वैतागवाडीचे सासू संमेलन भाग सहा

सुने बद्दल सासूचे मत
भाग सहा


बोलू की नको, उठू की नको या संभ्रमावस्थेतच मेधाची सासू मंचापर्यंत जाऊन पोहोचली. आता ही आणखी काय सांगणार? म्हणून अनेकींना उत्सुकता होती तर अनेकींनी अगदी बेपर्वाईचा कटाक्ष मेधाच्या सासूकडे टाकला. पण कोणाच्या कुठल्याही प्रतिक्रियेला मेधाची सासु भीक घालणार्‍यांपैकी अजिबात नव्हती. तरीही एक अवघडलेपणा तिच्या हालचालींमध्ये जाणवत होता. शेवटी मनाचा हिय्या करून मेधाची सासू बोलू लागली.

“मैत्रिणींनो मला आज, आत्ता, इथे, या क्षणी, यावेळी, या मंचासमोर तुम्हा सर्वांसमक्ष काय बोलावे आणि काय बोलू नये हे समजत नाही आहे. माझ्या मनाचा पुरता गोंधळ उडालेला आहे.”

“मग कशाला उगाच गळ्याच्या नसा ताणून, घशाला कोरड पाडते आहेस? बस गप गुमान जागेवर.”अस्मिताची सासू. “ हिला सुनेच्या नावाने शिमगा करायचा आहे, पण आव असा आणते आहे, की ताकाला जायचं आणि भांड लपवायचं.”

“काय बोलायचं ते कळत नाही, तर मंचावर गेलीच कशाला ही.” अनुची सासू.

“नाहीतर काय? सुनेच्या नावाने गळे नाही काढायचे तर मग करायचाय काय तो सासूचा जन्म? अशी सासू मी तर पहिल्यांदाच बघते आहे, जीला सुनेच्या कगाळ्या करताच येत नाही. हिचा तर सासू होण्याच्या अधिकारच नाहीये.” श्रावणीची सासू.

“अगदी बरोबर बोललीस, सासूला कसं घालून, पाडून, टोमणे मारून, अगदी फाडफाड बोलता यायलाच हवं; नाहीतर स्त्री जन्माला येऊन आणि सासू होऊन जीवनाचं सार्थक केलं नाही तर उपयोग काय त्या सासु होण्याचा?”खुशीची सासू.

“पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की, आपण केलेल्या पापांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी वारंवार मनुष्य जन्म घ्यावा लागतो, पण आत्ताच्या फाईव्ह जी आणि बुलेट ट्रेन, मेट्रोच्या जमान्यात याच जन्मात सगळ्या पापांची शिक्षा भोगावी लागते आणि ती शिक्षा द्यायला यमराज सून नावाच्या दुताला पाठवतात.” मेधाच्या सासूने मनातली बोच सांगायला सुरुवात केली.

“मुलं आपल्या आई-वडिलांसारखी दिसतात किंवा त्यांच्या वळणावर तरी जातात, पण इथे माझी सूनच थेट माझ्या वळणावर गेली आहे, प्रत्येक क्षणी, दर दिवशी ती मला माझ्या भूतकाळाची आठवण करून देते.”

“म्हातारीनं लईच पापं केली वाटतं.” अर्चनाची सासू.

“लग्न झाल्याच्या तिसऱ्या, चौथ्या दिवशी सुनबाईच्या हातात चुडा नव्हता, तर मी सुनबाईला म्हटलं ‘अगं भरल्या घरात असं रिकाम्या हाताने राहू नये.’ तर ती मला म्हणते कशी, ‘सासुबाई, मी मोबाईल चार्जिंगला लावला आहे. रात्रभर ओ.टी.टी.वर वेब सिरीज बघत होते ना! चार्जिंग फुल झालं, की परत बसते एका कोपऱ्यात मोबाईल घेऊन.’

“लईच जबरी दिसते हिची सून.” अर्चनाची सासू.

“मी पण लग्न झाल्यावर कपबशा धुण्याच्या नादात असाच स्वतःचा चुडा वाढवला होता.” मेधाची सासू.

“ढवळ्या सोबत पवळ्या बसला वाण नाही पण गुण लागला.” सायलीची सासू.

“त्यावेळी घरी काही स्नेही आले होते. चहापाणी झाल्यावर केवळ दिखावा म्हणून मी कपबशा विसळण्यासाठी आत गेले, तर आजे सासूबाई जपाची माळ घेऊन बसल्या होत्या, मला स्वयंपाक घरात कपबशा विसळताना बघून म्हणाल्या, ‘सुनबाई जरा हळू बरं का! नाहीतर कराल एकाच्या दहा कपबशा.’ मला वाटलं असेल बाई आपल्या सासरी नव्या नवरी कडून कपबशा वाढवण्याची काही रीत मग कपबशा वाढवता वाढवता माझा चूडा ही वाढला.”

