Login

पिकनिक भा 2,- अनपेक्षित संकट

अचानक आलेल्या संकटाचा सामना.
पिकनिक भाग २
अनपेक्षित संकट.
सोनार स्क्रीन वर जसे भरपूर मासे दिसायला लागले, तसा रमेश म्हणाला की चला आपण स्टर्न वर म्हणजे बोटीच्या मागच्या भागात जाऊ.” – रमेश.
तिथे कार्यकर्ते तयारच होते. त्यांनी लगेच जाळं समुद्रात सोडायला सुरवात केली सरते शेवटी ओटोबोर्ड गियर ने जाळ्याचं तोंड फाकवलं आणि जाळं पूर्ण पणे पाण्यात गेलं. जाळं पाण्याखाली गेलं पण त्याला लावलेले तरंगते ठोकळे पाण्यावर तरंगत होते. आता बोट वळण घेऊन माघारी फिरणार होती. बोटीच्या वेगा मुळे जाळ्यामद्धे मासे ओढल्या जात होते.
बोटीचा स्पीड आता कमी होऊन जेमतेम २ नोट्स म्हणजे ४ किलोमीटर प्रती तास झाला होता. बोट जश्या झुंडी दिसतील, तशी वळण घेत होती. हा प्रकार तास भर चालला. मग विंच चालू करून जाळं ओढायला सुरवात झाली. रमेश म्हणाला,
“आता आपण पुढच्या भागात जाऊ. इथे जाळं रिकांम करतील, उभं राहायला जागा राहणार नाही.” – रमेश.
जाळं रिकांम होत होतं आणि डेक भर मासेच मासे. सर्वच लोकांना हे दृश्य नवीनच होतं. मग त्यांचं सॉर्टिंग सुरू झालं. बांगडा, सुरमई, रावस आणि पापलेट वेगळे करण्यात आले.
मग रमेश म्हणाला,
आता हे मासे साधारण पणे बर्फाच्या टाक्यांमद्धे ठेवतात. पण आमच्या बोटीवर चिल्ड सी वॉटर फ्रीजर सिस्टम आहे. त्यामध्ये मासे दीर्घ काल चांगले राहतात. आता हे मासे वेगवेगळ्या खणात ठेवतील. आणि खोलीचं दार बंद करतील. बाकी किनाऱ्यावर सर्व मासे उतरवल्या नंतर तिथे पण प्रत्येका कडे बर्फाच्या टाक्या असतात.” – रमेश.
बोट आता परतीच्या प्रवासाला लागली होती. सर्वांसाठी हा सगळा विलक्षण अनुभव होता. एक दोन जणांना त्रास झाला पण त्यांनी औषध घेऊन थोडा आराम केल्यावर त्यांना बरं वाटलं. बोट किनाऱ्याला लागली तेंव्हा संध्याकाळचे साडे पांच वाजले होते. चहा पाणी झाल्यावर, रमेशचा भाऊ म्हणाला, इथे जवळच खाडी मध्ये मधोमध एक छान मंदिर आहे. आता ओहोटी सुरू झाली आहे, तर मंदिरापर्यंत आरामात चालत जाता येईल. आणि तास भर थांबून परत पण येता येईल. सगळे थकले होते, पण तरी तयार झाले. खाडीच्या मधोमध असणारं मंदिर पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच होती.
“जाणार कसं?” – उमेश.
ही काय आपण ज्या बसने आलो, ती बस उभीच आहे. बसनेच जायचं आणि तिथून थेट पालघर स्टेशन.” – रमेश म्हणाला. सगळ्यांना पटलं. आणि निघाले मंदिरा कडे.
मंदिर खाडीच्या मधोमध होतं. मंदिर जवळ जवळ २०० वर्ष जुनं होतं आणि हेमाडपंती पद्धतीने बांधलेलं होतं. काळ्या शार पत्थरात बांधलेलं ते मंदिर खूप सुरेख बांधलेलं होतं. पाहाताक्षणीच ते देऊळ सर्वांनाच आवडून गेलं. गणपतीचं मंदिर होतं आणि समोर एक सभामंडप होता. दर्शन घेतल्यावर मंदिराच्या सभामंडपात सर्व कोंडाळं करून बसले. मग रमेशने थरमास मधून आणलेला चहा सर्वांना दिला. मग गप्पा गोष्टी सुरू झाल्या. इतका वेळ उभं राहिल्याने सर्वच पाय पसरून बसले होते. बोलता बोलता अंधार पडायला सुरवात झाली. त्याबरोबर सर्वांनी आवरायला सुरवात केली. सर्व आवरतच होते की वसुंधराबाई किंचाळल्या. सर्वच त्यांच्याकडे वळून बघायला लागले.
“काय झालं वसुंधरा मॅडम?” – सारंग.
“पाणीच पाणी, खाडी पाण्याने भरून गेली आहे. आता आपण कसं जाणार?” – वसुंधरा
सगळेच देवळाच्या कडेला धावले आणि सभोवार पाणीच पाणी बघून हादरले.
