वैतागवाडीचे सासू संमेलन अंतीम भाग
नियोजित वेळेपेक्षा सासवांचं संमेलन फारच लांबलेलं होतं त्यामुळे वैतागलेल्या सासवा आणि करदावलेल्या अध्यक्षांच्या मनस्थितीवर दया येऊन निवेदीकीने संमेलनाच्या अध्यक्षा ज्यांच्या सुनेने अनेक कारनामे करून बिचारी सासुरवाशीण म्हणून सगळीकडे नावलौकिक मिळाला होता त्यांना दोन शब्द बोलण्यासाठी मंचावर पाचारण केले.
“माझ्या समदुखी मैत्रिणींनो आपण फार हौसेने घरात सून नावाचा टाईम बॉम्ब घेऊन आलो आहोत हे एव्हाना तुम्हाला कळुन चुकलं असेलच. तुम्ही सगळ्यांनी आपापली दुःख मांडून मन हलकं केलं परंतु माझं दुःख आणि सुनेने केलेला सुनवास ऐकाल तर तुम्ही दुःखाच्या अथांग महासागरात बुडून जाल. पण तरीही मी तुम्हाला माझी राम कहानी सांगणार आहे.
माझ्या मुलाचं नवीनच लग्न झालं होतं. खजुराची चटणी करायची म्हणून मी सुनेला म्हटलं की सुनबाई जरा खजुरातल्या बिया काढून दे. तब्बल अर्धा तासाने सुनेने वाटीत खरंच खजुराच्या केवळ बिया माझ्यासमोर धरल्या. खजूर कुठे आहेत विचारलं तर तिने चक्क ढेकर देऊन म्हटलं, ‘माझ्या पोटात.’ त्यावेळी असं वाटलं की धरती इथेच दुभंगून मी त्यामध्ये जिवंत समाधी घ्यावी. त्यानंतर सुनबाईला काम सांगताना मी फार दक्षता घेत होते.
एकदा दुपारी माझा जरा डोळा लागला तर सुनबाईने चहाच्या भांड्यात, पाणी, चहा पावडर, साखर, दूध, सगळं टाकून ठेवलं. अगदी गॅसही सुरू केला पण पेटवला मात्र नाही. घरभर सगळीकडे गॅसचा वास पसरल्याने मी खडबडून जागी झाले, तर म्हणते कशी सासूबाई चहाचं प्रीमिक्स मी करून ठेवलं आहे. तेवढा गॅस पेटवून द्या. मी तीला म्हटलं, गॅस काय पेटवू? तू आता आम्हाला फक्त पेटवायचं बाकी ठेवलयस.”
अशी बहाद्दर सून घरात असताना माझी तर रात्रीची झोप आणि दिवसाची शांती हरवली आहे. मनःशांती आणि स्व नियंत्रणासाठी मला मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली.
एकदा कुठलासा जुना हिंदी सिनेमा बघून सुनबाईला काय लहर फिरली कुणास ठाऊक तिने मुलाच्या शर्टाची सगळी बटन कैचीने कचाकचा कापून काढली. दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या घाईत त्याने सुनबाईला बटन लावायला सांगितले तर तिने चक्क त्याच्या अंगातल्या शर्टावर बटना सकट त्याचा गंजीफ्रॉकही शिवून टाकला.
मागल्या वर्षीच्या दिवाळीत तर तिने कमालच केली. पूजेचे सामान आणायला म्हणून मी जरा बाजारात गेले तर तेवढ्या वेळात आमच्या सुनबाईंनी अर्धा किलो डिटर्जंट पाण्यात मिसळून अंगणात सडा शिंपला. हेही नसे थोडके म्हणून घरातही तीच तऱ्हा. घरी आल्यावर साबणाच्या पाण्यावरून पाय घसरल्यावर मी म्हटलं ‘सुनबाई हे साबणाचे पाणी का पूसलं नाही?’ तर म्हणते कशी, ‘काय सासुबाई टीव्हीवर एवढी जाहिरात करतात ना की कपडे स्वच्छ धुवायचे असतील तर निदान अर्धा तास तरी डिटर्जंटच्या पाण्यात बुडवून ठेवा. आपलं अंगण आणि घर तर किती खराब झालं आहे, निदान सहा ते आठ तास तरी ते डिटर्जंटच्या पाण्यात नाही का भिजून ठेवावं लागणार?” सांगा आता माझ्यासारख्या बापूडीने कुणाच्या तोंडाकडे बघावं आणि कुठे दाद मागावी?”
