Login

लिफ्टमधील ते दोघे

दोन अनोळखी माणसांची गोष्ट

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा


"हो आज खूपच उशीर झाला. ऑफिसमध्ये खूपच काम होते, पण सगळे झाले व्यवस्थित. हो आता लिफ्टमध्ये शिरतेय, पाच मिनिटात घरी पोहचेल गं आई. तू नको काळजी करू" असे म्हणत निशा लिफ्टमध्ये शिरली.

'आई पण किती काळजी करते उगाचच...' फोन पर्समध्ये ठेवताना निशा स्वतःशीच पुटपुटली. तिने लिफ्टमध्ये नजर फिरवली तेव्हा एक आजोबा आणि एक मुलगी तिच्यासोबत दिसले आणि तिला लिफ्टमध्ये ती एकटीच नाही हे पाहून जरा हायसं वाटलं.

दुसर्‍या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि एक तिशीच्या आसपासचा तरूण लिफ्टमध्ये शिरला. निशा घड्याळाकडे पाहू लागली उगाचच. तिला लिफ्टमध्ये नेहमीच बोअर व्हायचं.

'लोक इतक्या मोठ्या बिल्डिंग का बरं बांधतात? आपल्या गावाकडे किती छान असतं' या शहरांत राहून देखील तिचं मन कायम गावाकडे धाव घ्यायचं. आजही ती तिच्याच विचारांत हरवली होती. लिफ्ट थांबली तशी ती भानावर आली. ते आजोबा आणि मुलगी चौथ्या मजल्यावर उतरले आता लिफ्टमध्ये निशा आणि तो तरूण मुलगा दोघेच होते.

431निशा स्वतःची बॅग सावरून लिफ्टमध्ये एका कडेला उभी राहिली.
'चौथा मजला अजून सात मजले बाकी आहेत, कधी येणार घर?' ती मनातच पुटपुटली.

निशा मुंबईतील एका मोठ्या बिल्डिंगमध्ये अकराव्या मजल्यावर एका छोट्या फ्लॅटमध्ये तिच्या मैत्रिणीसोबत राहत होती. एरवी तिचे ऑफिस सहालाच संपायचे त्यामुळे घरी आठ वाजेपर्यंत कशीही येऊन जायची आज मात्र तिला ऑफिसबाहेर निघायला आठ वाजून गेले होते त्यामुळे आत्ता दहा वाजले होते तिला तिच्या बिल्डिंग पर्यंत पोहचायला. ती खूपच थकली होती. कधी एकदा घरी जातेय असं झालं होतं तिला इतक्यात लिफ्ट अचानक बंद पडली.

"दुष्काळात तेरावा महिना!" ती जोरात ओरडली त्या सरशी तिच्या कपाळावर आठ्या निर्माण झाल्या. इतक्यात तिचे लक्षात शेजारी उभ्या असलेल्या तरूणाकडे गेले तशी तिने पट्कन जीभ चावली.

पाच- दहा मिनिटे झाली असतील लिफ्ट बंद पडून, आता मात्र निशा अस्वस्थ व्हायला लागली. एकतर तिला बंद बंद असं काही नकोच वाटायचं, आणि आता पंधरा मिनिटांपासून ती लिफ्टमध्ये अडकली होती. तिला दरदरून घाम फुटायला लागला.

"कोणी आहे का? प्लीज हेल्प.." हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ लागले. तिची अस्वस्थता पाहून तिच्या शेजारी उभा असलेला तरूण तिच्या जवळ आला.


"हॅलो मिस.. प्लीज रिलॅक्स व्हा.. हे बघा तुम्ही इथून कितीही आवाज दिला तरीही तो कोणापर्यंत पोहचणार नाही.. तुम्ही शांत व्हा. " त्याचे बोलणे ऐकून निशाच्या डोळ्यातून अजूनच अश्रू वहायला लागले. ती खूप अस्वस्थ होऊ लागली.

"मिस हे पहा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल.. बिल्डिंगमध्ये एव्हाना लक्षात देखील आला असेल ते लोक करतील सॉल्व्ह तुम्ही काळजी नका करू. " तो तरूण तिच्या जवळ जात बोलला तशी निशा मागे सरकली.

