डिसेंबर -जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
नशिबाचे धागे भाग ३९
दीर्घकथा लेखन स्पर्धा
नशिबाचे धागे भाग ३९
अन्वी सिंघानियाच्या अटकेनंतर पुण्याच्या वातावरणातील तो जडपणा जणू निवळला होता. सिंघानिया साम्राज्याचा क्रूर खेळ थांबला होता आणि आरवने स्वतःच्या बलिदानातून जे नाते वाचवले होते, ते आता अधिक घट्ट झाले होते. आरव आणि मिताली आता त्यांच्या त्या लहानशा पण हक्काच्या घरात परतले होते. 'देशपांडे विला' अजूनही कायदेशीर कचाट्यात होता, पण त्यांना आता मोठ्या वाड्याची ओढ नव्हती; त्यांना ओढ होती ती एकमेकांच्या सहवासाची.
सकाळची कोवळी किरणं खिडकीतून आत येत होती. आरव बराच काळानंतर शांत झोपला होता. मितालीने त्याच्याकडे निहाळले. त्याच्या चेहऱ्यावरचे ते तणावाचे ओझे आता कमी झाले होते. तिने हळूच उठून चहा ठेवला. आजचा दिवस खास होता. आज 'S.D. Innovations' या त्यांच्या स्वतःच्या कंपनीच्या नवीन ऑफिसचं उद्घाटन होतं.
"गुड मॉर्निंग, मिसेस देशपांडे!" आरवने मागून येत मितालीच्या खांद्यावर हात ठेवला.
"गुड मॉर्निंग! आज लवकर जाग आली?" मितालीने हसत विचारले.
"आज नवीन सुरुवात आहे ना मिताली. अन्वीच्या त्या काळकोठडीतून बाहेर आल्यावर आज मोकळा श्वास घेतोय असं वाटतंय. हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं. जर तू दीपकच्या मदतीने ते सत्य शोधलं नसतं, तर कदाचित मी आयुष्यभर त्या अपराधीपणात जगलो असतो," आरवने मितालीचा हात आपल्या हातात घेतला.
"आरव, नात्यात कधीच एकाने ओझं वाहायचं नसतं. आपण 'नशिबाचे धागे' एकत्र विणले आहेत, हे विसरू नका. आता मागे वळून बघायचं नाही," मितालीने त्याला धीर दिला.
दुपारी एका साध्या पण अत्यंत सुंदर सोहळ्यात आरवच्या नवीन ऑफिसचे उद्घाटन झाले. सुलोचनाच्या हस्ते रिबन कापण्यात आली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने आपल्या मुलाला शून्यातून विश्व निर्माण करताना पाहिले होते.
"आरव, तुझे बाबा जिथे कुठे असतील, त्यांना आज तुझा खूप अभिमान वाटत असेल," सुलोचना गदगदल्या स्वरात म्हणाली.
ऑफिसमध्ये आरवचे काही जुने आणि विश्वासू कर्मचारी परतले होते, ज्यांनी अन्वीच्या दहशतीमुळे नोकरी सोडली होती. वातावरण उत्साहाने भरलेले होते. पण या उत्साहाच्या गर्दीतही आरवची नजर कोणालातरी शोधत होती.
"कोणाची वाट बघताय आरव?" मितालीने जवळ येत विचारले.
"आजोबांची..." आरव हळू आवाजात म्हणाला. "भलेही त्यांनी जे केलं ते चुकीचं होतं, पण आज ते असते तर त्यांनाही आनंद झाला असता. मला त्यांच्याबद्दल राग नाहीये मिताली, फक्त एक मोठी पोकळी वाटतेय."
मितालीने त्याचा हात दाबला. "ते त्यांच्या आशीर्वादाच्या रूपात आपल्यासोबतच आहेत."
उद्घाटन सोहळा संपत आला असताना, एक कुरिअर बॉय तिथे आला. त्याने आरवच्या नावे एक मोठे पार्सल दिले होते. आरवला वाटले की कोणीतरी शुभेच्छा देण्यासाठी भेटवस्तू पाठवली असेल. त्याने ते पार्सल उघडले.
आत एक जुना, लाकडी पाळणा होता. तो पाळणा खूप मौल्यवान लाकडाचा आणि त्यावर बारीक नक्षीकाम असलेला होता. त्यासोबत एक चिठ्ठी होती:
"आरव आणि मिताली, नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा. हे तुमच्या घराण्याचे जुने संचित आहे, जे योग्य वेळी तुमच्याकडे पोहोचले पाहिजे होते. हा पाळणा रिकामा नाही, यात तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि काही गुपितं लपलेली आहेत. लवकरच आपण भेटू."
तुमचा एक शुभचिंतक.
आरव आणि मिताली चक्रावून गेले. आजोबांच्या किंवा वडिलांच्या ओळखीतील कोणीतरी हे पाठवले असावे, असा त्यांचा अंदाज होता. पण सुलोचनाने तो पाळणा पाहताच तिची चर्या पालटली. तिने भीतीने पाळण्याला स्पर्श केला.
"आई, काय झालं? तुम्ही इतक्या घाबरलेल्या का आहात?" आरवने विचारले.
"हा... हा पाळणा इनामदारांच्या वाड्याचा आहे. पण हा तर वर्षांपूर्वी आगीत जळाला होता असं मला सांगण्यात आलं होतं. आणि या चिठ्ठीवरचं अक्षर... आरव, हे अक्षर शशिकांतचं नाहीये. हे अक्षर तुझ्या आजीचं, इंदुमती देवींचं सुद्धा नाहीये," सुलोचना थरथरत्या आवाजात म्हणाली.
आरवने चिठ्ठी पुन्हा तपासली. अक्षर खूप जुन्या पद्धतीचे आणि वळणदार होते.
