Login

पिकनिक भाग १२. - कसोटी

आता दिवस कसोटीचे. कस लागणार आहे दोघांचा.
पिकनिक भाग १२
कसोटी.
मला स्वयंपाक उत्तम येतो असं माझे सर्वच सहकारी म्हणतात. माझा डबा हा माझा कधीच नसतो. सार्वजनिक असतो. मी स्वयंपाकात मदत करू का?” – विदिशा.
“नको नको,” रघुनाथ म्हणाला. “तुझा स्वयंपाकातलं कौशल्य म्हणजे २०१० मधलं. आमच्या आवडी निवडी कश्या जुळतील? तू वरची छोटी मोठी जबाबदारी सांभाळ.”
विदीशाचा चेहरा पडला. ते पाहून काकू हलकेच म्हणाल्या,
“नको अशी हिरमुसली होऊस. मी आहे ना, काळजी करू नकोस. मी देईन तुला एखादा पदार्थ बनवायला.” – काकू म्हणाल्या. मग विदीशाचा चेहरा उजळला.
दोन तीन दिवस विदिशा घराच्या सर्वच कामात थोडा थोडा हातभार लावत होती. घरी दोन गाई होत्या, त्यांचा गोठा साफ करण्याचं काम तिने अंगावर घेतलं. विशाल म्हणाला सुद्धा “ विदिशा हे शेणाचं काम कसं काय घेतलं अंगावर? सवय आहे का तुला?”
“छे, आजकाल घरी गाई कुठे असतात? पण मला नेहमीच गाइंचं आकर्षण वाटायचं. ती हौस पुरवून घेते आहे. मजा येते आहे. आता दूध काढायला पण शिकणार आहे. वहिनी खुश आहेत. आणि विशाल, नुसतं बसून कसं खायचं रे? तू काही तरी आयडिया काढ न? म्हणजे ओशाळवाणं वाटणार नाही.” – विदिशा.
जेवण झाल्यावर काकू म्हणाल्या,
“विदिशा आज मधल्या वेळेचं खाणं तू कर.” – काकू.
“काय करू सांगा.” विदिशा उत्साहाने म्हणाली
“तू ठरव. आम्ही फक्त मदत करू. आज तुझी परीक्षा.” – काकू.
विदीशाने थोडा विचार केला. म्हणाली,
“मैदा आणि रवा कुठे आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर पण लागेल. बटाटे लागतील. सूरी पण लागेल. धने आणि मिरे पण लागतील. थोडा सोडा लागेल. आणि अर्थात कढई झारा आणि तेल. एवढं सामान कुठे आहे ते सांगा.” – विदिशा.
“एवढं सारं! काय करणार आहेस तू?” – रोहिणी.
“सीक्रेट. आहे. आत्ता फक्त मला मैदा आणि रवा द्या. बाकी चार वाजता द्या.” –विदिशा.
मैदा आणि रवा रोहिणीने काढून दिला. विदीशाने तो चांगला मळून ठेवला.
चार वाजता विदीशाने बटाटे उकडत लावले. आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून मग पाट्यांवर वाटायला घेतली. छान पेस्ट तयार झाल्यावर, मग बटाट्याची भाजी करायला घेतली. भाजी झाल्यावर, मळलेल्या मैदामधे थोडा सोडा घालून पुन्हा चांगलं मळून घेतलं. काकू आणि रोहिणी दूर बसून पहात होते. विदिशा ज्या सजतेने आणि स्पीडने सर्व करत होती त्याचं त्यांना कौतुकच वाटत होतं. हे सगळं झाल्यावर तेल तापत ठेवलं. आणि मैद्याची पोळी लाटायला घेतली. अंडाकार पोळी लाटून तिने अर्धी कापली. काकू आणि रोहिणी पहात होत्या, त्यांना कळतंच नव्हतं विदिशा नेमका कोणचा पदार्थ करते आहे ते. आणि मग विदीशाने अर्ध्या कापलेल्या पोळीत बटाट्याच्या भाजीचं सारण भरलं आणि एका बाजूने घडी घालून कढईत समोसा सोडला.
“हा तू कोणचा पदार्थ बनवला आहेस?” काकू ताटात असलेल्या उभ्या समोस्या कडे बघत बोलल्या.
