Login

लव आज कल भाग दोन

लव आज कल The Love
लव आज कल भाग दोन

“आज कालच्या मुलांना काय झालं आहे कुणास ठाऊक? कुणी कुणाचं ऐकायलाच तयार नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांचा उतावीळपणा असतो. आता हेच पहा ना लग्नाच्या वेळी मनोजला मीरा किती आवडली होती. लग्न करीन तर मीराशीच नाहीतर करणारच नाही अशी जणू मनोज ने भीष्मप्रतिज्ञाच केली होती. लग्नाला चार सहा महिने होत नाहीत तर यांचे खटके उडणे सुरू झाले.” मनोजची आई रमा काळजी युक्त स्वरात मनोजच्या वडिलांशी बोलत होती.

“असू दे ग सुरुवातीला सगळ्या लग्नांमध्ये असंच असतं. लग्नाचे गुलाबी दिवस संपले की शब्दाला शब्द लागणारच, मग कधी अबोला, तर कधी चिडचिड असं होणारच. आपलं नशीब चांगलं समज की मीरा समजूतदार मुलगी आहे‌ मनोजच्या या रागीट स्वभावापुढे तिने अजून मान तुकवली नाही. मनोज खरंच आजकाल फारच उतावळा झाला आहे. त्याच्यातला संयम जणू दिवसेंदिवस संपतच आहे. लग्न करतानाही जणू तो गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार होता आणि आता लग्न झाल्यानंतरही त्याचे पुन्हा पाढे पंचावन्न. त्याला जरा समजून म्हणावं “लग्न झालं तुझं आता, लहान मुल नाहीस तू की म्हटल्याबरोबर प्रत्येक वस्तू तुला मिळेल. एक जबाबदार व्यक्ती म्हणून तरी वाग.”मनोजचे वडील आणि रमाताईं मध्ये गप्पा चांगल्याच रंगल्या होतात.

“चला तुम्ही जरा बातम्या ऐका मी जाऊन स्वयंपाकाचा बघते. मीराला अजून सवय नाही हो. नवीन आहे ती. पण शिकायची हौस आहे तिला. जसं सांगितलं तसं करते, उगीच प्रत्येक गोष्टीत नाक मुरडत नाही, की ‘मला कंटाळा आला म्हणून जबाबदारीही झटकत नाही.’ रमाने मीराची बाजू घेतली

“हो पण मघाशी तू केलेले पोहे अगदी मस्त जमले होते आणि चहाही अगदी फक्कड होता बरं का.” दिवाणखोलीतलं वर्तमानपत्र आणायला गेलेल्या मनोजच्या कानावर हे शब्द पडले आणि परत त्याच्या डोक्यात राग शिरला. तो मनोमन विचार करत होता.

“आपली आई आपल्या वडिलांची किती काळजी घेते. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळते. त्यांच्या आवडीनिवडीकडे विशेष लक्ष देते. आणि इथे तर सगळी बोंबाबोंब. काहीही म्हटलं की मीराचं उलट उत्तर तयारच. माहित नाही आयुष्यातला तो कोणता क्षण होता, नशिबाला ग्रहण लागलं होतं की भद्रा सुरू होती. मला या बाईची भुरळ पडली आणि मी तिच्या प्रेमात वेडा होऊन लग्नाचा निर्णय घेतला. काही म्हणण्या-बोण्याची तर सोयच नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे असतं.

“मनोज ए मनोज चल जेवायला. अरे आज निराणी तुझ्या आवडीचा गोळा भात केला आहे चल पटकन हात पाय धुवून ये.” रमाने मनोजला प्रेमाने जेवायला बोलावलं. सगळेजण जेवायला बसले. ताटात गोळा भात, दही मिरची, सांडगे, चिंचेची कढी आणि चिरलेला बारीक कांदा बघून मनोजची भूक अधिकच चाळवली. पण हे सगळं करण्याच्या घाई गडबडीत मीरा हिंग घालून जीरं-मोहरीचं तेल करायचं विसरली. परत मनोजच्या चेहऱ्यावर बारा वाजले जेवताना तो चिडचिड करत होता.

“काय रे मनोज केवळ हिंगाचे तेल नाही म्हणून इतक्या छान जेवणावर असा राघ काढू नये. थांब पटकन मी तेल गरम करून आणते.” रमाने पटकन हिंगाचे तेल करून आणलं.

जेवण झाल्यावर मनोज चे बाबा त्याला समजावत होते. मनोज कुणाचाच आयुष्य कधीच परफेक्ट नसतं. सगळ्या विवाहित जोड्यांमध्ये काही ना काही उणीव असतेच. परफेक्ट जोड्या असतात त्या फक्त चपला जोड्यांच्या. आज मीराने खरंच खूप छान गोळा भात बनवला होता. मान्य आहे की तिला स्वयंपाकाची सवय नाही पण ती प्रयत्न तरी करते आहे ना! माणसाच्या प्रयत्नांना जास्त महत्त्व असतं मनोज. आता राग सोड रात्र बरीच झाली आहे जा झोपायला.” मनोज चे बाबा मनोजला समजावून सांगत होते.

“मीरा मला खरंच तुझं फार कौतुक वाटतं. आपल्याला जे येत नाही ते शिकून घेण्याची तुझी इच्छा पण आहे आणि तु प्रयत्न पण करतेस. असाच समजूतदारीने दोघेजण संसार करा. मान्य आहे मनोज थोडा तापट आहे पण काही गोष्टी दुर्लक्ष करून तर काही गोष्टी सोडून देण्यातच संसार सुखाच खरं रहस्य असतं.” रमाने मीराचं कौतुकही केलं आणि समजूतदारीचे चार शब्दही तिला सांगितले.


©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.