एकदा संध्याकाळी कीर्तनाला म्हणून मी देवळात गेले. दुपारी घरात मसाले भाताच्या गप्पा सुरू होत्या. सुनबाईला तर मी घरात नसली की आयतच कोलीत मिळतं. आम्ही घरात सहा माणसं. माझ्या सासूबाई, मी, माझे अहो, मोठा मुलगा, सासुरवाशी म्हणून सगळीकडे डांगोरा पीटणारी माझी महागुणी सुनबाई आणि लहान मुलगा.
“मी घरात नाही असं पाहून सुनबाई ने प्रत्येकाच्या नावाचे दोन, दोन मोठे पेले तांदूळ धुतले. बारा ग्लास तांदूळ धुवून तिचं मन भरलं नाही तर त्यात तिने अर्धा किलो फुलकोबी आणि एक किलो बटाटे घातले आणि सात किलो तेलात मसाले भात बनवला. त्यादिवशी मला अख्या कॉलनीला महाप्रसाद म्हणून तो मसालेभात वाटावा लागला. मसाले भात खाता खाता कॉलनीतले लोक म्हणत होते, या कंजूस सासुबाई इतक्या उदार आणि दीलदार कधीपासून झाल्या? कधी कुणाला फुटका रुपया न देणाऱ्या या सासूने आज चक्क कॉलनीला मसाले भाताचे जेवण दिल? कमालच आहे!”
“घरात अशी सून असल्यानंतर बाहेरच्या शत्रूंची गरजच काय?” सासुरवाशीणीची सासू दर्द भऱ्या आवाजात स्वतःची कैफियत सांगत होती.
“आमची सुनबाई अशी आहे की ती कधी तुमच्या हातावर वाटाण्याच्या अक्षदा वाटेल त्याचा काही नेम नाही. म्हणून मी तिला सक्त ताकीद दिली आहे, की तिने अजिबात स्वयंपाक घरात पाऊल ठेवायचं नाही. तर ती आता सगळीकडे सांगत फिरते आणि समाज माध्यमांवर माझी बदनामी करते, की “माझी सासू मला स्वयंपाक करू देत नाही आणि सगळ्यांची सहानुभूती मिळवते.”
प्रत्यक्ष अध्यक्ष बाईंची सून इतकी कारनामे करणारी आहे हे ऐकून बाकीच्या सासवांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मितहास्य फुललं आणि आपल्या सुना हिच्या सुनेपेक्षा किती चांगल्या असं मनात विचार करून, अध्यक्षांची परवानगी न घेता, शेवटच्या आभार प्रदर्शनाकडे साफ दुर्लक्ष करून, सगळ्या सून पीडित सासवांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला.
प्रत्यक्ष अध्यक्ष बाईंची सून इतकी कारनामे करणारी आहे हे ऐकून बाकीच्या सासवांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मितहास्य फुललं आणि आपल्या सुना हिच्या सुनेपेक्षा किती चांगल्या असं मनात विचार करून, अध्यक्षांची परवानगी न घेता, शेवटच्या आभार प्रदर्शनाकडे साफ दुर्लक्ष करून, सगळ्या सून पीडित सासवांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला.
©® राखी भावसार भांडेकर नागपूर.
सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून त्याचा वास्तवात कुणाशी कुठलाही संबंध नाही. तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.
सदर लिखाणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव असून कुणीही त्याचा वापर केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.