Login

प्रिया आज माझी भाग २०

Lovestory
प्रिया आज माझी भाग २०


डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

तो बाहेर जाणार इतक्यात तिने त्याला थांबवले.

"शेखर ."

तो वळला.

"मला तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. "

"...."

"मला...मला काही काळ इथे राहू द्याल का?"

आजपर्यंत मामी तिला घालून पाडून बोलायच्या....पण प्रत्येकवेळी मावशीची सोबत असायची त्यामुळे ते वार ती सहज पेलून न्यायची. पण आजच्या इतके हतबल तिला कधीही वाटले नाही.

"ते काल मी तुला.."

"प्लीज....फक्त सहा महिने."

खरेतर ती काल तडकाफडकी निघत होती तेंव्हा त्याला तिला सांगायचे होते की त्याने त्याचा निर्णय सांगितला याचा अर्थ असा नव्हता की तिने लगेच तिथून निघून जावे.
पण तिने भविष्यात त्याच्याकडून कसलीही अपेक्षा ठेऊ नये म्हणून त्याने घटस्फोटाचे कागद तयार करूनआणले होते. कायद्याप्रमाणे त्याला इतक्या लवकर घटस्फोट मिळणार नाही याचीही त्याला पूर्ण कल्पना होती. या प्रोसेसला वर्ष लागणार हे त्याच्या वकिलांनी त्याला आधीच संगीत होते आणि त्याबाबतीत तो मिहिकाशी बोललाही होता. म्हणून ती इथे वर्षभर राहिली तरी त्याला काही हरकत नव्हती. त्याचे आणि तिचे संबंध फक्त दिखाव्यासाठी आहे हे त्याला तिला सांगायचे होते.


"किंवा त्यापेक्षाही कमी... निदान मला चांगला जॉब मिळेपर्यंत. आता सध्या मी जो जॉब करते आहे त्यात रूमचे भाडे आणि इतर खर्च मी मॅनेज करू शकणार नाही......एकदा मला चांगला जॉब मिळाला की मी इथून निघून जाईन.... एक क्षणभरही थांबणार नाही. "


ती नोकरी करते हे त्याला माहित होते आणि तिच्या माहेरचे घरही तिच्याच मालकीचे आहे हे त्याने त्याच्या आईकडून ऐकलेही होते. मग असे असताना ती भाड्याच्या घराची सोय का करणार आहे हे त्याला समजत नव्हते पण त्याबद्दल तिला विचारणे त्याला गरजेचे वाटले नाही.


"तुम्ही काहीच का बोलत नाही. "
विचारात हरवलेल्या त्याच्याकडे पाहत प्रिया म्हणाली.


"इट्स ओके...तू राहू शकतेस. आपला घटस्फोट होणार आहे हे इतक्या लवकर तरी मला आईला सांगायचे नाही...तिची तब्ब्येत माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे.
फक्त एक लक्षात ठेव.. कीप डिस्टन्स फ्रॉम मी. या रुममध्ये आल्यावर माझ्यापासून लांब रहायचे. "
एवढे बोलून तो लगेच बाहेर निघून गेला.


पूजेची सर्व तयारी झाली. आपल्या आईच्या इच्छेखातर शेखर पूजेला तयार झाला होता. तो तयार होऊन बाहेर हॉलमध्ये बसला होता. पूजेसाठी बाजूच्या फ्लॅटमधील देशपांडे काकू आणि त्यांची छोटी नऊ वर्षांची नात सान्वी आली होती.


"आजी नवरी कधी येणार ...मला बघायचे आहे. "


"येणार सानू...ती तयार होत आहे...नवरीला तयार व्हायला वेळ लागतो. आणि तिला नवरी नाही म्हणायचे बरे...काकू म्हणायचे.."


"शेखर काका...काकू तयार होऊन आली की तुम्ही तिच्यासाठी गाणे म्हणा. "


"गाणे... अगं ते पिक्चरमध्ये म्हणतात. " सुमनताई म्हणाल्या.


"नाही सुमन आजी..... टेन्थ फ्लोअर वरच्या ऋषी काकाचे लग्न झाले होते तेंव्हा काकाने काकूसाठी गाणे म्हटले होते. "


"हो... हो... म्हटले होते खरे. " सुमनताई म्हणाल्या.


"अगं सुमन हिला अगदी बारीकसारीक सर्व आठवते. मला म्हणत होती...शेखर काकाची नवरी खूप नाजूक आहे. काका तिच्यापुढे बाहुबली सारखा दिसत होता आणि नवरी अगदी बाहुलीसारखी होती. "

"अस होय...आमच्या पेक्षा तूच आजीबाई शोभतेस बरं. "
सुमनताई म्हणाल्या.

"काका... तुला मी गाणे सुचवते तू ते म्हण. "
तिच्या म्हणण्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे त्याला समजत नव्हते. तो कसेनुसे हसला.

त्याच्या रूमचा दरवाजा खोलला गेला. समोर ती उभी होती. गर्द रेशमी हिरवी कांजीवरम साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ , गळ्यात मंगळसूत्र आणि मोत्याचा नाजूक सर, कानात मोत्याचे झुमके, भांगेत ठसठशीत भरलेले कुंकू, केसांचा आंबाडा, चेहऱ्यावर हलका मेकअप, ओठांवर लालसर मरून लिपस्टिक अगदी डोळ्यांत भरणारे रुपडे लेऊन ती जशी बाहेर आली तसे शेखर तिच्याकडे पाहतच राहिला.


"जरीच्या साडीत कशी नटून थटून गुणाची दिसते गं माझी नवरी दिसते गं. काका तू हे गाणे म्हण... काकू एकदम प्रेटी दिसतेय. "


इतका गोड आवाज कुठून येतो म्हणून प्रियाने लगेच सान्वीकडे पाहिले आणि तिचं ते निरागस हसू पाहून तिच्याही चेहऱ्यावर हसू आले.

"शेखर.... सानू म्हणते तसे तुझी नवरी अगदी प्रेटी दिसतेय हो. "


प्रियाने त्याच्याकडे पाहिले तसे तो पुन्हा गंभीर झाला.


पूजा सुरु झाली. तुळशीपत्र वाहताना भटजीकाकानी तिला शेखरच्या हाताला हात लावायला सांगितले. तसे करताना ती त्याच्या किंचित जवळ सरकली त्यामुळे तिच्या खांद्याचा हलका स्पर्श त्याला होत होता. तिने माळलेल्या जुईच्या गजऱ्याचा सुगंध त्याला येत होता.


पूजा पूर्ण झाल्यावर कॉलनीतले मित्र पत्नीसह आले .त्यांच्या बायकांनी तिची ओटी भरली. हळदीकुंकवाने तिचे कपाळ भरून गेले होते. पण त्यातही ती अधिक खुलून दिसत होती. शेखर मित्रांबरोबर बोलण्यात गुंतलेला होता तरी अजाणतेपणी त्याची नजर तिच्यावरच जात होती. सुमनताई शेखर मध्ये होणारे हे बदल टिपत होत्या आणि मनोमन दोघांच्या सुखी वैवाहिक जीवनाच्या कामना करीत होत्या. काही वेळाने त्यांच्या मैत्रिणी आल्या आणि त्या त्यांच्याशी बोलण्यात गुंतून गेल्या.

"हे हाताला काय झाले... पट्टी का लावली. " एकीने विचारले तसे शेखर आणि त्याच्या मित्रांचेही लक्ष गेले.

"ते बांगडीची काच भरली. "

"काय हे शेखर भावोजी पूजा होईपर्यंत तरी थांबायचे. "

त्या काय बोलत होत्या तिला काही समजत नव्हते....ती प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागली. शेखरच्या काळावर मात्र आठ्या आल्या.


"इतकी सुंदर बायको भेटल्यावर धीर धरवला नाही वाटते. आताही तिच्यापासून नजर हटत नाही. मी आले तेव्हापासून पाहतेय शेखर भावोजी आपल्या बायकोकडे एकटक पाहत आहेत. "


"नीरज अवनी वहिनींना सांग असे काही नाही."
शेखर कुजबुजला.

"अवनी..."


"ओ... सॉरी सॉरी..."


आता त्या बायका नेमक्या कशाबद्दल बोलत आहेत हे प्रियाला समजले पण त्यावर काय बोलावे तिला समजत नव्हते...तरीही त्यांचा अजून पुढे गैरसमज होऊ नये म्हणून ती म्हणाली,


"सकाळी बांगड्या भरतेवेळेस काच लागली. "


तरीही तिथे जमलेल्या बायका एकमेकींकडे पाहून गालातल्या गालात हसल्या.


*****

प्रिया आपले कपडे बदलून साडीची घडी करीत होती तेंव्हा शेखर आत आला.

"हे बघ...त्या बायका जे बोलत होत्या ते खोटे आहे..मला तुझ्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. "
.

"माहित आहे मला. नाहीतर लग्नाच्या पहिल्याच रात्री घटस्फोट दिला नसतात ना. एवढे शहाणपण आहे मला. "
तिने साडी स्टँडिंग हॅगरवर ठेवली.

"आणि मलाही तुमच्यात अजिबात रस नाही हे ही लक्षात ठेवा. मला जसे नवीन जॉब भेटेल तसे मी इथून जाणार आहे. तुमच्या संसारात...घरात...जीवनात मी कायमची अजिबात राहणार नाही."

शेखरच्या बोलण्याने तिच्या स्वाभिमानावर वार झाले होते. तिच्या बोलण्याने तो निरुत्तर झाला.

"मला एखादी चादर आणि उशी भेटेल का...माझे अंथरूण घालायचे आहे. मी इथे तुमच्या बेडच्या बाजूला झोपणार आहे. तुम्ही मघाशी जे बोललात ते बरे केलेत...आता तुम्हाला माझ्यापासून आणि मला तुमच्यापासून कसलीही भीती नाही. आपण एका रुममध्ये बिनधास्त झोपू शकू. "


क्रमशः




सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
********


0

🎭 Series Post

View all