“फारच गुणाची आहेस ग, तू अन् तुझी सून.” ऋतुजाची सासू.

“दुसरा किस्साही अगदी सांगण्यासारखा आहे बर का! लग्नाला दोन-तीन महिने झाले तरी आमच्या सुनबाई स्वयंपाकाचे नाव घ्यायला तयार नव्हत्या. एकदा मी शिरा करत होती, तेवढ्यात ती स्वयंपाक घरात आली. मी सुनबाईला म्हटलं ‘वेळ आहे अजून शिरा व्हायला.’ तर ती म्हणते कशी, ‘मला भूक नाही लागली, पण नेट पॅक संपला ना! म्हणून जरा टाइमपास करायला स्वयंपाक घरात डोकावून पाहायला आले आहे.’

“त्यावेळी तिने मला माझीच आठवण करून दिली, लग्नानंतर सुरुवातीला मलाही स्वयंपाक करता येईना, म्हणून मग मी वर्तमानपत्र किंवा टीव्हीवर सास-बहू मालिका बघत बसे.” मेधाच्या सासूने स्वतःची एक जुनी आठवण सांगितली.


“भले शाब्बास! चांगलं करत होतीस. भोग आता कर्माची फळं.” अनुची सासू.

“हळूहळू सरावाने, सासूची बोलणी खाऊन, मी स्वयंपाक करायला शिकले. पण न जाणो कसा काय कुकर खराब झाला. मला अजूनही आठवतं नवीन कुकर विकत घेताना मी दुकानदाराला म्हटलं, ‘भाऊ शिट्ट्यांबरोबर आकडेही सांगेल असा कुकर द्या, टीव्हीच्या नादात लक्षातच राहत नाही किती शिट्या झाल्या ते!’ पण माझी सून माझ्यापेक्षा चार पावलं पुढेच आहे. ती आता घरातल्या अलेक्साला सांगते, ‘अलेक्सा कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या त्यावर लक्ष ठेव बाई.’

“याला म्हणतात, सासू शेर तर सून सव्वाशेर.” अस्मिताची सासू.

“संगत का असर, दुसरं काय?” सायलीची सासू.

“ठकास महाठक, गाठ पडली ठकाठकी.” खुशीची सासू.

“माझी सून म्हणजे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास, नाचता येईना अंगण वाकडे स्वयंपाक येईना ओली लाकडे, एकादशीच्या भेटीला महाशिवरात्र, घरचं झालं थोडं आणि जावयाने धाडलं घोडं, नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा, नाव मोठं लक्षण खोटं, दुष्काळात तेरावा महिना, नाव कमळ जा घरात सगळा किरपुंजा, बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात.” मेधाच्या सासूचे हे बोलणे ऐकून तृप्तीच्या सासूला प्रश्न पडला, की ही बया कोणतं स्तोत्र, श्लोक, अभंग, ओवी किंवा भजन म्हणते आहे.

“ही मेधाची सासू काय मराठीची प्राध्यापिका आहे का ग?.” श्रावणीची सासू खुशीच्या सासूच्या कानात कुजबुजली.

“ही नाही, हिची सून शिक्षिका आहे. कोणत्या विषयाची ते मात्र मला माहित नाही.” खुशीच्या सासूने माहिती पुरवली.

“दिवाळीच्या साफसफाईसाठी मी सुनेला विचारलं, म्हटलं कसं करायचं साफसफाईचं?” मेधाच्या सासूने आणखी एक किस्सा सांगायला सुरुवात केली.

“मला एक कळत नाही, ही साफसफाई, पसारा आवरा-आवरी, दिवाळीचा फराळ कुठल्या रिकामटेकड्या बाईच्या डोक्यातली फालतू कल्पना असावी बरं?” मेधाने तिच्या मनात काय आहे ते सासूला बोलून दाखवले.

“मला ती बाई भेटली की आधी तुझी गाठभेट घालून देईन बर का! पण आता साफसफाईचं तेवढं मनावर घे.” मेधाच्या सासूने चिकाटी सोडली नव्हती, ‘साफसफाई तर दूरच राहिली, सुनबाई नवऱ्या सोबत (म्हणजे माझ्या मुलाबरोबर अंताक्षरी खेळायला लागली.)


पुढल्या भागात बघू मेधा आणि तिचा नवरा कोणती अंताक्षरी खेळतात, दिवाळीच्या आधी मेधाच्या घरची साफसफाई होते की आणखी काही….. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

©® राखी भावसार भांडेकर नागपूर.

सदर लिखाण हे संपूर्णतः काल्पनिक असून वास्तवात त्याचा कोणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळून आल्यास निव्वळ योगायोग समजावा.


🎭 Series Post

View all