“समोसा म्हणतात याला. हा खाऊन बघा. कसा लागतो आहे ते सांगा.” - विदिशा.
“नको बाई आधी पुरुष माणसांचं होऊ दे मगच आम्ही खाऊ.” – काकू.
“पण मग पदार्थ कसा झाला आहे हे कसं कळणार? शबरीने नाही का आधी बोरं चाखून बघितली होती. घ्या. खाऊन बघा आणि मला सांगा.” विदिशा.
पण विदिशाचं म्हणण दोन्ही बायकांना मानवलं नाही. त्यांनी चव घेतलीच नाही.
सर्व समोसे तळून झाले. एका ट्रे मध्ये विदीशाने तीन बशा भरल्या. आणि विदिशा रोहिणीला म्हणाली की तुम्हीच जाऊन द्या. आणि आवडले तरच माझं नाव सांगा.” – विदिशा.
रोहिणी हसली आणि म्हणाली,
“जा ग कोणी काही म्हणणार नाही वासच किती मस्त येतो आहे आवडतील सर्वांना.”
बाकी समोसे एका ताटा मध्ये काढून ते पोरांच्या समोर ठेवायचे होते. रोहिणी ताट घेऊन बाहेर आली. विदीशाने सर्वांना समोस्या ची प्लेट दिली. समोसा त्या घरात सर्वांनीच प्रथमच पाहीला होता. पहिल्याच घासात सर्वांनी आपली पसंती जाहीर केली.
“विदिशा मी मघाशी जे म्हणालो, ते शब्द मी मागे घेतो. तू सुगरण आहेस याची खात्री पटली आहे. पण हे जे काही तू बनवलं आहेस, त्याचं नाव काय आहे.” – रघुनाथ.
“याला समोसा म्हणतात. हा पदार्थ आता म्हणजे आमच्या काळात खूप लोकप्रिय झाला आहे. आता मुंबई पुण्याला पण मिळतो, पण नागपूरच्या समोश्या ची चव काही औरच असते. मी जो बनवला आहे, तो नागपुरी समोसा आहे. आणखी एक, हा दूसरा समोसा. असा खाऊ नका. मी सांगते तसा खा.” – विदिशा.
“म्हणजे?” – रघुनाथ.
“हे बघा हे मी दही आणलं आहे यात थोडं तिखट मीठ घातलं आहे. आणि पाणी न घालता खूप घुसळलं आहे. आता तो समोसा कुसकरा. खूप बारीक नाही थोड्या मोठ्या फोडी ठेवा. मी करून दाखवू का? द्या प्लेट.” – विदिशा.
मग विदीशाने रघुनाथची प्लेट घेतली समोसा कुसकरला आणि त्यावर दही आणि थोडी शेव भुरभुरली.
“हं, आता चमच्याने एक एक तुकडा खा.” – विदिशा.
“फर्मास विदिशा एकदम फर्मास.” – रघुनाथ म्हणाला. मग काकांनी सुद्धा तसंच करून समोसा खाल्ला. काकू विदिशा जसं सांगत होती तसं करून मुलांना पण देत होती. सर्वांच झाल्यावर काकू आणि रोहिणीने सुद्धा समोसा खाल्ला. सर्वांनाच ही नवीन डिश आवडली होती आणि त्यांनी पसंतीची पावती पण दिली. विदिशा पहिली लढाई जिंकली होती. विशाल तिच्याकडे कौतुकाने बघत होता. त्याच्या नजरेतले कौतुक बघून विदिशा सुखावली.
आता विदिशा काकूंना म्हणाली,
“मी आणि वहिनी सांभाळू स्वयंपाकघर. तुम्ही फक्त मार्गदर्शन करा. तुम्ही फक्त हुकूम सोडा. आम्ही पालन करू.” – विदिशा.
त्यानंतर विदिशा त्या घराची अविभाज्य घटक बनली.
एक दिवस दुपारी फराळ करता, करता काका विदीशाला म्हणाले,
“विदिशा एखाद्या दिवशी तुला येणारी स्पेशल भाजी कर. बघूया तरी.” – काका.
दुसऱ्याच दिवशी विदीशाने सकाळी पाटवडीचा रस्सा बनवला. काकू आणि रोहिणी तिच्याकडे नवलाने बघत होत्या.
जेवायच्या वेळेस काकू म्हणाल्या,
“आज न विदीशाने एक खास भाजी बनवली आहे.” – काकू.
“हूं, काय बनवलं आहे?” – काका.
“याला पाटवडीचा रस्सा म्हणतात. काका जरा झणझणीत आहे. रश्या मध्ये या ज्या वड्या दिसतात, त्याला विदर्भात पाटवडीचा रस्सा म्हणतात. या ज्या गोल पुंगळ्या दिसतं आहेत, त्याला गट्टे की सबजी म्हणतात. पदार्थ एकच आहे, पण राजस्थानात त्याला गट्टे की सबजी म्हणतात.” – विदिशा.
काकांनी पहिलाच घास घेतला, झणझणीत ठसका एकदम डोक्यातच गेला. पण रस्सा आवडला. तर्जनी आणि अंगठा जुळवून छान अशी खूण काकांनी केली.
“पण एवढा तिखट रस्सा, मुलं कशी खातील?” – काका.
“त्यांच्या साठी बिन तिखटाचा बनवला आहे.” – विदिशा.
“विदिशा पोट भरलं पण मन नाही भरलं.” काकांनी पावती दिली आणि विदिशाच्या अंगावर मूठ भर मास चढलं.
मग एक दिवस रघुनाथ म्हणाला,
“विदिशा अग दुपारी तुझं काही खास बनव न, काय नवीन तुझ्या पोतडीतून काढतेस?”
मग त्या दिवशी विदीशाने मधल्या वेळेस तर्री पोहे बनवले. ते पण सर्वांना आवडले. असेच काही दिवस गेलेत. आता हळू हळू सर्व सुरळीत होत होतं.
एक दिवस दुपारी खाणं पिणं झाल्यावर, काका म्हणाले,
“अरे, बरेच दिवस विचारू विचारू म्हणत होतो, पण राहून गेलं. आता आठवलं आहे तर विचारतो. तुमचं लग्न केंव्हा झालं ते तर सांगीतलंच नाहीस? काय ग विदिशा केंव्हा झालं?” – काका.
आता मोठा बांका प्रसंग ओढवला होता. लग्न झालंच नव्हतं तर सांगणार काय कपाळ? विशालला काहीच सुचेना. त्याने विदिशा कडे पाहिले ती हबकली होती. तिच्याजवळ पण याचं उत्तर नव्हतं. शेवटी विशाल ने ठरवलं की सत्य सांगून टाकावं. या देव माणसांना खोटं सांगून, कथा रचून फसवणं योग्य नाही.
“काका तुम्हाला आम्ही ट्रिपची गोष्ट सांगितली आहेच. ट्रीप साठी आम्ही सर्व जण पालघर स्टेशन वर जमलो, तेंव्हा माझी आणि विदिशाची पहिली भेट आणि ओळख झाली. पूर्ण समुद्र सफारी मध्ये आमच्यात कोणचाही संवाद झाला नाही.” विशाल थोडा थांबला, पुढे कसं जायचं यांचा विचार करत होता.
“काय सांगतोस काय? मग काय मावळ्यांनी तुमचं लग्न लावून दिलं का?” – काका. आता काकांचा स्वर थोडा बदलला होता.
“नाही पण आम्ही तीन दिवस ज्या विपरीत परिस्थितीत काढले, त्या प्रसंगात माणसाचा खरं चेहरा दिसतो. मला तिचा आणि तिला माझा स्वभाव पूर्ण कळलं होता, पण आम्हा दोघांत काय चाललं आहे ते आम्ही कधीच बोलून दाखवलं नाही. जेंव्हा रघुनाथ दादा आले, तेंव्हा आम्ही दोघंही अर्धवट शुद्धित होतो. दादांना कणव आली आणि त्यांनी आमची चौकशी केली. नाव विचारल्यावर मी तर नाव सांगितलं आणि विदिशाचं सांगणार, इतक्यात विदिशाच अर्धवट ग्लानीत म्हणाली की मी यांची बायको. बरोबर न रघुनाथ दादा?” विशाल.
“हो मला तो प्रसंग अगदी स्वच्छ डोळ्यासमोर दिसतो आहे. असंच झालं होतं.”– रघुनाथ.
“बस, त्याच क्षणी आम्ही नवरा बायको झालो.” – विशाल.
“विदिशा, हे खरं आहे?” – काका.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – कसोटी -2

दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all