रात्री घरी आल्यावर आरवच्या मनात त्या पाळण्याबद्दल विचार सुरू होते. त्याने पाळणा हॉलमध्येच ठेवला होता. रात्रीच्या शांततेत अचानक पाळणा आपोआप हलायला लागल्याचा भास आरवला झाला. तो उठून हॉलमध्ये आला. पाळणा स्थिर होता, पण तिथून एक विशिष्ट सुवास येत होता—तोच अत्तराचा वास जो मारुती काकांनी वडिलांच्या अपघाताच्या रात्री अनुभवला होता.
आरवने पाळण्याची नक्षी नीट तपासायला सुरुवात केली. त्याला पाळण्याच्या खालच्या बाजूला एक गुप्त कप्पा सापडला. त्याने तो उघडला, तर त्यात एक लहान डायरी आणि काही जुनी सोन्याची नाणी होती.
डायरीच्या पहिल्या पानावर लिहिले होते'
आरवने वाचायला सुरुवात केली. त्याला धक्का बसला की देशपांडे आणि इनामदार कुटुंबातील शत्रूत्व हे फक्त जमिनीसाठी नव्हते. पन्नास वर्षांपूर्वी या दोन कुटुंबांनी मिळून एक मोठा खजिना किंवा गुप्त मालमत्ता मिळवली होती, जी त्यांनी एका विशिष्ट ठिकाणी लपवून ठेवली होती. जोपर्यंत दोन्ही घराण्यांचे वारस एकत्र येत नाहीत, तोपर्यंत ती मालमत्ता कोणालाच मिळणार नव्हती.
"आरव, काय वाचताय?" मिताली डोळे चोळत बाहेर आली.
आरवने तिला ती डायरी दाखवली. "मिताली, आपला हा करार फक्त आपला नव्हता. आपल्या पूर्वजांनी सुद्धा एक करार केला होता. आणि त्या खजिन्याचा शोध घेण्यासाठीच कदाचित शशिकांत आणि अन्वी आपल्या मागे लागले होते."
"म्हणजे अजूनही कोणीतरी आहे जो या खजिन्याचा शोध घेतोय?" मितालीने विचारले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आरवच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती आली. तो एक वकील होता, पण आजोबांचा किंवा सिंघानियांचा नव्हता.
"मी मिस्टर अभय जहागीरदार यांचा प्रतिनिधी आहे," त्याने आपली ओळख करून दिली. "माझ्या अशिलाचा असा दावा आहे की, तुम्ही जो नवीन प्रोजेक्ट सुरू केला आहे, त्या जमिनीचा काही हिस्सा त्यांच्या नावावर आहे. आणि त्यांनी तुम्हाला एका डिनरसाठी आमंत्रित केलं आहे."
'जहागीरदार' हे नाव पुण्याच्या जुन्या इतिहासात खूप मोठे होते, पण ते आता सक्रिय नव्हते. आरवला संशय आला की हे नाव अचानक समोर कसे आले.
"मिताली, मला वाटतंय अन्वी आणि शशिकांत फक्त प्यादी होती. खऱ्या खेळाची सुरुवात आता होतेय," आरव गंभीरपणे म्हणाला.
आरव आणि मितालीने ठरवले की ते त्या डिनरला जातील. पण या वेळी ते पूर्ण तयारीनिशी जाणार होते. त्यांनी मारुती काकांना आणि दीपकला सावध केले होते.
जहागीरदार यांचा बंगला शहराबाहेर एका टेकडीवर होता. तिथे पोहोचल्यावर आरवला एक वेगळीच जाणीव झाली. बंगल्याची वास्तू देशपांडे विलापेक्षाही जुनी आणि भव्य होती.
आत गेल्यावर त्यांना एका ७० वर्षांच्या वृद्धाने स्वागत केले. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत रुबाबदार होते.
"आरव... तू हुबेहूब तुझ्या पणजोबांसारखा दिसतोस," अभय जहागीरदार हसून म्हणाले. "आणि मिताली, तुझी चित्रं मी पाहिली आहेत. त्यातलं 'सत्य' मला खूप भावलं."
डिनर दरम्यान त्यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या ज्याने आरवचे पाय जमिनीला टेकले नाहीत. "आरव, तुला वाटतंय की तुझ्या वडिलांचा मृत्यू अपघाती होता किंवा शशिकांतने केला होता. पण खरं सत्य हे आहे की, तुझ्या वडिलांनी त्या खजिन्याचा पत्ता शोधला होता आणि ते तो खजिना सरकारला सोपवणार होते. म्हणून त्यांना वाटेतून हटवलं गेलं. आणि तो खजिना कुठे आहे, हे फक्त त्या 'पाळण्यात' लपवलेल्या नकाशामुळे समजू शकतं."
आरव चपापला. "तुम्हाला पाळण्याबद्दल कसं माहीत?"
"कारण तो पाळणा मीच पाठवला आहे," जहागीरदार शांतपणे म्हणाले. "पण सावध रहा आरव, तो पाळणा फक्त सुख देत नाही, तो शापही घेऊन येतो. जोपर्यंत तुम्ही त्या खजिन्याचं रहस्य उलगडत नाही, तोपर्यंत तुमचं कुटुंब सुरक्षित नाही."
आरव आणि मिताली तिथून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या मनात भीती दाटून आली होती. खजिना? शाप? आणि त्यांच्या कुटुंबावर असलेले संकट?
काय आहे तो खजिना? जहागीरदार आरवचे मित्र आहेत की नवीन शत्रू? आणि तो पाळणा आरव-मितालीच्या आयुष्यात कोणता मोठा बदल घडवून आणणार?
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
©®जान्हवी साळवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा