अपूर्ण प्रेमकहाणी _
मनाचा कौल _ भाग १
मनाचा कौल _ भाग १
आज चौघींच्याही चेहऱ्यावरून उत्साह ओसंडून वाहत होता. बऱ्याच महिन्यांनी त्या चौघी अशा कुठेतरी तीन दिवसांसाठी बाहेर जात होत्या. माला, आशा, गीता आणि नीता या चौघी अगदी कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. नोकरी लागल्यावर, लग्न झाल्यावर पण त्यांच्यातील मैत्री टिकून होती. फक्त माला त्यांच्यात अविवाहित होती. इतर तिघी संसारात पडल्यावर सुद्धा त्या अशाच कुठे भेटत होत्या, कधीतरी मुंबईच्या बाहेर सुद्धा जायच्या. तीघींच्या घरच्यांनी त्यांना परवानगी दिली होती त्यामुळे नवरा, मुलं जी आता मोठी झाली होती, असं कोणीही त्यांच्याबरोबर नव्हतं. नाही म्हटलं तरी त्यांना घरच्यांची काळजी होतीच ती त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. परंतु खूप दिवसांनी मुंबईबाहेर कुठेतरी जाणार म्हणून त्यांच्यात एक एक्साईटमेंट होती. सर्व पन्नाशीच्या पुढच्या होत्या पण त्यांचा उत्साह एखाद्या तरुणीला लाजवेल असा होता. फोनाफोनी झाल्यावर त्या एका ठराविक ठिकाणी सकाळी सहा वाजता भेटल्या तेव्हा त्या नेहमीपेक्षा जास्तच तरुण दिसत होत्या. तीन दिवसांसाठी त्यांनी एक खाजगी कार बुक केली होती. चौघींचा प्रवास सुरू झाला मग काय गप्पाटप्पा, हास्यविनोद यांना ऊत आला होता.
मध्येच त्या एका निसर्गरम्य ठिकाणी नाश्त्यासाठी थांबल्या. चविष्ट कोथिंबीर वडी, थालीपीठ आणि चहा असं मनसोक्त खाणं पिणं झाल्यावर तिथेच पाय मोकळे करण्यासाठी थोड्या फिरल्या. तिथे जी सुंदर फुलझाडं होती त्यांचं नयनसुख घेतलं आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. साधारण दोनच्या सुमारास त्या घरगुती रिसॉर्ट मध्ये पोहोचल्या. तेथील सजावट मनमोहक होती. सुंदर टुमदार असा तो एक बंगला होता. ओसरीवर सुबक सागवानी झोपाळा होता. पुढील भागात एक चाफ्याचं सुगंधी झाड होतं. इतर फुलझाडे होती, एक-दोन चिकूची, आंब्याची झाडं होती त्यामुळे परिसरात खूप गारवा होता. जिथे जेवणाची व्यवस्था होती तिथे जाऊन त्यांनी दरवाज्यावर टकटक केली आणि एका पन्नाशीच्या आसपासच्या पुरुषाने दार उघडलं. दार उघडताच मालाचा तिचा डोळ्यांवर विश्वासच बसेना. ती एकटक त्या पुरूषाकडे पाहतच राहीली. त्यांच्याकडे बघत तो पुरुष म्हणाला,
"बोला काय हवय तुम्हाला."
"तुम्ही जेवणाची सोय पण करता ना. आम्हाला आज दुपारच्या जेवणात सहा तांदळाच्या भाकऱ्या आणि पिठलं हवे आहे आणि बाजूला आंब्याचं लोणचं बस एवढंच."
"ठीक आहे तुम्हाला एक तासात जेवण पाठवून देतो."
मैत्रिणी जायला वळल्या तरी माला मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडेच पाहत होती. त्याने पटकन दरवाजा लावून घेतला. त्याच्यात अमुलाग्र बदल झाला होता तरीही त्याचे डोळे आणि आवाज मात्र तोच होता. मालाने त्याला लगेच ओळखले. त्यानंतर ती स्वतःच्याच विचारात हरवून गेली. तिने ठरवलं की संध्याकाळी काहीतरी निमित्त काढून त्याच्याशी बोलायला जायचं. जेवताना ती सर्वांमध्ये असून नसल्यासारखीच होती. त्यांच्या गप्पांमध्ये तिचं लक्षच नव्हतं. मैत्रिणींनी तिला विचारलं अगं माला कुठे हरवली आहेस. मालाने काहीच नाही ग असे उत्तर दिलं.
संध्याकाळी काहीतरी बहाणा करून ती एकटीच तिथे गेली आणि तिने दरवाजावर टकटक केले.
(मालाने दरवाजावर टकटक केल्यावर पुढे काय घडलं पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा