Login

उपरती ..

स्वतःला जाच झाला की समोरच्याला होणाऱ्या त्रासाची जाणीव होते.

उपरती...
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

चार आठ दिवसांसाठी माहेरी आलेल्या आपल्या लेकीचं मनात नक्की काय चालू आहे ते शैलाकाकूंना काही केल्या कळतं नव्हतं. कधी कपडे मशीनला लाव तर कधी वाळत घाल, कधी कपड्यांच्या घड्या कर, तर कधी कुकर लाव, भाजी कर सारखं आपलं तिचं काही ना काही काम सुरू होतं. माहेरपणाला आली आहे तर मस्त खावं, प्यावं, ताणून दयावं असं शैलाकाकूंना वाटतं होतं पण दर्शनाच आपलं भलतंच चालू होतं.

“तुला स्वस्थ बसता येतं नाही का? माहेरी आली आहेस तर जरा आराम कर, सासरी गेल्यावर सगळं तुलाच करायचं आहे” दर्शनाच्या हातातून सुरी काढून घेत अखेर शैलाकाकू वैतागून म्हणाल्या.

“अगं वाहिनी ऑफिसमधून दमून घरी येईल. आल्यावर तिची चिडचिड होईल, तिचं काम पटकन व्हावं म्हणून.”

“तिलाच हौस आहे नोकरीची. आमची जबरदस्ती नाही. मी तर तिला मागेच म्हंटले होते नोकरी सोड म्हणून.” शैलाकाकू चिडून म्हणल्या.

हल्लीच्या महागाईच्या दिवसात एकाच्या पगारात कुठे भागतं. सुनेची नोकरी चालू आहे म्हणून चार चैनीच्या वस्तू घरात येतात. जरा ऐशा आरामात जगता येतं हे ना शैलाकाकूंच्या लक्षात येत होतं ना दर्शनाच्या सासूबाईंच्या. त्या ही दर्शनाला असंच बोलत राहायच्या. आपल्या सासूचे बोलणं आठवून दर्शनाच्या डोळ्यात टचकन पाणीच आलं.

“काय झालं दर्शू बाळा, सासरी सगळं ठीक आहे ना? व्यवस्थित वागतात ना सगळे?” शैलाकाकूंनी लेकीला आपल्या जवळ बसवत काळजीने विचारलं.

“छानच म्हणायचं. गोड गोड बोलून मला कामाला लावतात.”

“ओढाताण होतं असेल तर नोकरी सोड नाहीतर स्वयंपाकाला बाई लाव.” नोकरी सोडून दर्शना घरी बसणार नाही माहीत असूनही शैलाकाकूंनी तिला सुचवलं.

“बाकी सगळ्या कामांना मावशी येतात फक्त चार माणसांचा स्वयंपाक तर करायचा असतो ते ही या मुलींना जमत नाही. आमच्या वेळी जॉइंट फॅमिली होती, पाहुणेराहुणे सतत असायचे. सणावर असेल तर घरचीच वीस पंचवीस माणसं व्हायची, आम्ही नाही केलं! हल्ली कुणी कोणाकडे जात नाही ना येत नाही, तरी यांना होत नाही. एकदा मी आईंना पोळ्यांना बाई लावूया म्हटलं होतं तर त्यांनी मला एवढं रामायण ऐकवलं. एवढं सगळं ऐकल्यावर पुढचं बोलणंच खुटलं. माझ्या सासूबाई तुझीच कार्बन कॉपी आहेत. तुला चालत नाही स्वयंपाक घर कोणाच्या हातात दिलेलं तसंच त्यांनाही चालत नाही. मान्य आहे तुम्ही सगळं एकहाती केलंत पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती आता नोकरी करून खरंच दमायला होतं.”

दर्शनाने सासूच नाव घेत आईला सुनावलं. तिला काय म्हणायचं आहे ते काकूंना कळलं होतं तरी त्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.

“जावई बापू, सासरेबुवा काही बोलत नाहीत?”

“तो दादांसारखाच श्रावणबाळ. आईविरुद्ध बोललेला एक शब्द सुद्धा खपवून घेणार नाही. त्यापेक्षा न बोललेलं बरं. सासऱ्यांच म्हणशील तर त्यांच्या मताला किंमत नाही त्यामुळे ते बाबांसारखेच कशात पडत नाहीत. रिटायर्ड लाईफ मस्त एन्जॉय करत आहेत.”

“तू आपली सरळ वेगळी हो बाई.” शैलाकाकूंनी लेकीला सल्ला दिला.

“वेगळं रहायचं नाव काढलं तर प्रथमेश आकांडतांडव करेल. दादा तुम्हाला सोडून राहू शकणार नाही अगदी तसंच माझ्या नवऱ्याचं आहे. आपलंच नाणं खोटं त्यामुळे काही बोलताही येत नाही.” दर्शनाने तोंड वेंगाडलं.

“सासरमाहेर, इकडचं तिकडचं काय चाललंय काय तुझं? ही असली तुलना मी बिलकुल खपवून घेणार नाही.” दर्शनाच बोलणं ऐकून शैलाकाकू चांगल्याच चिडल्या होत्या.

“तुलना करत नाही आई, मला नुकत्याच झालेल्या वास्तवाची जाणीव करून देत आहे.”

दर्शनाच गेल्यावर्षी लग्न झालं होतं. लग्नाआधी ती कुठल्याही कामाला हात लावत नव्हती. अभ्यास, कॉलेज, मैत्रिणी, यातच गुंग असायची. नोकरी लागल्यावरही तीच तऱ्हा. डबा काय पाण्याची बाटलीसुद्धा भरून तिच्या हातात द्यायला लागायची. काम केलं तर केलं नाही तर नाही सगळा मूडी कारभार. दर्शनाच्या या वागण्यामुळे तिची वाहिनी नेत्रा वैतागायची. दर्शनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यापेक्षा अजून लहान आहे, वर्ष दोन वर्षात लग्न होऊन जाईल सासरी म्हणत तिची कौतुकाने तिची बाजू घेतली जायची. दर्शना जशी लग्नाआधी वागायची तशीच तिची लहान नणंद प्रांजल वागत होती. मोठी माहेरी आल्यावर इकडची काडी तिकडे करत नव्हती. किती धूळ, किती पसारा, दर्शनाच लक्षच नाही घरात म्हणत तिच्या सासूला दर्शनाविरुद्ध भडकवायची त्यामुळे मोठ्या नणंदबाई प्रीतीताई माहेरी येणार म्हंटल्या की दर्शनाला धडकीच भरायची. तिच्या सासूबाई दिवसभर टीव्हीपुढे अथवा पोथीपुराण घेऊन बसायच्या, मुलगा कामावरून यायची वेळ झाली किंवा त्याच्या सुट्टीच्या दिवशी कामं करण्याचा आव आणायच्या. एकंदरीत काय दर्शना आणि शैलाकाकू जशा नेत्राशी वागायच्या तशीच वागणूक दर्शनाला तिच्या सासरी मिळत होती. पर दुःख शीतल असते. तेच
स्वतःच्या वाटाल्या आले की त्याची दाहकता जाणवते असेच काहीसे दर्शनाच्या बाबतीत झाले होते म्हणूनच तिचे वागणे, बोलणे बदलले होते.

“म्हणजे आता या वयात मी कामं करावी आणि तिने आराम करावा अशी तुझी इच्छा आहे तर…” शैलाकाकू काही केल्या आपला हेका सोडायला तयार नव्हत्या.

“फार काही करावं अशी अपेक्षा नसते गं, हातासरशी कपबश्या विसळून ठेवल्या, कुकर लावला, केलेल्या कामाची जाण आहे हे कळलं तरी खूप बरं वाटतं.” दर्शना आईला समजावत होती.

स्वतःला जाच व्हायला लागल्यावर दर्शनाला नेत्राला होणाऱ्या त्रासाची जाणीव झाली होती. तिला आपल्या वहिनीची किंमत कळली होती.

“माझी नणंद माहेरी येणार म्हंटल्यावर माझ्या पोटात गोळा येतो, तसा नेत्रावहिनीच्या येऊ नये, दादा माझ्या पासून दुरावू नये असं वाटतं.” दर्शनाने ओलावलेल्या पापण्या टिपल्या.

लेकीच्या कातर स्वराने शैलाकाकू गहिवरल्या. त्या अगदी दर्शनाच्या सासूप्रमाणेच वागत असल्याने यावर काय बोलावे त्यांना काहीच कळेना.

“मी जे वागले तेच परतफेडीच्या स्वरूपात मला मिळू लागले. त्यामुळे मला अक्कल आली, चूक कळली. तू ही यावर विचार कर.” गप्प झालेल्या शैलाकाकूंकडे बघत दर्शना म्हणाली.

ठरल्याप्रमाणे चार पाच दिवस माहेरी राहून, तूप रोटी खाऊन दर्शना दुपारच्या गाडीने आपल्या सासरी गेली. पण जाताना काकूंची झोप मात्र उडवून गेली, त्या कमालीच्या अवस्थ झाल्या. काय करावे काहीच सुचेना, कशात लक्ष लागेना. विचार करून डोकं फुटायची वेळ आली. अखेर सातच्या सुमारास शैलाकाकू किचनमध्ये आल्या. ‘दर्शनाला जाच होताच माझे डोळे उघडले. तिच्या सासरच्यांना आपली चूक कधी उमगेल, त्याचं वागणं कधी सुधारेल माहीत नाही पण ह्यापुढे माझ्या हातून तरी ह्यापुढे असं होणार नाही. दर्शना आणि नेत्रात भेदभाव करणार नाही’ मनोभावे प्रार्थना करत त्यांनी देवाला दिवा लावला. आपल्याला जशी उपरती झाली तशी दर्शनाच्या सासरच्यांनाही एक ना एक दिवस होईल, तिच्या सासूचे वागणं, बोलणं सुधारेल अशी आशा बाळगत, रोजच्या प्रमाणे टिव्ही बघत टाइमपास करत बसण्यापेक्षा, आपल्या सुनेचा जीव जाणत स्वयंपाकाला लागल्या.