Login

परशुरामांचा शाप भाग ३

परशुराम आणि कर्ण या गुरुशिष्याची ही कथा आहे
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - परशुरामांचा शाप
भाग: ३


परशुरामांनी क्षणाचाही विलंब न करता त्या कीटकाला कर्णाच्या मांडीवरून दूर केले.

" अरे वत्सा! त्या कीटकाने तुझे अंग विदीर्ण केले आहे, तुझे शरीर रक्तबंबाळ झाले आहे आणि तरीही तू काहीच प्रतिकार केला नाहीस?"

"नाही गुरुदेव, आपण माझ्या मांडीवर शयन करत होतात. मी जर हललो असतो, तर आपल्या विश्रांतीत व्यत्यय आला असता आणि तुमची निद्रा भंग झाली असती."

"वत्सा, माझ्या निद्रेसाठी तू इतके कष्ट सहन केलेस? तू खरोखर धन्य आहेस बाळा. तुझ्या त्यागाने तू माझा सर्वश्रेष्ठ शिष्य असल्याचे सिद्ध केले आहेस. आज तुझ्यात मला शिवि राजांची झलक दिसली. असेच एकदा महाराज शिवि यज्ञकुंडाजवळ बसले होते. तेव्हा एक कबूतर थरथरत त्यांच्या आश्रयाला आले. त्या कबुतराच्या मागे एक भुकेला गरुड लागला होता. गरुडाने राजाकडे आपले भक्ष्य मागितले, पण आश्रयाला आलेल्या कबुतराला त्या गरुडाच्या स्वाधीन करणे राजा शिविला योग्य वाटले नाही. त्याने गरुडाला स्वतःच्या मांडीचे मांस अर्पण करून त्या कबूतराचे प्राण वाचविले. खरेच, धन्य होता तो राजा शिवि. हे असे करण्याचे सामर्थ्य फक्त क्ष..." बोलता बोलता परशुराम मध्येच थांबले आणि त्यांनी कर्णाकडे बघितले.

"तू कोण आहेस?" त्यांनी कर्णाला गंभीर आवाजात विचारले.

"तुम्ही मला असा प्रश्न का करत आहात गुरुदेव?"

"हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही."

"क्षमा असावी गुरुदेव, परंतु मला तुमचा प्रश्न समजला नाही."

"तसे असेल तर स्पष्ट शब्दात विचारतो. तू ब्राह्मण आहेस का?"

" त... त... तुम्ही मला असे विचारण्यामागे काय कारण आहे गुरुदेव?"

" कारण ही इतकी सहनशक्ती एका ब्राह्मणात असणे संभवच नाही. हे सामर्थ्य, हे दुर्दम्य धैर्य, हे वेदना न जुमानणारे हृदय फक्त आणि फक्त एका क्षत्रियातच असू शकते."

हे ऐकताच कर्ण क्षणभर स्तब्ध राहिला.

"हो गुरुदेव, तुम्ही बरोबर ओळखले. मी ब्राह्मण नव्हे. मी एक सुतपुत्र आहे." कर्णाने आपली मान खाली घालत म्हटले.
हे ऐकताच परशुरामांच्या डोळ्यात क्रोध ओसंडून वाहू लागला.

"सुतपुत्र? म्हणजे तू कपट केलेस? माझ्याशी तू खोटे बोललास?"

"खोटे नव्हे गुरुदेव, मी फक्त एक सत्य लपवले होते, कारण मी स्वतःची ओळख सांगितली असती, तर या विद्येचे द्वार माझ्यासाठी कायमचे बंद झाले असते. त्याच भीतीने मला हा मुखवटा धारण करावा लागला."

"तू माझा विश्वासघात केला आहेस, तू मला फसवले आहेस कर्णा."

"गुरुदेव, तुम्हाला फसवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला फक्त शस्त्रविद्या मिळवायची होती."

" तुझा अपराध क्षम्य नाही. मी तुला शाप देतो, जेव्हा तुला या विद्येची सर्वाधिक गरज भासेल, त्या निर्णायक क्षणी ती तुझ्या स्मरणातून नाहीशी होईल."

परशुरामांच्या मुखातून शापवाणी ऐकूनही कर्णाला काहीच वाईट वाटले नाही.

"जशी तुमची इच्छा गुरुदेव. तुम्ही दिलेला दंड मला मान्य आहे. तुमच्याकडून मिळालेली ही धनुर्विद्या मी कधीही वाया जाऊ देणार नाही. तुमच्या चरणाशी जोडलेला हा ज्ञानाचा अमोल ठेवा, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सन्मानाने आणि प्रामाणिकपणाने वापरेन."

आपण दिलेल्या शापाचा कर्णावर काहीच परिणाम झाला नसल्याचे पाहून परशुराम आश्चर्यचकित झाले.

" कर्णा, मी तुला शाप दिला. तरीही तुझ्या मुखावर मला दुःखाचे सावट दिसत नाही. तुला वाईट वाटत नाही का?"

"गुरुदेव, शस्त्रविद्या मिळविणे हेच माझे ध्येय होते आणि ते पुर्ण झाले. मी तुमच्यावर राग धरू शकत नाही. कारण ज्यांच्या हातून मला धनुर्विद्या मिळाली, ते तर माझ्यासाठी प्रत्यक्ष ईश्वरच आहेत."

" तुला आपल्या गुरुला अंधारात ठेवावे असे का वाटले?"

"गुरुदेव, मला क्षमा करा. मी असत्य बोललो नसतो, तर मला ही धनुर्विद्या मिळाली असती का? मी कपट केले, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. जेव्हा मी गुरु द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायला गेलो, तेव्हा त्यांनी मला शिकविण्यास नकार दिला, कारण मी सूतपुत्र होतो. त्यांनी मला फक्त पांडव आणि कौरवांच्या राजपुत्रांसोबत राहून त्यांची सेवा करायला सांगितले आणि तुम्ही सुद्धा फक्त ब्राह्मणांनाच विद्या देत होतात. मला माहित होते की, जर मी माझे सत्य सांगितले, तर तुम्हीसुद्धा मला शिकवणार नाहीत. गुरुदेव, सामर्थ्य असूनही फक्त जातीच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायामुळे मला विद्या मिळाली असती का? माझ्यावर होत असलेल्या या अन्यायामुळेच मला माझ्या अस्तित्वासाठी असत्याचा आश्रय घ्यावा लागला."


"वत्सा, तुझ्या मनात होणारी वेदना मला समजते. तुझ्यावर जो अन्याय झाला, त्याची भरपाई करणे माझ्यासाठी शक्य नाही. मी माझा शापही मागे घेऊ शकत नाही, पण मी तुला एक वरदान देतो. हे माझे विजयी धनुष्य आहे. हे धनुष्य मोठ्या तपस्येने आणि अस्त्रविद्येने सिद्ध झाले आहे. हे धनुष्य धारण करणारा योद्धा कधीही युद्धात अपयशी होत नाही. याची शक्ती विश्वातील कोणत्याही अस्त्राहून श्रेष्ठ आहे. आजपासून हे धनुष्य तुझे आहे. तू याचा उपयोग फक्त धर्मरक्षणासाठी करशील, अशी माझी आशा आहे."

कर्णाने ते धनुष्य आपल्या हाती घेतले.

" तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव असू द्या, गुरुदेव."

समाप्त