी सर्वसामान्य होती. ती केवळ डिग्रीला पास झाली होती. तरीही नानांना तीच कौतुक होतं. रजनी पास झाली म्हणून आज राज आणि रजनी मित्रांना पार्टी देण्यासाठी एका ढाब्यावर जाणार होते. रजनी खरंच एकदम उत्साहाचा धबधबा होती. संध्याकाळच्या पार्टीसाठी ती छान तयार झाली. गुलाबी रंगाचा अनारकली चेहऱ्यावर हलकासा मेकअप हातात पांढऱ्या हिऱ्यांच्या बांगड्या कानातले डूल आणि केसांचा बांधलेला छानसा बन एखाद्या वृक्ष वाळवंटात थंड हवेची झुळूक यावी आणि रुखरुखलेल्या मनाला शांत करून जावी असं तिच्याकडे बघून राजला वाटलं.

राज अगदी शांतपणे कार चालवत होता. गाडीतल्या एफ एम वर एक रोमँटिक गाणं सुरू होतं रजनी कधी त्याच्याकडे पाही आणि कधी गाडीच्या खिडकीच्या काचेतून बाहेर. “राज आपल्याला संध्याकाळी साडेसात पर्यंत तिथे पोहोचायचं आहे आणि तु ज्या वेगाने गाडी चालवतो आहेस ना तर मला तरी वाटतं की तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला 24 तास नक्कीच लागतील.”रजनीने मुद्दाम राजची खोडी काढली. न जाणू कसं काय राजने ही गाडीची स्पीड वाढवली. आणि मग रजनी हसायला लागली. रजनीचा जसजसा हसण्याचा वेग वाढत होता तसतसा राजा गाडीचा आहे वेग वाढत होता. रजनीला तर जणू वाटत होतं की तिला पंख फुटले आहेत आणि ती वाऱ्यावर स्वार होऊन चांदण्यांशी बोलते आहे. हायवेवर आपण किती स्पीडने गाडी चालवतो आहे हे मात्र राजच्या लक्षात आलं नाही. रजनीचा हसना टाळ्या वाजवून हवेवर स्वतःची ओढणी उडू देणार त्याला खूपच चॅलेंजिंग आणि छान वाटत होतं तेवढ्यात जे नको व्हायला होतं ते घडलं. विरुद्ध दिशेने एक मोठा कंटेनर येत होता एक क्षण राजचं लक्ष विचलित झालं आणि कंटेनर ने गाडीला जोरदार धडक दिली. राजने ब्रेक दाबले, स्पीड कमी केली, पण तोपर्यंत खूप वेळ होऊन गेला होता. राज आणि रजनीची गाडी एका रस्त्यालगतच्या झाडावर आदळली होती आणि डोक्याला जबर मार लागल्याने रजनी तिथे निपचित पडली होती. राजलाही जबर दुखापत झाली होती. त्याचा एक हात आणि पाय जायबंदी झाला होता. तो कार मधून विरुद्ध दिशेला फेकल्या गेला होता. झालेल्या अपघाताचा धक्का इतका होता की केवळ विचारांनाच राज बेशुद्ध पडला. दोन दिवसानंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा नाना त्याच्या बाजूला भकास डोळ्यांनी बसले होते. नानांचे असे वीजलेले डोळे बघून राज्य अंगावर सर्कल एक भीतीचा काटा उभा राहिला. त्याने धीर एकवटून कसं बस रजनी हा शब्द उच्चारला. रजनी हे नाव कानावर पडतात नानांच्या डोळ्यातून दोन टप्पोरे अश्रू राजच्या हातावर पडले, आणि राज एकदम सुन्न झाला. रजनीच्या जाण्याने राज अगदी कोलमडून गेला होता. त्याला जगण्याची इच्छा नव्हती पण नानांचा धीराचा आणि संयमाचा हात त्याच्या पाठीवर होता त्यामुळे तो आयुष्याचं काही बरं वाईटही करू शकत नव्हता.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.


🎭 Series Post

View all