चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: वाळीत
तो एकटाच सर्वात शेवटी बसला होता. त्याच्यासोबत कोणी बोलत नव्हते. तोही कोणाशी फारसे बोलत नसायचा.
क्लास सुरू झाला आणि त्यानंतर सगळेजण शिकवण्याकडे लक्ष देत होते. तो मात्र शांत बसला होता. त्याच्यासाठी हे काही नवीन नव्हते. जन्मापासून त्याला वाळीत टाकणे म्हणजे काय असते, हे चांगलेच समजले होते.
" काय गं, हा कोण नवीन मुलगा आपल्या क्लासमध्ये आला आहे ? " चित्राने आपल्या मैत्रिणीला विचारले.
" तू, एक आठवडा झाले आली नाहीस ना, त्यामुळे तुला माहीत नाही. तो नवीन मुलगा आलेला आहे ना, त्याचे नाव निशांत आहे. "
" तो मग असा एकटा का बसला आहे ? बाकीचे तर सगळेजण नवीन कोणी आले की, लगेच त्यांच्याशी मैत्री करतात." त्याला बघून तिने विचारले.
" असल्या मुलासोबत कोण बसणार आणि कशाला कोण त्याच्याशी मैत्री करेल?" चित्राची मैत्रीण तिला म्हणाली.
" असला मुलगा म्हणजे ? असे काय त्याने केले आहे ?" चित्राला मात्र त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.
" त्याने काही नाही केले, पण त्याच्या आई-वडिलांनी केले आहे. " तिची मैत्रीण म्हणाली.
" म्हणजे ? मला काही समजले नाही." चित्राला आपली मैत्रीण अशी कोड्यात का बोलते, हे समजतच नव्हते.
चित्राच्या मैत्रिणीने तिला निशांतबद्दल तिच्या कानात सांगितले.
" अगं, त्यात त्याची काय चूक आहे ? तुमचे असे वागणं मला तर बिल्कुल पटत नाहीये. " चित्रा न राहून म्हणाली.
" हे बघ, आमच्या बिल्डिंगच्या पलीकडे चाळी आहेत. तिथे हा राहतो आणि त्यामुळे सर्वांना त्याच्याबद्दल माहीत आहे. तुला माहितीये हे त्याचं ट्रान्सफर केलेलं दुसरं कॉलेज आहे. आधी सुद्धा त्यांना याच कारणावरून दुसऱ्या कॉलेजनी काढलेले होते, परंतु त्याच्या आईने खूप विनंती केली, म्हणूनच त्याला ह्या कॉलेजमध्ये प्रवेश दिला आहे. आता काय माहीत, हा इथेही किती दिवस असेल की पुन्हा त्याची दुसरीकडे ट्रान्स्फर केली जाईल. " चित्राची मैत्रीण तिला म्हणाली.
" पण हे सगळं तुला कसं काय माहीत आहे ?" चित्रा बारीक डोळे करून तिला विचारत होती.
" कारण त्याची आई आमच्या बिल्डिंगमध्ये कामाला येते आणि तिच्याबद्दल सर्वांना माहीत आहे." तिने सांगितलं.
निशांतला सर्वांनी वाळीत टाकलेले होते आणि त्याच्या मागचे कारण त्याचा भूतकाळ समजल्यावर ते सर्वजण त्याच्यापासून दूर राहत होते.
काही वर्षानंतर, निशांत आणि चित्रा एका ठिकाणी दिसले.
" अरे, तू निशांत ना. कसा आहेस?" तिने स्वतःहून विचारले.
" मी ठीक आहे." एवढेच तो म्हणाला.
" मग मला विचारणार नाहीस का मी कशी आहे ते ? " तिने मस्करीत त्याला विचारले.
" कशी आहेस तू चित्रा ? " मग त्याने सुद्धा औपचारिकता म्हणून विचारले.
" मी ठीक आहे. तुझे कसे चालू आहे ? लग्न केले असशील ना?" तिने भराभर त्याला प्रश्न विचारले.
" नाही. मी एकटाच बरा आहे." तो म्हणाला.
" बरं, मला तुझा मोबाईल नंबर देशील का ? माझे ना तुझ्याकडे जरा काम आहे. " ती म्हणाली.
