Login

योग्य निवड

रंगावर काही अवलंबून नसत
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा
शीर्षक :- योग्य निवड

शुभ्रा आणि प्रिया या दोघी लहानपणापासूनच्या जिवलग मैत्रिणी. शाळा, कॉलेज, छोट्या-मोठ्या भांडणं, स्वप्नं सगळं एकत्र अनुभवलं होतं त्यांनी. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी एकमेकींना साथ दिली होती. पण लग्न झाल्यावर त्यांच्या संसाराच्या वाटा वेगळ्या झाल्या.

शुभ्राने अजिंक्य नावाच्या साध्या सरळ मुलाशी लग्न केलं. अजिंक्य रंगाने काळा, फारसा देखणा नव्हता. सगळ्या नातेवाईकांनी, मैत्रिणींनी तिची चेष्टा केली. प्रिया सुद्धा तिला खूप हिनवत होती.


“इतकी गोरीगोरी मुलगी, आणि एवढा काळाकुट्ट नवरा? आयुष्यभर पस्तावा वाटेल तुला.”

पण शुभ्रा ठाम होती. तिला रूप नव्हे, तर स्वभाव चांगला हवा होता. अजिंक्य शांत, जबाबदार आणि मनाने प्रामाणिक होता.


शुभ्राची आणि अजिंक्यची ओळख अरेंज मॅरेजमधून झाली होती. पहिल्या भेटीतच अजिंक्यने सहजपणे तिच्या मनाशी संवाद साधला होता.


तो हसून म्हणाला होता

"लोक माझ्या रंगावरून बोलतात, पण मला त्याचं दुःख नाही. मी माझ्या मेहनतीवर आणि स्वभावावर जग जिंकून दाखवेन.तुला सोबतीने घेऊन चालेन. कारण मला वाटतं, रंगाने माणसाची किंमत ठरत नाही. मन स्वच्छ असलं की रंग आपोआप उजळतो.”

त्या साध्या वाक्याने शुभ्राच्या मनात विश्वास निर्माण केला  होता. तिच्या अपेक्षा मोठ्या नव्हत्या. जो प्रामाणिकपणा, आपुलकी आणि आधार हवा होता. अजिंक्यात तिला ते दिसलं. म्हणून तिने सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्याच्याशी लग्न केल.


याउलट प्रियाने विक्रमशी लग्न केल. तो दिसायला उंच, गोरा, देखणा होता.  लग्नाच्या वेळी तर सगळीकडे तिचं कौतुक झालं..

“वा! प्रियाला तर हिरोच मिळाला.”

प्रियाच्याही मनात अभिमान निर्माण होता. तिला वाटलं,

“मला एकदम परफेक्ट पार्टनर मिळाला.”

सुरुवातीला विक्रम रोमँटिक होता. गिफ्ट्स, फिरणं, पार्ट्या ह्यातच प्रियाचं आयुष्य चाललं होत, त्यामुळे ती खूप खुश होती आणि बाकीच्यांना तिचा हेवा वाटत होता.

काळ पुढे सरकत गेला. दोन वर्षांत चित्र बदलायला लागलं. शुभ्राचा संसार साधा पण सुखी होता. अजिंक्य नोकरीत मन लावून काम करत असे. घरी आला की शुभ्राला मदत करायचा, त्यांच्या मुलाच्या समीरच्या अभ्यासात लक्ष देत असे, शुभ्रासाठी आठवणीत गजरा आणायचा.


“तू दमली असशील, मी भाजी चिरतो,”

असं तो सहजपणे म्हणायचा आणि कामाला सुद्धा लागायचा, त्याच छोट्या गोष्टीत शुभ्राला खरा आनंद मिळायचा.

पण प्रियाच्या संसारात तडे पडले, विक्रम उशिरा घरी यायला लागला. मोबाईलवर कॉल्स, मेसेजेस सतत असायचे.

प्रियाने विचारलं तर तो चिडायचा.

“तू घरातचं असतेस ना , बाहेर काय चालू आहे,  तुला काय कळतंय? माझं आयुष्य मला माझ्या मर्जीप्रमाणे जगायचं आहे.”

