मागील भागात आपण पाहिलं कि रागावलेल्या आदितीला आईबाबा समजावतात, तिची चुकी लक्षात आणून देतात आता पाहूया पुढे,
" आदू..., अग जावईबापूंचा कॉल आलेला, तुम्ही बाळाचा विचार करता, त्यासाठी ट्रीटमेंट चालू आहे. तू खुश राहावीस म्हणून इथे आलीस. तुझ्यावर कसला ताण नको म्हणून त्यांनी तू खुश असावीस ह्याकडे लक्ष द्या असं सांगितलं... त्याच दिवशी त्या पोरीने तुला गुड न्यूज मिळाल्यानंतर खालीवर होणार नाही म्हणून ती रूम बदलली. पण तू त्याचा उलटा अर्थ घेतलास. तुझ्या आवडीचा विचार करून तिने ती रूम सजवली. म्हणजे तुझं स्थान अबाधित ठेवलं ना.. तुझ्यासाठी असलेली रूम कायम तुझीच राहणार आहे.
आईबाबाने तिला सगळ्या गोष्टींची जाणीव तसेच ती किती महत्वाची आहे हे पटवून दिल.. तिला तिच्या चुकीची जाणीव झाली.
" आई बाबा, मी उगाच गैरसमज करून घेतला, मुळात मी मनात अढी घेऊनच आल्यामुळे मला सगळंच निगेटिव्हच दिसत गेलं. तुम्ही तिला खुश ठेवलं तरच हे घर कायम आनंदी राहील हे मी विसरलीच. "
त्यावर बाबा हसत म्हणाले,
"आता बॅग भरायचं काम थांबव आणि आईच्या हातचा चहा घेऊन आम्ही तिघं निवांत गप्पा मारूया, काय?"
ती हसली, अश्रू पुसले आणि हळूच म्हणाली,
" मी अर्पिताला देखील सॉरी म्हणते, तिला सुद्धा वाईट वाटलं असेल.... "
" दीदी, तुमचा गैरसमज दूर झाला असेल तर गुलाबजाम खाऊया का???"
एक आवाज आला तस त्यांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर अदिती आणि राहुल हसत गुलाबजामचा डब्बा घेऊन दारात उभे असतात.
त्यावर अदिती फक्त मानेने होकार दर्शविते.
तस अर्पिता पुढे होऊन म्हणाली,
"मी कधीच तुमची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही दीदी खरं सांगू? या घरात मला मुळात आपुलकीच तूम्ही शिकवलीस. लग्नाच्या पहिल्या दिवशी तूम्ही हात पुढं केला होता, आणि तेव्हापासूनच मी स्वतःला या घराची समजायला लागले. तू आमच्यासाठी खूप खास आहात."
राहुल देखील म्हणतो,
"आदू यार, तू घरातली पहिली मुलगी आहेस. आणि तुझ्या प्रेमामुळेच हे घर मोकळं वाटतं. गैरसमज होणं स्वाभाविक आहे, पण नात्यांत गोडवा टिकवायचा असेल, तर संवाद हाच उपाय असतो. तू एकदा तरी बोलायला हवं होतंस. मला मुलगी जरी झाली ना तरी तिच्या आधी तूच आमच्यासाठी असणार विश्वास ठेव.."
हे ऐकून आदितीला तिने किती मोठा गैरसमज केला होता ह्याची तीव्रतेने जाणीव झाली...तिला काही बोलायला देखील सुचलं नाही...
अर्पिता अजून तिच्या जवळ सरकते,
"..दीदी तू माझ्यासाठी फक्त नणंद नाही, तर मोठी बहिणच आहेस. मला फक्त एवढंच सांगायचंय, तू या घराची ओळख आहेस. आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणून... गैरसमज नको करून, प्लीज."
अर्पिता ती बॉक्स तिच्या हातात ठेवते.
"ह्या गुलाबजाम पेक्षा तर गोड तू आहेस...."
राहुल तिला गुलाबजाम भरवतो. अदितीचे डोळे भरून येतात. ती अर्पिताला घट्ट मिठी मारते.
"माफ कर गं. मीच चुकीचं समजून बसले... पण आता एकदाच सांगते, माझी लहान बहिण आहेस तू आणि तुझ्यामुळेच आता ह्या घराला घरपण आहे.. माझ्या आईवडिलांनंतर तूच तर माझं माहेरपण जपणार आहेस, पण त्यासाठी मी आधी भरभरून तुला द्यायला हवं ना.... वहिनीला आपलंस केल तरच माझा भाऊ माझा राहील..."
त्यावर राहुल मिश्कील हसतो,
"मग, आता हे सगळे गुलाबजाम माझे ना??"
त्यावर सगळे एकत्र हसतात. गैरसमज दूर होऊन घरात पुन्हा एकदा प्रेमाचा गोड गंध दरवळतो, गुलाबजामसारखा.
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा