Login

पिकनिक भाग २०. अंतिम

विदिशा पण आली आणि आनंदी आनंद झाला.
पिकनिक भाग २० अंतिम
“साहेब, त्यांच्या कडे आमची पोरं वर्ष दीड वर्ष राहिलीत, आम्हाला पण उत्सुकता आहे त्यांना भेटायची” - विदिशाचे बाबा.
“तुम्ही नंतर भेटा न त्यांना, आधी आम्हाला भेटू द्या. तुम्हाला मी अपडेट देईनच. सर्व गोष्टी क्लियर झाल्यावर तुम्हाला पण सोईचं होईल.” – राऊत साहेब.
दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल म्हणाला,
“राऊत साहेबांचा रीपोर्ट यायला संध्याकाळ उजाडणार आहे तेंव्हा मी जरा सकाळीच ऑफिस मधे जाऊन येतो. तिथे काय परिस्थिती आहे ते कळेल.” – विशाल.
विशाल साधारण १२ वाजता ऑफिस मधे पोचला. त्याला पाहिल्यावर एकाच गोंधळ झाला. सगळे जण कामं सोडून त्यांच्या भोवती जमले. बंदुकीच्या फैरी झडाव्यात, तशा प्रश्नांचा वर्षाव होत होता. कितीही झालं तरी विशाल त्यांचा आवडता बॉस होता. सर्वच त्याला मिस करत होते. विशाल त्यांना शांत करायचा प्रयत्न करत होता, पण कोणीही त्याचं बोलणं मनावर घेतलं नाही. गलका वाढत चालला होता. शेवटी विशालने हार मानली, आणि त्यांची कथा सांगायला सुरवात केली.
पण कोणाचंच त्याच्या कडे लक्ष नव्हतं, गोंगाट चालूच. गलका जरा जास्तच वाढला. प्रत्येकालाच विशालशी बोलायचं होतं. कोणीतरी जाऊन बालचंद्रन साहेबांना ही बातमी दिली. बालचंद्रन हा दुसऱ्या डिपार्टमेंट चा हेड होता. विशाल नाही म्हंटल्यांवर त्यालाच विशालच्या डिपार्टमेंट चा अॅडिशनल चार्ज घ्या लागला होता. दोन एक महिन्या नंतर कोणी सेनगुप्ताची नियुक्ती झाली आणि बालचंद्रन मोकळा झाला. पण ७-८ महिन्यातच सेनगुप्ता राजीनामा देऊन गेला. पुन्हा बालचंद्रन. मग कोणी राकेशकुमार आला, पण तोही चार महिन्याच्या वर टिकला नाही. त्यामुळे तेंव्हापासून बालचंद्रनच दोन्ही डिपार्टमेंट सांभाळत होता. बातमी ऐकल्यावर उत्सुकतेने तो ही आला.
“अरे विशाल कब आये हो भाई? इतके दिवस कुठे होतास? अरे एकदम अदृश्यच झालास आम्ही सर्वच किती काळजीत होतो.” – बालचंद्रन
बालचंद्रन साहेब आल्यावर सर्वच गप्प बसले, आणि त्यांना वाट करून दिली. मग विशालने त्याची सर्व कथा सांगितली.
“म्हणजे विदिशा अजून तिथेच आहे? – बालचंद्रन
“माहीत नाही.” असं म्हणून त्याला सुभानरावांनी जी माहिती दिली होती ती सांगितली.
“माय गॉड, म्हणजे तिचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही.” – बालचंद्रन
विशाल काही बोलला नाही. नुसतीच मान हलवली. सर्वच जण विशालची कथा ऐकून स्तब्द झाले होते. एक विचित्र शांतता ऑफिस मध्ये पसरली होती.
“मग आता पुढे काय?” – बालचंद्रन
“अजून तरी काहीच विचार केला नाहीये. ऑफिसने तर मला आत्ता पर्यन्त काढून टाकलंच असेल. दुसरीकडे बघावं लागेल.” – विशाल.
“इथे परत यायला आवडेल तुला?” – बालचंद्रन
“हो हो, आम्हाला आवडेल. सर तुम्ही याच परत इथे. आम्ही तुम्हाला खूप मिस केलं. तुम्ही नव्हते तर काम रुक्ष वाटायचं.” - सर्व स्टाफ.
“ओके विशाल, मी मोटवानिशी बोलतो. आजच. तो तुला ओळखतोच. बघूया काय म्हणतो ते. तसंही या पोस्ट वर अजून तरी कोणी लायक माणूस मिळाला नाहीये. मलाच सांभाळावं लागत आहे.” – बालचंद्रन
“खरंच तू बोलशील? मला खूप आवडेल परत यायला.” – विशाल.
“मी आजच बोलतो आणि तुला संध्याकाळी फोन करतो.” – बालचंद्रन
संध्याकाळी विशाल आणि कंपनी ठाण्याला बाळासाहेब म्हणजे छोटा उज्ज्वल, जो आता मोठा वकील झाला होता, त्याला भेटायला गेले.
“या या विशाल काका, या.” – बाळासाहेब हसत हसत बोलले. “या, तुमचीच वाट पहात होतो. कालच इंस्पेक्टर साहेब म्हणाले की तुम्ही आज संध्याकाळी येणार म्हणून. “अग ताई बाहेर ये, बघ कोण आलंय.” यावर आलेच असं म्हणून संपदा जी आता ६५ वर्षाची झाली होती, ती बाहेर आली.
विशाल दोघांकडे बघत होता,म्हणाला,
तीन दिवसांपूर्व मी ज्याला छोटा उज्ज्वल आणि शाळकरी मुलगी म्हणून जिला ओळखत होतो, तेच आता बाळासाहेब आणि आजीबाई झाल्या आहेत. प्रचंड गोंधळ झाला आहे आणि तो सुद्धा तीन दिवसांत. काय म्हणायचं याला?” – विशाल.
“विशाल, अरे तुझ्या साठी जरी फक्त 3 दिवसात बदल झाला असला, तरी आम्ही 50 वर्ष ओलांडली आहेत. आमच्या साठी सुद्धा हे अतर्क्य आहे.” -संपदा.
मग बराच वेळ गप्पा रंगल्या. बाळासाहेब म्हणाले,
“आता सर्वांनी जेवूनच जायचं ही ओळख आता पक्की झाली आहे. विदिशा पण असती तुमच्याबरोबर तर खूप आनंद झाला असता.” – बाळासाहेब
“देवाच्या मनात काय आहे ते कळत नाही. पण विशाल आल्यामुळे जरा आशा वाटायला लागली आहे.” – विदिशाचे बाबा.
“विशाल, तू गेल्यावर सहा महिन्यांनी विदिशा पण अदृश्य झाली. मला असं वाटतं की ती सुद्धा सहा महिन्यांनी अवतीर्ण होईल.” – बाळासाहेब.
“वा वा बाळासाहेब, तुमच्या तोंडात साखर पडो. असं झालं तर आनंदी आनंद. एक छान गेट टु गेदर करू. परत दोघांचं लग्न आहेच. वा.” – विदिशाचे बाबा.
घरी पोचता पोचता, बालाचंद्रन चा फोन आला.
“विशाल, मी मोटवानीला भेटलो. त्याला तुझी स्टोरी सांगितली. He was speech less. म्हणाला असंही घडतं का?, मी म्हंटलं घडतं की नाही ते माहीत नाही पण विशालच्या बाबतीत घडलं आहे. पोलिसांकडूनही शहानिशा झाली आहे. मग त्याने आपले VP, मेहरा साहेबांना फोन केला. आम्ही दोघं त्यांना भेटलो. सर्व ऐकल्यावर त्यांनी तुला उद्या 12 वाजता भेटायला बोलावलं आहे.
दुसऱ्या दिवशी विशाल मेहरा साहेबांना भेटला. मेहरा साहेब आश्चर्यचकित झालेच होते, पण पोलिसानी पण चिंचणीला जाऊन खात्री केली आहे हे समजल्यावर, ते विशालला म्हणाले,
“विशाल तू परत आलास ही आनंदाची गोष्ट आहे. तू जर कंपनीत परत जॉइन झालास तर दुधात साखर. काय विचार आहे?” – मेहरा साहेब.
