Login

फर्स्ट फ्लोअर भाग - पाच (अंतिम)

The Story About Molestation And Culprit
फर्स्ट फ्लोअर

अंतिम भाग -5

@ ज्योती सिनफळ


काणेंनी ओळखलेल्या सीसीटीव्हीमधील व्यक्तीची चौकशी करण्यासाठी कुलकर्णी पोलीस स्टेशनच्याबाहेर पडणार तोच त्यांना संजीवनी हॉस्पिटलमधून फोन आला की विशाखाला शुद्ध आली आहे.


त्यामुळे ते लगेचच लेडी कॉन्स्टेबलसह हॉस्पिटलला पोहोचले. विशाखाने दिलेले स्टेटमेंट अतिशय धक्कादायक होते.


पुढची महत्वपूर्ण सुत्रे हलवत केसला मजबूत करणारे सर्व पुरावे गोळा करून इन्स्पेक्टर कुलकर्णींनी चार दिवसांनी पोलिस स्टेशनमध्येच एक प्रेस कॉन्फरन्स बोलावली. मनोहर सोसायटीतले सर्व रहिवासी आणि दाते आज्जींची मुलगीही त्यावेळी तिथे आली. सगळ्यांनाच हे जाणून घेण्याची उत्सुकता होती की हे काम नेमकं कोणी आणि का केलं?
सर्वजण जमल्यावर इन्स्पेक्टर कुलकर्णींनी बोलायला सुरुवात केली.



“मी तुम्हा सर्वांना इथे दोन गूड न्यूज सांगण्यासाठी बोलावले आहे.


एक म्हणजे विशाखाला शुद्ध आली आहे आणि दोन ह्या केसचा खरा गुन्हेगार सापडण्यात पोलिसांना यश आले आहे.



खरंतर ह्या केसचा उलगडा ह्या आधीच झाला असता पण काही लोकांनी हेतुपुरस्सर गोष्टी लपवल्यामूळे केसचा उलगडा व्हायला वेळ लागला. आता तुमची उत्सुकता जास्त न ताणता गुन्हेगाराला तुमच्यासमोर आणतो.”



असे म्हणत कुलकर्णींनी दाते आज्जींचा नातू सोहमला पुढे बोलावले आणि सर्वांना सांगितले.



“हाच विशाखाचा गुन्हेगार आहे.”



आज्जींचा चेहरा एकदम उतरला. तिथे बसलेल्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले. सोहमच्या आईचा, सीमाचा चेहरा रागाने लाल झाला. ती चिडून म्हणाली,



“सर, तुम्हाला विशाखाचा गुन्हेगार सापडला नाही म्हणून माझ्या नासमज मुलावर असा खोटा आरोप लावू नका. तो मतीमंद आहे, तुम्हाला माहीत आहे ना?”



“ काम डाऊन सीमा मॅडम! मी तुमची मनःस्थिती समजू शकतो पण मी हे पुराव्यानिशी बोलत आहे आणि ह्या गुन्ह्याबद्दल तुमच्या आईला सर्व माहित असुनही त्यांनी हे आपल्या सर्वांपासून जाणीवपूर्वक लपवून ठेवले, काय आज्जी, बरोबर नाऽ?”



त्याबरोबर मिसेस भावे रागातच दाते आज्जींना म्हणाल्या,



“आज्जी तुम्ही असे वागाल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. विशाखाला तर तुम्ही अंगाखांद्यावर खेळवले आहे. मग तुम्ही असे का वागलात?”



असे म्हणतच मिसेस भावे रडायला लागल्या.आपल्या बायकोला सावरत मिस्टर भावेंनी इ. कुलकर्णींना विचारले,



“पण सर तुम्ही ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलातच कसे?”




इ. कुलकर्णीनी एक पॉज घेऊन बोलायला सुरुवात केली.



“खरंतर सोहमपर्यंत पोहोचणे अवघडच होते. माझा संशय अमित काणे, टपरीवरची मुले ह्यांच्यावच दाट होता. परंतु टपरीवरच्या मुलांचे फिंगरप्रिंट्स गुन्हा घडला तिथे कुठेही सापडले नाहीत आणि ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही दिसले नाही.


दुसरा संशयित अमित काणे होता कारण गुन्हा घडला त्याठिकाणी त्याचे फिंगरप्रिंट्स पण सापडले आणि भावेंच्या घरी येताना व जातानाचे सीसीटीव्ही फुटेज पण दिसले. ह्यासंदर्भात अधिक चौकशी केल्यावर त्याने कबुल केले की तो विशाखाला बघायला गेला होता पण त्याचे म्हणणे होते की त्याने हा गुन्हा केलेला नाही. मग अजून बारकाईने फुटेज चेक केले तेव्हा एकच व्यक्ती अशी होती जी आम्हाला मनोहर सोसायटीत कुठेही सापडली नाही.


मी मिस्टर काणेंना चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावले तेव्हा त्यांना मी त्या व्यक्तीची माहिती विचारली असता त्यांनी ती व्यक्ती दाते आज्जींच्या मुलीचा मुलगा सोहम आहे व तो मतीमंद आहे असे सांगितले. त्याचे आईवडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे तो दाते आज्जींकडेच राहायला असतो हेही कळले पण दाते आज्जींच्या चौकशीत त्या इथे एकट्याच राहतात असे त्यांनी सांगितले होते आणि मग आम्हाला सोहमची शंका आली. त्या दिवशी भावेंच्या घरात तपासणीसाठी गेलो असता टीव्हीवर कार्टून चॅनल चालू होते ते पाहून तेव्हा मला आश्चर्य वाटलं की ह्या घरात कार्टून कोण बघत असेल! पण त्याचा धागा नंतर सोहमच्या रूपाने जुळला कारण रीमोटवरचे फिंगरप्रिंट्सही सोहमच्या फिंगरप्रिंटशी मॅच झाले.



सोहमविषयी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी आम्ही गुलमोहर सोसायटीत निघालो होतो तेवढ्यात हॉस्पिटलमधून विशाखा शुद्धीवर आल्याचा फोन आला म्हणून मी आधी तिथे गेलो. विशाखाचे स्टेटमेंट घेतले त्यावेळी विशाखानेही स्टेटमेंटमध्ये सोहमचेच नाव सांगितले.



तरीही सोहमचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी काही पुरावे गोळा करणे गरजेचे होते म्हणून आम्ही गुलमोहर सोसायटीत गेलो.



सीमा मॅडमकडे गेल्यावर मला तिथे सोहम टिव्हीवर कार्टून बघत बसलेला दिसला.



आम्ही विशाखा केससंदर्भात बोलायला आलोय म्हणल्यावर त्यांनी लगेच सहकार्य करत आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. परंतु मूळ हेतू सोहमची चौकशी होता.



सीमा मॅडम आमच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेल्या ते बघून मी बरोबर आणलेले कॅडबरी चॉकलेट देत सोहमशी गप्पा मारत विचारले,



“हाय सोहम, विशाखा तुझी मैत्रीण आहे ना?”



विशाखाचे नाव ऐकल्यावर सोहम लगेच म्हणाला,



“नाही. विशाखा माझी मैत्रीण नाही, माझी ताई आहे. मी रोज तिच्याकडे खेळायला, कार्टून बघायला जायचो. मी सकाळपासून आईला म्हणतोय मला विशाखाताईकडे जायचंय पण आई म्हणाली, तिला बाऊ झाला आहे.”



मी दिलेली कॅडबरी सोहमने लगेच फोडून खाल्ली. मी सावधपणे त्या कॅडबरीचे रॅपर माझ्या पिशवीत ठेवून घेतले आणि कॅडबरीच्या रॅपरवरचे फिंगरप्रिंट तपासणीसाठी पाठवले.



