Login

परशुरामांचा शाप भाग २

कर्ण आणि परशुराम यांची ही पौराणिक कथा आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - परशुरामांचा शाप
भाग: २


" सांगा, गुरुदेव." कर्णाच्या मुखावर हास्य आले.

"कर्णा, अनेक दिवसांपासून मी विश्रांती घेतलेली नाही. काही क्षण निद्रा घेण्याची माझी इच्छा आहे. मी उठेपर्यंत माझी निद्रा खंडित होणार नाही, याची काळजी घेणार का तू?" परशूरामांनी विचारले.

"अवश्य गुरुदेव, आपण निश्चिंतपणे विश्रांती घ्या. मी आपली निद्रा जराही भंग होऊ देणार नाही."

आपल्या शिष्याचे गुरुप्रती असलेले प्रेम पाहून परशुरामांनाही समाधान वाटले.

"कर्णा, डोक्याखाली आधार घ्यायला आजूबाजूला एखादी शिळा असेल तर जरा पाहशील का?" असे म्हणत परशुराम जमिनीवर बसले.

" हे काय बोलत आहात गुरुदेव? मी असताना तुम्हाला दगड कशाला पाहिजे? तुम्ही माझ्या मांडीवर डोके ठेवा आणि निर्धास्त झोपा." कर्ण त्यांच्या बाजूला बसत म्हणाला.

"नको वत्सा, माझ्या निद्रेमुळे तुझी सर्व कार्ये अडखळून राहतील."

" गुरुदेव, गुरुदक्षिणा तर शिष्यत्वाची खरी कसोटी असते. मग ती सौम्य कशी असणार? तुम्ही निश्चिंत होऊन झोपा."

"जशी तुझी इच्छा." असे म्हणत परशुराम हसले आणि त्याने आपले डोके कर्णाच्या मांडीवर ठेवले.

आडवा होताक्षणीच परशुरामांना गाढ झोप लागली. कर्णाच्या मनात मात्र आता विचारांचे वादळ उठले होते.

'गुरुदेवांना माझ्यावर किती विश्वास आहे आणि मी मात्र त्यांच्याशी असत्य बोलून त्यांच्या विश्वासाला तडा देत आहे. मी त्यांच्याशी असत्य बोलून धनुर्विद्या प्राप्त करून घेतली आहे. माझे हे असत्य मला सलत आहे. आता मी हा ढोंगावरचा पडदा कसा दूर करू? त्यांना सत्य कसे सांगू?'

तेव्हाच अचानक कुठून तरी एक कीटक कर्णाच्या दिशेने येऊ लागला. तो सरळ कर्णाच्या मांडीवर चढला. कर्णाची नजर त्याच्यावर पडली, पण आपल्या गुरुची निद्रा भंग होऊ नये म्हणून तो तसाच अचल राहिला.

आणि पुढच्याच क्षणी त्या कीटकाने कर्णाच्या मांडीचा चावा घेतला.

'अरेरे! हा कीटक माझ्या मांडीचा चावा घेत आहे. हा रक्तपिपासू माझे रक्त प्राशन करत आहे. मला स्थिर राहावे लागेल, कारण मी हललो तर गुरुदेवांच्या निद्रेत बाधा येईल. ही माझ्या गुरुदक्षिणेची कसोटी आहे. कोणत्याही परिस्थितीत मला यात सफल व्हावेच लागेल.'

कर्णाने आपले डोळे मिटले. त्याला असह्य यातना होत होत्या. आपल्या वेदना आतल्या आत दाबून त्याने स्वतःला दगडाप्रमाणे स्थिर ठेवले. एका बाजूला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि दुसऱ्या बाजूला मांडीतून प्रचंड प्रमाणात रक्त ओघळत होते.

काही वेळानंतर परशुराम जागे झाले. उठाक्षणीच त्यांच्या हाताला काहीतरी ओलसर लागले. त्यांनी आपला हात पाहिला. त्यांचा हात रक्ताने माखला होता.