लव आज कल अंतिम भाग
“मीरा ए मीरा. अग मी आलो आहे ऑफिस मधून.” मनोज उत्साहात मीराला आवाज देत होता.
“वेलकम होम! पाणी देऊ?” मीराने सहजच विचारलं.
“नाही ग पाणी कशाला देते. माठापर्यंत जाशील तर तुझे पाय दुखतील आणि माझ्यासाठी पाण्याचा ग्लास भरून आणशील तर तुझे हात झीजतील. साधी गोष्ट आहे की एवढ्या ट्राफिक मधून, दमुन घरी आल्यानंतर मला थंड पाणी हवं असतं तरीही रोज तू तेच विचारते.” मनोजची परत चिडचिड सुरू झाली
“मग मलाही हे माहिती आहे, की घड्याळाचा काटा साडेसहा वर गेला की तुम्ही रोज ऑफिसमधून घरी येता, नवीन काय आहे त्यात? की मी रोज आरतीच ताट घेऊन तुमच्यासाठी नटून-थटून दरवाज्यात उभा राहावं?” मीरा ने सडेतोड उत्तर दिलं.
“मला ना खरंच कळत नाही की मी तुझ्यासोबत कसा वागू? मी कितीही प्रेमाने तुझ्याशी वागलो ना तरीही तू वाकड्यात शिरते.” मनोज वैतागून बोलत होता.
“मीरा मनोजला घरात तरी घे की आता उंबरठ्यातच दोघे जण गुजगोष्टी करणार?” रमाने कशीबशी वेळ मारून नेली.
मनोजचं चहा पाणी झाल्यानंतर रमाने सांगितलं की तिच्या बहिणीला जोराचा हार्ट अटॅक आला आहे त्यामुळे तिला बहिणीला भेटायला जावं लागेल. तेव्हाच मीराही म्हणाली की तीच्या भाच्याचं जावळं काढायचं ठरलं आहे त्यामुळे तीलाही जावचं लागेल.
“आई हे बघ मावशीला हार्ट अटॅक आला आहे तर तू तिला बघायला नक्की जा. आपल्याला अडीनडीला तिने नेहमीच मदत केली आहे. आणि तू मोठी बहीण असल्याने तुझं जाणं गरजेचंही आहे.” मनोजचं म्हणणं पूर्ण व्हायचंच होतं तेवढ्यात मीरा लगेच बोलली.
“हे बघा मला एकच भाऊ आहे आणि त्याचं हे पहिलाच बाळ आहे. गेले कित्येक वर्षे ते लोक बाळासाठी प्रयत्न करत होते. एवढ्या हौसेने दादा ने मला बोलावलं तर मला जायचं आहे आणि मी जाणारच.” मीराने स्वतःचा निर्णय सांगितला.
“मीरा तू काय डोक्यावर पडली आहेस का? अगं आईचं जाणं अतिशय गरजेचं आहे मावशीला बरं नाही आहे, तिच्या जीवावर बेतलं आहे आणि तुला काय बारसे आणि जावळं महत्त्वाचे वाटतात?” मनोज संतापाने थरथरत होता.
“मनोज तू शांत हो. मीरा तुझा तुझ्या भावाच्या इथला कार्यक्रम खरंच महत्त्वाचा आहे. आणि रमा तू ही तुझ्या बहिणीला भेटून ये मी आणि मनोज घरी करू ऍडजेस्ट.” रमाचा चिंताग्रस्त चेहरा बघून मनोजचे बाबा बोलले, “काळजी करू नकोस. मला दोन-तीन भाज्या बऱ्यापैकी येतात, मनोज भात करत जाईल आणि खानावळीतून आम्ही पोळ्या घेऊन येवू. तू निश्चिंतपणे जा इथली काळजी करू नको. जा आता लवकर गाडी सुटेल.”
“मी बाजूच्या शांताबाईंना सांगितलं आहे की मी येईपर्यंत धुणी, भांडी आणि झाडू पोछा त्या तुम्हाला करून देतील. काही लागलं तर मला फोन करा मी लगेच येते. मनोजचे बाबा तुमच्या गोळ्या आपल्या खोलीतल्या टेबलावर ठेवल्या आहेत. थंडीत जास्त बाहेर जाऊ नका. काळजी घ्या. येते मी.”
रमा आणि मीरा त्यांच्या त्यांच्या गावाला निघून गेल्या.
आठ दिवसानंतर मनोज ने आई आणि बायको दोघींनाही फोन केला. आईला सांगितलं की बाबांना बरं नाही आणि मीराला सांगितलं की त्याची स्वतःची तब्येत ठीक नाही. मनोजचा फोन आल्याबरोबर रमा लगेच दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या गाडीने घरी पोहोचली. पण मीराने मात्र मनोजचं म्हणनं साफ धुडकावून लावलं. तिने स्पष्ट सांगितलं की तिला अजून माहेरी दोन-चार दिवस राहायचं आहे, त्यानंतरच ती घरी परतेल.
“बघीतलतं बाबा, मी फोन केल्याबरोबर आई तुमच्यासाठी लोगोलग घरी निघून आली पण मीरा मात्र, आता मी खरच मीरा सोबत राहू शकत नाही. मला आता कठोर निर्णय घ्यावाच लागेल. मी न तिला आता सोडूनच देणार आहे!”
“मनोज इतकी घाई करू नको प्रत्येक नात्याला वेळ द्यावा लागतो आणि नवरा-बायकोच्या नात्याला तर प्रेम, वेळ आणि विश्वास सगळच द्यावं लागतं.” रमा मनोजला समजून सांगत होती
“काय मिस्टर मनोज कोणाला सोडण्याचा विचार सुरू आहे?” अचानक मीराचा आवाज ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. “जर मला सोडणार असाल तर पुढचे सात जन्म तुम्हाला परत मीच कैद करेल! आली का गोष्ट लक्षात?” मीरा मिश्किल पणे हसत बोलत होती.”
“अग पण तू तर दोन-चार………” मनोजचं वाक्य मध्येच तोडत मीरा म्हणाली, “माझी आठवण येते म्हणून, तू तुझी तब्येत ठीक नाही असा खोटा फोन केलास ना? म्हणून मग मी पण तुला त्रास देण्यासाठी, मी अजून दोन-चार दिवस येत नाही असं खोटंच तुला उत्तर दिलं. मनोज गेली दोन वर्षे तुला ओळखते आहे. केवळ चार-सहा महिन्याच्या आपल्या वैवाहिक जीवनाने ना तुझ्या स्वभावात फरक पडणार ना माझ्या!” मीराच्या या गोड आश्चर्याच्या धक्क्याने सगळेच सुखावले.
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.