“रमेश कुठे आहे? रमेश” सारंगने रमेशला हाक दिली. रमेश तिथेच होता.
“अरे काय हे? भरती केंव्हाच सुरू झालेली दिसते आहे. तू तर म्हणाला की साडे सातला भरती सुरू होणार म्हणून? मग हे काय झालं?” सारंग लीडर होता. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव स्पष्ट दिसत होते.
“रीपोर्ट मध्ये तसंच आलं होतं. तुम्हाला पण दाखवला होता रीपोर्ट. मी बघतो पाणी किती आहे, जर पाऊल भर असेल, तर आपण लगेच निघू.” – रमेश.
रमेश पायऱ्यांवरून खाली उतरला. पाणी गुढगा भर झालं होतं. सर्वांनीच ते पाहिलं. बायका तर मटकन खालीच बसल्या.
“आता इथेच मुक्काम करावा लागणार की काय?” नीलिमा चिंतातुर स्वरात म्हणाली.
“नाना,” रमेशने हाक दिली. नाना म्हणजे बसचा ड्रायव्हर. तो समोर आला.
“काय भाऊ?” – नाना.
“अरे फक्त गुढगा भर पाणी आहे. जरा किनाऱ्यावर जाऊन काही होड्या मिळतात का पहा. या सर्व लोकांची आपल्यावर जबाबदारी आहे.” – रमेश.
“ठीक आहे.” आणि असं म्हणून तो पायऱ्या उतरायला लागला. पण तो पर्यन्त पाणी गूढग्याच्या वर पर्यन्त पोचलं होतं. पाणी झपाट्याने चढत होतं. पाण्याला ओढ पण बरीच होती. अश्या परिस्थितीत किनाऱ्यावर चालत जाणं शक्य नव्हतं. तो परत फिरला.
सारंग मोबाइल बघत होता. पण रेंज येत नव्हती. तो म्हणाला,
“कोणाच्या मोबाइल ला रेंज येते आहे का? असेल तर कोणाशी तरी संपर्क करता येईल. प्रत्येक जण बघा.” – सारंग.
कोणाच्याही मोबाइलला रेंज नव्हती. आता काय करायचं देवळात लाइट नव्हते. किती वेळ ओहोटी लागून पाणी ओसरायला लागेल यांचा अंदाज नव्हता. सगळेच हवालदिल झाले. मग थोडं सावरल्यानंतर सगळेच अचानक बोलायला लागले. कोणाचंच बोलणं कोणाला समजत नव्हतं. नुसताच कोलाहल.
“थांबा, थांबा.” सारंग ओरडून म्हणाला. “ असे सगळे एकाच वेळेस बोलत सुटले तर काहीच समजणार नाही. आपण शांतपणे या समस्येचा विचार करू. नक्कीच काही तरी मार्ग निघेल.” सगळे शांत झाले. तसा सारंगच्या बुद्धी वर सर्वांचाच विश्वास होता.
“रमेश, नाना ओहोटी साधारण केंव्हा सुरू होईल?” – सारंग.
“भरती आणि ओहोटी मध्ये साधारण सहा साडे सहा तासांचं अंतर असतं. आता सात वाजले आहेत आणि गूढग्याच्या वर पाणी आलं आहे म्हणजे भरती साडे सहा वाजता सुरू ,’झाली असावी. ती ओसरून ओहोटी सुरू व्हायला साडे बारा तरी होतील. पाणी पूर्ण ओसरायला दोन तरी वाजातील.” नानाने पूर्ण तपशील दिला.
“अरे देवा, म्हणजे आता दोन वाजे पर्यन्त या देवळातच थांबावं लागणार. कठीण आहे.” महिला वर्गा पैकी एक बोलली. कोण ते कळलं नाही कारण आता अंधार पडला होता.
“आता जेवणाचं काय? मला तर आत्ताच भूक लागली आहे.” – उमेश.
“जेवणाचं सोड, पाणी पण नाहीये प्यायला. जे आहे ते सर्व जण पुरवून पुरवून वापरा. आणखी एक, मोबाइल टॉर्च एकच लावा. सर्वांच्याच मोबाइलची बॅटरी संपून चालणार नाही.” – सारंग.
“बरोबर आहे सारंगचं. पण आता करायचं काय? आत्ता फक्त सात वाजले आहेत. अजून सात तास काहीच न करता बसून राहायचं?” – शशांक
“नाना, पाणी देवळात तर येणार नाही न?” – सारंग.
“नाही. मी बरेच वेळा आलो आहे इथे. वरतून दुसऱ्या पायरी पर्यन्त पाणी पोचतं. देवळात येत नाही. खाडी आहे ही, पुर नाही आलेला.” – नाना.