असच एक दिवस विक्रम तिला दुसऱ्या मुलीबरोबर दिसला. तिने रडत विचारलं,


“हे काय चाललंय विक्रम? माझ्याशी लग्न करूनही बाहेर अफेअर?”

तसा तो निर्लज्जपणे हसला.

" हे बघ मी कुणाच्या मागे जात नाही उलट मुलीच मला शोधत येतात. तेव्हा तुला राहायचं असेल तर राहा, नाहीतर तुझा मार्ग शोध.”

हे ऐकून प्रिया त्या क्षणी कोसळली. ती बाहेर पडलीच नसल्यामुळे तिच्याकडे विक्रमसोबत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

या उलट शुभ्राच्या चेहऱ्यावर समाधान होतं.  काही वर्षांनी अजिंक्यच्या मेहनतीमुळे त्याला मोठ्या कंपनीत डायरेक्टर पद मिळालं. समीर डॉक्टर झाला. गावात, समाजात शुभ्राचं नाव आदराने घेतलं जाऊ लागलं होत कारण अजिंक्यने शुभ्राला सुद्धा पुढे शिकायची प्रेरणा दिली त्यामुळे ती आज बँकेत मॅनेजर म्हणून मिरवत होती.


काही वर्षांनी दोघी मैत्रिणी भेटल्या. प्रियाच्या चेहऱ्यावर दुःख होत , तर शुभ्राच्या चेहऱ्यावर आनंद.

“प्रिया काय झालं? तू एवढी उदास का दिसतेस?”

शुभ्राने विचारलं तस प्रियाच्या डोळ्यांत पाणी आलं.


“शुभ्रा, मी नेहमी तुझी चेष्टा ऐकायची. पण तू टोमण्यांना न घाबरता अजिंक्यला निवडलंस. लोकांनी देखील तुला हिनवलं. पण आज तू सुखात आहेस.
आणि मी? सगळ्यांनी कौतुक केलं की मला हिरो मिळाला… पण तो माझा नवरा फक्त बाहेरून दिसायला देखणा आहे, मनाने नाही. त्याची बाहेर अफेअर आहेत. मला माझं आयुष्य वाया गेल्यासारखं वाटतंय.”

शुभ्राने तिचा हात घट्ट धरला.

“रूप आणि रंग क्षणभर असतात प्रिया. पण खरं आयुष्य माणुसकी, आदर आणि नात्याच्या विश्वासावर उभं राहतं. माझ्या अजिंक्यात हे सगळं आहे, म्हणून मी सुखी आहे.”

प्रिया शांत झाली. तिला पहिल्यांदाच उमगलं,

योग्य निवड ही चेहऱ्याच्या सौंदर्यात नसते, तर अंतःकरणाच्या सौंदर्यात असते.

प्रियाने मान डोलावली आणि म्हणाली,


“हो, निवड रूपावरून नाही, स्वभावावरून करायला हवी. तू ते दाखवून दिलंस.”

शुभ्राच्या आयुष्यात समाधान होतं. नातेवाईक जे टोमणे मारायचे, तेच आता कौतुकाने बोलू लागले.
“तुझी निवड भारी होती गं, तू खरंच हिरा शोधलास. "

पण शुभ्रा हसून उत्तर द्यायची,

“मी हिरा शोधला नाही, त्याच्यातली चमक ओळखली.”


प्रियाने मात्र आपल्या संसारातून धडा घेतला. तिने स्वतःसाठी नवी सुरुवात केली, स्वतःच्या पायावर उभी राहण्याचा निर्धार केला.

रंग, रूप, देखणेपणा हे बाहेरचं असतं. पण नात्याचं खरं सौंदर्य हे प्रामाणिकपणा, आपुलकी आणि विश्वास यांत असतं. रंगावरून, रूपावरून माणसाची किंमत कधी ठरत नाही. खरी किंमत असते ती त्याच्या मनाची, मेहनतीची आणि स्वभावाची. शुभ्राने आयुष्यभर लोकांचे टोमणे ऐकले, पण काहीही न बोलता तिची निवड बरोबर असल्याचं तिने सिद्ध केलं.

आज अजिंक्य फक्त तिचा नवरा नव्हता, तर तिच्या योग्य निवडीचा अभिमान होता.


समाप्त
@हर्षला "सान्वी"
0