Login

अर्धांगिनी - भाग -12

Bayko

अर्धांगिनी - भाग -12


    मी विचार करत बसले आणि मनात म्हंटल, सात महिने झाले इथे येऊन ह्या रूमच्या बाहेर सुद्धा मी गेले नाही, खिडकी आहे एक ह्या रूमला पण ती पण छोटीशी त्यातून बाहेरचं जग दिसत नव्हतं.मी त्या खोलीत राहून कंटाळून गेले होते.


आयशाला बोलावं कां मला जरा बाहेर तरी ने, निदान हॉलमध्ये तरी...आज दुपारी आयशा जेवण घेऊन आली की बोलते तीला असं मी मनात पक्क केलं, आयशा दुपारी जेवण घेऊन आली तेव्हा खूप गप्प गप्प होती, नेहमीसारखं चेहर्‍यावर हसू नव्हतं तिच्या, ती माझ्याशी एक शब्द देखील बोलली नाही, जेवण टेबलंवर ठेवून सरळ निघाली, मी आयशा बसं नां असं म्हंटल्यावर नको जाते असं बोलून ती निघून गेली.


मी मनातं म्हंटल हिला कळलं असेल कां की मी आसिफबरोबर सलगी करायला तयार झाले ते तो माझ्याजवळ यायला लागला आहे, कोणत्या बायकोला हे आवडलं असतं, ही तर बिचारी सगळं नवऱ्याच्या सुखासाठी सहन करतेय, तिचा पण नाईलाज असेल..


आपला समाज एवढा पुढे गेलेला असून पण अजूनही मुलं नसलेल्या बाईला वेगळ्याच नजरेने बघतो, ही मुलगी आयशा छान राहते, इंग्लिश पण चांगल बोलते, सुशिक्षित दिसते तरी पण ही आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईकडे सोपवायला तयार कशी झाली..आणि हिचा नवरा एखादं मुलं दत्तक पण घेवू शकला असता नां, कां स्वतः च्या रक्ताचं मुलं हवं असा ह्याचा अट्टहास आहे, बिचाऱ्या आयशामध्ये काही दोष असला तर त्यात तिची कांय चूक होती... देव पण नां एखाद्याच्या वाटेला काहीतरी अपूर्णपणा देतोच.


एक दिवस मी आयशाचाचं विचार करत घालवला..... एकदा आसिफ जेवायला आल्यावर त्याला मी विचारलं आयशा अचानक गप्प कां झाली असं... तर तो म्हणाला नाही गं काही नाही...

मग मी म्हंटल आसिफ एक विनंती होती, सात महिने मी ह्या रूममध्ये आहे,मला बाहेर नेशीलं,,मला जरा मोकळ्या हवेत फिरायला नेशील? पण प्लीज मला मोकळ्या हवेत ने."तुला हवं असेल तर आयशाचा स्कार्फ बांधून पूर्ण झाकून ने मला...


माझी वाक्य ऐकल्यावर तो म्हणाला, तुला सगळं मिळतय इथे." कशाला बाहेर जायला हवं तुला.

निदान जरा दहा मिनिट बाहेर ने मला... इथे काहीच काम नसतं,काही तरी करू दे रे मला." आणि असे बोलून मी चक्क त्याच्या मिठीत शिरून रडू लागले.


मी रडून रडून इतक्या महिन्याच्या भावना मोकळ्या करत होते,आसिफ माझ्या अधिकाधिक जवळ येत होता. हे कधी तरी होणार ह्याचा मला अंदाज होताच, कितीही वाटले तरी मी हे थांबवू शकत नव्हते.


मी हार मानली, कारण मला सुरक्षित इंडियाला जायचं होतं त्यामुळे मी आसिफच्या शारिरीक आवेगापुढे हार मानली....


माझ्या शरीराशी मनसोक्त खेळून झाल्यावर आसिफ बाजूला झाला.

त्याने मला म्हंटल,  हे बघ शर्वरी तुला बाहेर न्यायचं असेल तर त्यासाठी माझा अजून तुझ्यावर विश्वास बसायला हवा आहे, आता तरी ती वेळ आलेली नाही आहे, त्यामुळे तुला सध्या ह्या रूममध्येचं राहावं लागेल..


तो पूर्ण दिवस मी रडून घालवला,  मी विचार करू लागले,मी अजून काय करावं म्हणजे मला इथून निसटता येईल.


पुढच्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी किती वर्ष ह्या सगळ्यात अडकून पडली होती ते.


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all