बेलभंडार भाग 4
मागील भागात आपण पाहिले, शायिस्ताखान करत असलेले अन्याय आणि त्यामुळे स्वराज्याचा श्वास कोंडत होता.
त्याचवेळी केशर सारखे लोक स्वराज्यासाठी जीवाचा बेलभंडार करायला तयार होते.
जिवाजी काकांना हेराने खबर पोहोचवली. आता पाहूया पुढे.
त्याचवेळी केशर सारखे लोक स्वराज्यासाठी जीवाचा बेलभंडार करायला तयार होते.
जिवाजी काकांना हेराने खबर पोहोचवली. आता पाहूया पुढे.
"काका,म्या यिऊ का गडाव सोबत?" केशर म्हणाली.
"नग,उद्या पापड लाटायला बायका येत्याल तू थांब हितच." सगुणा रागावली.
"आईकता का? उनाळा दिस हाय. आसू द्या आमाला सोबत पोरीची." जिवाजीकाका बाजू मांडू लागले.
"कायबी करा. मला नगा सांगू काय." सगुणा रागावून आत गेली.
दोघे बापलेक हसायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुरुषी पोशाख घालून कमरेला तलवार,खंजीर आणि पाठीवर ढाल टाकून केशर तयार झाली.
"काका,मला आऊसाब दिसत्याल ना? आन राज?" केशर उत्साहात होती.
"पोरी,आपल्याला फकस्त निरोप द्याचा हाय. ते झालं की आपल काम संपल." जिवाजी हसून सांगू लागले.
दोघे बापलेक घोड्यावरून निघाले. गावातून बाहेर पडल्यावर जिवाजी सावध झाले होते. प्रत्येक येणारा जाणारा निरखून पहात होते. दहा बारा मैल प्रवास झाल्यावर एका विहिरीजवळ जिवाजी थांबले.
"केसर,हित जरा इसावा घिऊ आन न्याहारी करू." जिवाजीकाका म्हणाले.
"व्हय,हित पाणी हाय, झालच तर मोठ झाड हाय तिकड." केशर होकार देत बोलली.
दोघेही घोड्यावरून खाली उतरले. केशर पाणी घ्यायला विहिरीवर जात असताना तिला शंका आली.
"काका,ह्या येळला हिरीवर पाणी भराय बाया आन पाणके आसत्यात." मागून आवाज येत नसलेला पाहून केशर सावध झाली.
ती हळूच मागे वळली. पाहते तर जिवाजीकाकांना चार पाच मुघल सैनिक घेरून उभे होते.
"त्येंच्या नखाला धक्का लावला तरी फाडून खाईन ही केशर." केशर गरजली.
"ये नाजूक हात तलवार के लिये थोडे है |" एकजण विकृत हसत बोलत होता.
त्याची तलवार काकांच्या गळ्यावर होती. त्याचे वाक्य पुरे व्हायच्या आत केशरने फेकलेला सुरा त्याच्या छातीत घुसला होता.
पण जिवाजी काकांना मांडीवर जखम झालीच. तरीही संधी साधून काकांनी तलवार काढली. केशर दांडपट्टा घेऊन भिडली. दोघे त्वेषाने लढत होते. थोड्याच वेळात पाचही सैनिकांना त्यांनी आसमान दाखवले. काकांना ग्लानी येऊ लागली.
"काका,परत फिरा. म्या जाते गडाव." केशर विनंती करत होती.
" एवढीशान काय व्हत न्हाय." काकांनी जखम करकचून बांधली आणि घोड्यावर मांड टाकली.
गडाचा दरवाजा गाठला. तोवर काकांचे धोतर संपूर्ण लाल झाले होते. पहारेकरी धावत पुढे आले. त्यांनी काकांना आणि केशरला आत घेतले. केशरने खलिता पहारेकऱ्यांच्या हवाली केला. काकांना उपचार द्यायची सूचना देऊन आत वर्दी गेली.
"जिवाजी काका,कसे हाय हाय तूमी?" एक रुबाबदार मध्यमवयीन माणूस पुढे येत होता.
"नाईक तुमी?" काका उठून मुजरा करू लागले.
"काका,पडून रहावा. जीवावर उदार व्हवून बातमी पोचीवली." बहिर्जी अदबीने बोलले.
तेवढ्यात पुरुषी वेषात उभ्या केशरकडे त्यांनी निरखून पाहिले.
"पोरी,टोप काड. हिकड ये." त्यांनी केशरला आवाज दिला.
केशर चमकली आणि पुढे झाली.
"वाघीण हाय पोरगी काका. लगीन बिगीन कदी करताय?" बहिर्जी हसले.
"बहिर्जी काका आव तुमी पण?" केशर चिडली.
"म्हंजी बापाला सोडून जायचं न्हाय तर?" बहिर्जी हसले.
"काका, तुमी व्हय म्हणलं तर मंग व्हईल की लगीन." केशर कोड्यात बोलली.
"मंजी,पोरी काय हाय तुझ्या मनात?" नाईकांनी विचारले.
"काका,ह्या जिवाचं स्वराज्यासाठी सोन व्हावं! एकदा तरी कामगिरीवर जायला मिळावं."केशर नम्रपणे म्हणाली.
"पोरी,हा बहिर्जी तुला शबुद देतो. तुझ्यासाठी कामगिरी आन जावाय दोन्ही शोधणार बघ." तशी केशर लाजून बाजूला झाली.
"जिवाजी,खबर लई म्हत्वाची व्हती. खान पुण्यात उतरणार हाय." नाईक म्हणाले.
तेवढ्यात एक दुत धावत आला.
"नाईक आवसायबांचा हुकूम हाय. जिवाजी काका बर झाल की मंग त्यासनी जावू द्या." दुताने निरोप दिला.
"काका, पर घरला सगुणा काकी एकलीच हाय. म्या मागारी जाते." केशर म्हणाली.
"तुझ्या घरी खबर पोचीवतो. तुला कामगिरीवर जायचं तर काही डावपेच शिकावं लागत्याल. जिवाजी बरे होई पतवर तू हित थांब." बहिर्जी एवढे बोलून निघूनही गेले.
केशर मनातून आनंदी झाली होती. जिवाजी काकांना किमान आठ दिवस गड सोडता येणार नव्हता.
संध्याकाळी केशर म्हणाली,"काका,म्या जरा गडाव फिरून येती."
"पर जरा जपून अदबीन." जिवाजी तिला म्हणाले.
केशरला शस्त्रशाळा बघायची होती. चिलखत, भाले,तलवारी, जांबिया सगळे प्रत्यक्ष बघायचे होते. पण आत सोडणार कोण?
ती बाहेर एका जागेवर उभी होती.
"खंडोजी बगितल का? जत्रतले पावण हिकडबी आल्यात." आवाजाकडे केशर वळली.
समोर शंकऱ्या आणि त्यांचा मागे शिलेदाराच्या वेषात रुबाबदार असा खंडोजी उभा होता.
केशर काहीतरी उत्तर देणार होती. तेवढ्यात तिला आठवले की आपल्याला शस्त्र पहायची आहेत. त्यासरशी तिने हसून शंकरकडे पाहिले.
खंडोज केशरला शस्त्रशाळा दाखवेल का? बहिर्जी केशरला कामगिरी देतील का? स्वराज्यावर आलेले खानाचे संकट आणखी गडद होईल का?
वाचत रहा.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.
बेलभंडार.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा