Login

नारी म्हणजे शक्ती

नारीविषयी लेख
म-महिला
हि- हिरकणी
ला- लावण्यवती

नारी म्हणजे शक्ती. नारी म्हणजे सहनशीलतेची मूर्ती. नारी म्हणजे शालिनता. नारी म्हणजे धगधगता अंगार, प्रसंगी रणचंडिकेचा अवतार.

नारी विश्वाची अनमोल निर्मिती. ती किती कर्तृत्ववानआहे याची प्रचिती अगदी पौराणिक,पुरातन काळापासून आजतागायत आहेच की.ते वेगळे सांगायला नको.

किती तरी रूपे नारीची. ती मुलगी, आई, बहीण, पत्नी, सून, सासू, आजी अशी किती तरी नाती व्यवस्थित जपत संभाळून घेते. ती अबला नसून सबला आहे. कालिकामाता जिने दैत्याचा नाश केला. लक्ष्मी जी धनाची देवता आहे. सरस्वती विद्येची देवता.झाशीची राणी न डगमगता शत्रूंशी वीरपणे लढली. जिजामाता ज्यांनी शिवरायांसारखा राजा घडवला. महारणी ताराबाईने औरंगजेबाला रडवले. रजिया सुलतान, हिंदुस्थानची पहिली महिला सुलतान बनली. या सर्व कर्तृत्वान महिलाच होत्या की ज्यांनी आपल्याला कार्याचे झेंडे रोवून इतिहासात अजरामर झाले.

आज आपण एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर आहोत. आधी चूल आणि मुलं इथेपर्यंत मर्यादित असणारी स्त्री, आज पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. त्या त्या क्षेत्रात तिने तिच्या कार्याची चुणूक दाखवून दिली आहे.घरची लक्ष्मी, स्वामिनी तर आहेच पण तिचे कार्य घरापर्यंत मर्यादित न राहता बाहेरच्या जगात ही तेवढ्याच ताकदीने ती वावरते. त्यासाठी तिला अगदी तारेवरची कसरत करावी लागते.

महिला दिन या एकाच दिवशी तिचा सन्मान करणे कितपत उचित आहे. तिचा तर रोजच सन्मान, आदर करावा अशीच आहे ना ती. कोणतीही अपेक्षा न करता ती सतत इतरांसाठी झटत असते. मग तिचे, तिच्या कामाचे कौतुक तर करायलाच हवं ना. काही नाही निदान एखादं फूलं किंवा एखादं छोटसं चाॅकलेट ही पूरेसे आहे तिच्या चेहऱ्यावरील आनंद टिपायला.

तिच्या जास्त अपेक्षा नसतातच तशा. तिला थोडा वेळ द्या. तिच्यावर कोणतं काम लादण्यापेक्षा तिच्या मनाचा कौल घ्या. तिची मर्जी विचारात घ्या.तिला काय करायचे ते विचारा. तिच्या आवडी निवडी, तिच्यातील गुणांना, कलेला वाव देऊन, ती कला,छंद जोपासला प्रोत्साहन दिले तर ती तिच्या कामात नक्कीच यशस्वी होईल. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जे आनंद दिसेल तो खूपच आनंदायी असेल तिच्याबरोबर आपल्याही.