तिथून लगेच आम्ही दाते आज्जींकडे गेलो. मला बघताच आज्जी थोड्या घाबरल्या आणि नंतर सावरुन म्हणाल्या,



“या ना सर, बसा.”



“आज्जी तुम्ही आमच्यापासून हे का लपवून ठेवले की तुमचा नातू सोहम गुन्हा घडला तेव्हा इथेच होता?”



माझ्या प्रश्नावर त्या चकीत तर झाल्या पण घाबरुन रडायला लागल्या आणि म्हणाल्या,



“सर, तो मतीमंद आहे हो. त्याला काही कळत नाही. हे त्याच्याकडून कसे होऊ शकते?”



“आज्जी, विशाखा शुद्धीवर आली आहे आणि तिने स्टेटमेंटमध्ये सोहमचे नाव घेतले आहे आता तुम्ही मला सांगा त्या दिवशी काय घडले?”



“साहेब, त्यादिवशी सोहम विशाखाकडे नेहमीप्रमाणे खेळायला गेला. थोड्या वेळाने तो आला तेव्हा घाबरलेला होता आणि रक्त-रक्त असे ओरडत होता. मला आधी काही कळले‌च नाही. नंतर त्याच्या पॅंन्टवर रक्ताचे डाग दिसले ते बघून मला वाटले त्यालाच काहीतरी लागलेय. मी त्याला विचारायचा प्रयत्न केला पण त्याला काही सांगता येईना. मग मी त्याचे कपडे‌ बदलले. त्यानंतर थोड्यावेळाने विशाखावर घडलेला प्रसंग कळला आणि मला सोहमच्या कपड्यावरचे डाग कशाने पडले‌ ते उमगले. त्यामुळे घाबरून मी सोहमला रात्रीच माझ्या मुलीकडे पाठवून दिले. तिलाही ह्याबाबतीत काहीच सांगितले नाही.”



मग आज्जींकडून आम्ही सोहमचे त्यादिवशी घातलेले कपडे मिळवले आणि तपासणीसाठी पाठवले. त्यावरील रक्ताचे, सीमेनचे सॅम्पल्स विशाखाच्या कपड्यांवरील रक्ताच्या व सीमेनच्या सॅम्पलशी जुळले. तिथे सापडलेले केस पण सोहमच्या डिएनएशी मॅच झाले. एकंदरीत कॅडबरी रॅपरवरचे फिंगरप्रिंट विशाखाच्या बेडरुमधील वस्तुंशी आणि टीव्हीच्या रिमोटवरच्या फिंगरप्रिंटशी मॅच झाले.



अश्याप्रकारे आम्ही खात्रीलायक ह्या निर्णयाला पोहोचलो की विशाखाचा गुन्हेगार दुसरा तिसरा कोणी नसून सोहमच आहे. म्हणले तर तो गुन्हेगार आहे, म्हणले तर नाही.



सोहमसारख्या मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वयात फरक असतो. असे मूल जेव्हा पौगंडावस्थेत येते तेव्हा त्यालाही शारीरिक आकर्षण निर्माण होते पण त्याची त्यांना जाण नसते. अशा वयात ते खूप ॲग्रेसिव्ह होतात. बऱ्याचदा तर ते आपल्या आईवरच असा प्रयोग करतात. अशा मुलांची त्यांच्या पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांना योग्य समुपदेशन केले पाहिजे त्यामुळे कायद्याच्या चौकटीत जरी तो गुन्हेगार असला तरी त्याला शिक्षा द्यायची की नाही हे तुम्ही भावे कुटुंबाने ठरवावे.



माझे काम झाले आहे.



आज विशाखाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. मला वाटतं सगळ्यांनी हा आनंद साजरा करून ह्या विषयाला एका अबोध वळणावर सोडून द्यावे अशी मी विनंती करेन.



मिस्टर आणि मिसेस भावे तुमचे अभिनंदन!

--------------------------------------
-----------------------
फर्स्ट फ्लोअर