थोडी कुरकुर आणि बराचसा वैताग यांच्या मध्ये अर्धा तास गेल्यावर हळू हळू सर्वांनीच प्राप्त परिस्थितीशी जुळवून घ्यायचं ठरवलं. सर्व जण मग आधी बसले होते तसेच कोंडाळं करून बसले. मग सुरू झाल्या गप्पा टप्पा आणि वातावरण थोडं हलकं झाल्यावर, गाडी अन्ताक्षरी वर येऊन थांबली. वेळ आता भराभर जात होता. मग कोणी कोणी कविता म्हंटल्या, कोणी आपले अनुभव सांगितले. पाण्याची बाटली फिरत होती. प्रत्येक जण एक एक घोंट पीवून फक्त घसा ओला करत होता. पाहता पाहता १२ वाजले. कोणी तरी मोबाइल मध्ये बघितलं आणि बोललं. सगळे जण आता सारसावून बसले. आता फक्त २ तास वाट पाहायची होती. पुन्हा उत्साहाने अन्ताक्षरी सुरू झाली.
देऊळ पूर्व पश्चिम होतं, आणि गाभारा पश्चिमे कडे होता. त्यामुळे बऱ्याच होड्या समुद्रातून येत आहेत हे कोणालाच कळलं नाही नावांनी मंदिर पार केल्यावरच नावा सर्वांना दिसल्या. त्यातली एक नाव तर चक्क मंदिरातूनच आर पार बाहेर पडली. आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर कोणी तरी म्हणालं,
“अरे, इतक्या गडद अंधारात आपल्याला नाव आणि त्यातली माणसं कशी दिसली? एकमेकांना सुद्धा आपण पाहू शकत नाहीये, मग हे कसं दिसलं?”
“बापरे हे लक्षातच नाही आलं. भुताटकी आहे की काय?” बायकी आवाज.
मग दोन तीन टॉर्च लावल्या गेले. टॉर्चचा प्रकाश सर्वांच्या वरुन फिरल्यावर कोणी तरी किंचाळलं,
“विशाल सर आणि विदिशा दिसत नाहीयेत.” मग सर्व देऊळ शोधून झालं तरी विशाल आणि विदिशाचा शोध काही लागला नाही. अचानक ती दोघं कुठे गेले असतील यांचा अंदाजच लागत नव्हता. भरती आता हळू हळू ओसरायला सुरवात झाली होती, पण एवढ्या पाण्यातून ती दोघं गेले असतील हे शक्यच नव्हतं.
******
विशाल आणि विदिशा एका क्षणी देवळात होते, आणि दुसऱ्याच क्षणी ते नावेत बसले होते. जी नाव देवळाच्या आरपार निघाली होती, त्याच मार्गात कोंडाळ्यामद्धे समोरासमोर विशाल आणि विदिशा बसले होते, आणि नाव देवळाला पार करत असतांना ही दोघं आपोआप नावेत ढकलल्या गेली. काही क्षण विशालला काहीच बोध झाला नाही, पण नाव हलत होती त्यामुळे त्याच्या लक्षात आलं की तो एका नावेत बसला आहे. हे कसं घडलं यांचा विचार करतच त्याने सभोवार नजर फिरवली. नावेत १२-१५ मराठे शिलेदार बसले होते. धोतर, बाराबंदी आणि कमरेला गुंडाळलेला फेटा. डोक्यावर मराठेशाही पगडी. कमरेला फेट्यात खोचलेली तलवार आणि काही जणांच्या पाठीवर ढाल. विशालला काही संगतीच लागेना. त्याचं डोकं चक्रावून गेलं. तशातच त्याच्या लक्षात आलं की तो बसला होता तिथे एक मावळा आधीच बसला होता. सर्व मावळे लढाईच्या तयारीतच बसले होते. विशालने आजूबाजूला नजर फिरवली, तर अश्याच वीस पंचवीस नावा दिसल्या. तशातच त्याला मागे एका ठिकाणी विदिशा बसलेली दिसली. ती गोंधळलेली तर होतीच पण जाम घाबरली पण होती. तीचं विशाल कडे लक्ष गेलं आणि ती मोठ्याने ओरडून म्हणाली,
“विशाल सर, हे काय चाललं आहे? मला खूप भीती वाटते आहे.” – विदिशा
विशाल पण हादरलेलाच होता, तरी त्याला एकदम जाणीव झाली की तो एकटा नाहीये, आता विदिशाची पण जबाबदारी त्याच्यावरच आहे. त्याने स्वत:ला सावरलं आणि म्हणाला,
“काय चाललं आहे ते मला पण कळत नाहीये, पण तू घाबरू नकोस, मी येतो, तू तिथेच थांब.” – विशाल म्हणाला आणि हेलकावे खाणाऱ्या नावेतच कसाबसा तोल सांभाळत विदिशा जवळ पोचला.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – बिकट परिस्थिती

दिलीप भिडे.
0

🎭 Series Post

View all