" माझ्याकडे तुझं काय काम आहे ? " त्याने नाखुशीनेच विचारले.
" ते मी तुला फोन केल्यावर तेव्हा सांगेन. आता मी थोडीशी घाईत आहे, तर तू लवकर तुझा नंबर दे आणि हो खरा नंबर दे. नाहीतर चुकीचा नंबर देशील, मी आता लगेचच तुला मिस कॉल देणार आहे." ती म्हणाली.
त्याने मोबाईल नंबर दिल्यावर, तिने खरोखर त्याला मिस कॉल दिला. त्याचा फोन समोर वाजला आहे, बघून तो त्याचाच नंबर आहे, ह्याची खात्री करून झाल्यावर ती नंतर बोलू; असे म्हणून तिथून निघून गेली.
' काय मुलगी आहे ही, कॉलेजमध्ये तर सगळे बोलत नव्हते, म्हणून ही सुद्धा माझ्याशी बोलत नव्हती. आज अचानक अशी भेटली आहे, तर लगेच मोबाईल नंबर मागितला. आता अजून काय माझी थट्टा करायची बाकी आहे ? ' मनातच तो विचार करत म्हणाला.
रात्री आठवणीने चित्राने निशांतला फोन केला.
" हॅलो, निशांत." तिने फोन केल्यावर त्याने उचलल्यावर ती म्हणाली.
" तुझे काय काम आहे ?" त्याने थेट प्रश्न विचारला.
" मला वाटलं, तू पहिले हॅलो बोलशील, पण पहिला होता तसाच आत्ता पण आहेस." ती हसतच म्हणाली.
" तुला जर काही काम नसेल तर, मी आता फोन ठेवतो." त्याला मात्र तिच्याशी फार काही बोलायचं नव्हते, म्हणून तो म्हणाला.
" निशांत, खरंच माझे तुझ्याकडेच खूप महत्त्वाचे काम आहे, त्यामुळे तू उद्या मला भेटशील काय ?" तिने विचारले.
" तू मला फोनवर तुझे काय काम असेल ते सांग. जर माझ्याकडून होत असेल, तर मी सांगेन; नाहीतर आपण इथेच आपले संभाषण थांबवू. मला तुला भेटण्यामध्ये काहीच रस नाहीये." तो म्हणाला.
" अरे असं काय करतोस ? मी तुझ्या कॉलेजमध्ये असणारी मुलगी आहे, एवढ्या वर्षांनी तू मला भेटला आहेस; पण खरंच माझ्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे उद्या नक्की भेट. मी तुला कुठे भेटायचे, त्याचा पत्ता उद्या सकाळी मेसेज करेल." तो पुढे काही बोलायच्या आधीच तिने फोन कट केला.
' आता हिला काय बोलायचे आहे ? उद्या मी तिला शेवटच भेटणार आणि त्याच्यानंतर मी तिला मला पुन्हा फोन करू नकोस असे सांगणार आहे.' असं मनात ठरवून रात्री तो झोपून गेला.
सकाळी तिने कुठे भेटायचे त्याचा मेसेज त्याला केला होता.
तो तिथे वेळेतच पोहोचला होता, परंतु ती अजून आली नव्हती आणि तिने आपली मस्करी केली; असे समजून रागात तो तिथून निघून जाणार तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज आला.
" अरे थांब निशांत, मी तुझ्यासाठीच आले आणि तू काय लगेच निघून जातोस. थोडसं ट्राफिक होतं म्हणूनच मला यायला उशीर झाला." चित्रा पळत आल्याने तिचे वाढलेले श्वास नियंत्रित करत म्हणाली.
" हा बोल, काय काम आहे तुझं?" त्याने सरळ मुद्द्याला हात घातला.
" मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. " चित्राने थेट सांगून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या.
" तू माझी मस्करी करतेस ना ? म्हणजे हे असं खूप वेळा माझ्यासोबत सगळ्यांनी केले आहे. जर हे असं असेल ना तर तू खूप वाईट करत आहेस. मी निघतो आणि इथून पुढे मला कधीच फोन करू नकोस." तो रागाने म्हणाला.