" मी निनाद जोशी.. आपण आत्ता ज्या स्थितीत आहोत त्यामध्ये माझ्यासारख्या अनोळखी मुलाला जवळ आलेले पाहून तुम्ही घाबरणे अगदीच स्वाभाविक आहे हो पण मी फक्त तुमची मदत करायला जवळ येत होतो

एकतर मुली रडायला लागल्या की त्यांना शांत कसे करायचे हे काही मला कळत नाही. तसा मी खूप सभ्य आहे.. तुम्ही अजिबात घाबरू नका मला.. माझ्या चेहर्‍यावरून तर मी गुंड, मवाली वाटतं सुद्धा नाही.. " निनाद एकसारखा बोलत राहतो तसे त्याचे बोलणे ऐकून निशा हसते. निनादला हायसे वाटते.

" सॉरी...ते मला असं सगळीकडून बंद असलं की खूपच गुदमरायला होतं.. अस्वस्थ वाटतं.. " निशा बोलली.

" अहो साहजिक आहे अगदी.. एक मिनिट.. " असे म्हणतं निनादने तिच्याच सॅकच्या कडेच्या कप्प्यात असलेली पाणी बॉटल काढून तिला दिली.

"अरेच्चा.. मी विसरले.." निशा बोलली

" अहो बरेचदा परिस्थिती अशी येते की आपण काही गोष्टी विसरतो.. तुम्ही पाणी घ्या अगोदर.." निनादचे बोलणे ऐकून निशाने पाणी घेतले तसे तिला थोडेसे बरे वाटले.

"खूप वेळ झाला ना? लिफ्ट अशी कशी बंद पडली?" निशाला निनादसोबत बोलणे कम्फर्टेबल वाटायला लागले.

"अहो बरेचदा काहीतरी वायरचा वगैरे इश्यू येतो किंवा अजून काही पण या मुंबई सारख्या शहरात लिफ्ट बंद पडली की कळते बिल्डिंगमध्ये आणि तसे लगेच तातडीने पाहिले जाते. माहित नाही आज कायं घडलं? " निनाद निशाशी बोलतो.


"खरं सांगू मला ना हे लिफ्ट वगैरे नकोच वाटतं यामुळे पण कायं करणार तुमच्या या मुंबईत एवढ्या मोठ्या इमारती. "

" तुम्ही गावाकडच्या का? " निनादने लगेच प्रश्न केला.

" अरेच्चा! तुम्ही कसे ओळखले?" निशा कुतुहलाने बोलली.

" तुमच्या मुंबईत या शब्दावरूनच ओळखले. खरंय अगदी तुमचं गावाकडचे मोकळे वातावरण आणि ही शहरातील गर्दी कधीतरी नकोशी होते. " निनाद बोलला.

" हो पण कायं करणार यावेच लागते पोटासाठी. शेवटी शहर जगवते तुम्हाला." इतक्यात लिफ्टमध्ये एसी चालू होतो आणि लिफ्ट वर जायला लागते.

" हुश्श.. सुरू झाली. " निशा ओरडली आनंदाने तसा निनाद हसला.

" आज तुमच्यामुळे माझी थोडी भिती गेली.. खरच तुम्ही नसता तर कायं केले असते मी? खूप खूप आभार तुमचे. " निशा निनादचे आभार मानते.

" अहो त्यात कायं एवढं? उलट आयुष्यात आज एका छान व्यक्तीशी ओळख झाली माझी.. चला आपल्या वाटा आता वेगळ्या होतील.. कधी आयुष्यात पुढे भेट ठरली असेल तर नक्की भेटू.. बाय! " असे म्हणून निनाद दहाव्या मजल्यावर उतरला निशा मात्र त्याच्याकडे पाहत राहिली.

आज एका अनोळखी व्यक्तीशी अवचित घडलेली भेट तिच्या आयुष्यात नवा रंग भरून गेली.


*समाप्त*

आयुष्यात कधीकधी काही अनोळखी लोकांसोबत घडलेली भेट खास ठरते.