विशालची काय, आंधळा मागतो एक डोळा अशी अवस्था झाली. त्याने तात्काळ होकार भरला.
“सर माझ्या साठी यापेक्षा चांगली गोष्टच नाहीये. फक्त मला एक प्रॉमिस हवं आहे. विदिशा सुद्धा जर परत आली तर तिला सुद्धा सामावून घ्याल.” – विशाल.
“नक्कीच. तू निश्चिंत रहा. विदिशा सुद्धा हाय परफॉरमर आहे. तिला घेण्यात काहीच अडचण नाही.” – मेहरा.
विशालने घरी आल्यावर सर्वांना ही गोड बातमी दिली. घरी आनंदोत्सव. रात्री जेवणं झाल्यावर विशालचे बाबा म्हणाले,
“काल बाळासाहेब एक महत्वाचं सूचित करून गेले. जसा विशाल आला तशीच सहा महिन्यांनी विदिशा पण येऊ शकते. तेंव्हा मला असं वाटतं की आपण आता दिवस मोजायला सुरवात करायला पाहिजे. विशाल जसा घरी आला, तशीच विदिशा पण घरी अवतीर्ण होऊ शकते.” – विशालचे बाबा.
तीन दिवसांनी विशाल कंपनीत जॉइन झाला. घडी पुन्हा बसायला लागली होती, फक्त विदिशा नव्हती आणि विशाल आतुरतेने तिची वाट पहात होता. एक एक दिवस मोजत होता.
विदिशाचे आईवडील सुद्धा एक एक दिवस मोजत होते.
विशाल येऊन सहा महीने जवळ जवळ होत आले होते. सर्वांचीच उत्सुकता वाढत चालली होती. विदिशा पण परत येईल का?हाच विचार सर्वांच्या मनात होता. एक दिवस विशालचे बाबा विदिशाच्या बाबांशी फोन वर बोलत असतांना म्हणाले,
“मला असं वाटतं की तुम्ही रोज दोन चार वेळेस विदिशाला हाक मारायला सुरवात करावी. म्हणजे विदिशा पानं वाढलीत जेवायला चल, किंवा चहा प्यायला ये असं.” - विशाल चे बाबा
“त्यानी काय होईल?” – विदिशाचे बाबा.
“काही नाही, नियतीवर प्रेशर आणायचा प्रयत्न करायचचा. आपल्या हातात तेवढंच आहे अजून काय? मला आपलं सुचलं ते सांगितलं.” - विशालचे बाबा.
पण विदिशाच्या आई बाबांनी ते फारच मनावर घेतलं. ते खरच सकाळ दुपार संध्याकाळ विदिशाला हाक मारू लागले. त्याच बरोबर ते देवाला पण सांकडं घालत होते की विदिशा घरी येऊ दे म्हणून.
अशाच एका दुपारी चहा टेबलावर ठेवतांना विदिशाच्या आईने हाक दिली.
“विदिशा, चहा झालाय ग. लवकर ये चहा थंड होईल.”
आणि बेडरूम मधून प्रत्युत्तर आलं.
“आले ग आई. दोन मिनिटं.” विदिशा असं म्हणाली आणि तिने डोळे उघडले, आपल्याच खोलीत स्वत:ला पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तेवढ्यात तिचे आई बाबा दोघेही खोलीत धावले होते. कॉटनची नऊ वारी नेसलेली विदिशा पाहून त्यांना नवल वाटलं नाही. विशालची कथा ऐकल्यावर त्यांना हे अपेक्षितच होतं.
विदिशाच्या बाबांनी मग विशालला आणि त्याच्या वडिलांना फोन करून बातमी दिली. रात्री १० वाजे पर्यन्त दोघेही नागपूरला पोचले.
विशाल आल्यावर विदिशाच्या आई बाबांनी त्यांना दोघांना खोलीत एकटं सोडलं आणि ते सुज्ञ पणे बाहेर गेले.
आता के? इथून पुढे रुटीन कथा. दोघांचं वाजत गाजत लग्न. हनीमून, वर्षभर तोता मैना यांचं राज्य. नंतर मात्र, “बिबी साहिब आणि मिया गुलाम.”
And they lived happily ever after.