" तुला मी सर्वांसारखी वाटते का रे? माझे खरंच तुझ्यावर प्रेम आहे. " ती पुढे जाणाऱ्या त्याला मध्येच थांबवून म्हणाली.
" तुला माझ्याबद्दल माहीत नाही का ? " त्याने विचारले.
" मला तुझ्याबद्दल सर्व माहीत आहे आणि मला त्याने काहीच फरक पडत नाही. " ती त्याच्या डोळ्यांत डोळे घालून ठामपणे म्हणाली.
" माझ्यासोबत लग्न करणे, ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाहीये आणि म्हणूनच मी कधी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. " तो शांतपणे म्हणाला.
" निशांत, तुझ्या वडिलांनी आधी लग्न झालेले असताना सुद्धा तुझ्या आईला फसवून खोटे लग्न करून त्यांना गरोदर केले आणि सोडले. यात तुझा काहीच दोष नाहीये." ती त्याला म्हणाली.
" पाप, बिनबापाचा पोरगा आणि अनौरस, हेच मला बोलतात आणि त्यामुळे माझ्या आईने खूप काही सोसले आहे. म्हणूनच मला कधी लग्न करायचं नाही. " तो म्हणाला.
" पण मला याच्याने काहीच फरक पडत नाही, कारण मला माहीत आहे की, तू एक चांगली व्यक्ती आहेस तसेच तू एक चांगला मुलगा आहेस." ती त्याला समजावत म्हणाली.
" मला पहिल्यापासूनच सगळ्यांनी वाळीत टाकलेले आहे. आता जिथे मी काम करतो, तिथे माझ्याबद्दल माहीत नाही. लोकांना मी माझ्या नावापुढे माझ्या आईचे नाव का लावतो, हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता असते; पण मी त्याबद्दल जास्त काही बोलत नाही. आईवर माझे प्रेम आहे, हेच सर्वांना दिसून येतं, आणि खरंच माझ्या आईवर माझे खूप प्रेम आहे."
तो पुढे बोलू लागला, " जेव्हा तिला फसवले हे समजले, तेव्हा ती गरोदर होती. तिचे लग्न हे कायदेशीररित्या वैध नाही हे समजले.तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला होता. चित्रा तिने खूप काही सोसले आहे. उद्या जर कोणी तिला काही बोलले, तर मी ते सहन करू शकत नाही.
तसेच माझ्यासोबत नातं जोडताना तुला सुद्धा या गोष्टींचा सामना करावा लागेल, पण माझ्यामुळे तू दुखावली जाऊ नये; हाच माझा विचार आहे. त्यामुळे तू माझा नाद सोड आणि एका चांगल्या मुलाशी लग्न कर." तो कधी एवढे न बोलणारा तिला समजावत म्हणाला.
" मी लग्न करीन, तर तुझ्याशीच; नाहीतर कुणाशीच नाही. माझे कॉलेजमध्ये असल्यापासूनच तुझ्यावर प्रेम होते, परंतु मी तुला यासाठी नाही सांगितले नव्हते; कारण एक तर तुला त्यावेळी मी तुझ्यावर उपकार करते असे वाटले असते आणि तसेच मला माझे करिअर सुद्धा करायचे होते, परंतु जेव्हा मला तुझ्याबद्दल समजले, तेव्हा मी तुला शोधले आणि म्हणूनच मी त्या दिवशी तुला मुद्दामहून भेटले होते." चित्रा त्याला सर्व सांगत होती.
" मला हे सर्व विचार करण्यासाठी थोडा वेळ दे." असे म्हणून निशांत तिथून निघून गेला.
एका महिन्याने साध्या पद्धतीने कमी लोकांमध्येच निशांत आणि चित्राचे लग्न झाले. पूर्ण समाजाने ज्या मुलाला अनौरस म्हणून वाळीत टाकले होते, त्या मुलाला पती, म्हणून चित्राने स्वीकारले होते. तसेच तिने तिच्या घरच्यांना समजून सांगितलेलं आणि त्यांनी सुद्धा त्याची पारख केल्यावर चित्रा आणि निशांतच्या लग्नाला संमती दिलेली होती.
समाप्त.
© विद्या कुंभार
कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा