Login

शापित वाडा भाग -३

शापित वाडा
भाग -३

दुसऱ्या रात्रीच्या घटनेनंतर रमेश पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. सकाळी उठल्यावर तो गावकऱ्यांशी बोलून आपलं मन शांत करायचा प्रयत्न करत होता. पण गावकरी मात्र सरळ नजरेला भिडायला तयार नव्हते. कुणाच्याच चेहऱ्यावर साधं भाव नव्हतं जणू काहीतरी लपवतात आहेत.

“तो वाडा कधीच रिकामा नाही”एखाद्या वृद्धाने कुजबुजल्यासारखं म्हटलं आणि बाकी सगळे एकदम गप्प बसले.

रमेशच्या आत हट्ट जागा झाला.“भूत-प्रेत काही नसतं मी सिद्ध करून दाखवणार,” असं ठरवून तो परत वाड्याकडे निघाला.

त्या रात्री हवेत विचित्र गारवा होता. खिडक्यांच्या भगदाडातून आत येणारा वारा घरभर फिरत होता. जरी रमेशने सगळे दिवे लावले तरी अंधाराची एक जाडसर चादर कोपऱ्यांना घट्ट चिकटून बसली होती.

रमेश पुस्तक वाचायचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक पानावर नजरा थबकायच्या आणि मन कुठेतरी दुसरीकडे धावायचं.

अचानक त्याच्या डोळ्यात भिंतीवरचं काहीतरी आलं.
टॉर्चच्या उजेडात सावल्या हलताना दिसल्या.

पहिल्यांदा वाटलं आपल्याच हातांच्या असतील. पण नीट बघितलं तर त्या सावल्या त्याच्या हालचालींशी मुळीच जुळत नव्हत्या.

एका सावलीने हळूच हात वर केला. रमेशने मात्र हात हलवला नव्हता. दुसरी सावली भिंतीवरून सरकत सरकत त्याच्याकडेच वळली.

हृदय वेड्यासारखं धडधडायला लागलं. घसा कोरडा पडला.
“कोण आहे?” तो थरथरत म्हणाला.

पुढच्याच क्षणी त्याच्या कानात कुजबुज घुमली“हे घर सोड नाहीतर तू आमचा होशील”

रमेश उभा राहिला. त्याचा श्वास अडकला होता. पाय आपोआप मागे जाऊ लागले.

अचानक वरच्या मजल्यावर धावल्यासारखा आवाज झाला टकटकटकटक!
तो घाईघाईने जिन्याकडे धावला. पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त पायऱ्या रिकाम्या आणि धुळीतल्या जुन्या खुणा.

भिंतीवरच्या सावल्या मात्र अजूनही जिवंत होत्या. त्या एकमेकींमध्ये मिसळत, लांब होत, भिंतीवरून सरकत त्याच्याकडे येत होत्या जणू त्याला गिळायला येतायत.

घाबरून रमेश परत आपल्या खोलीत शिरला. दार घट्ट बंद करून त्यामागे खुर्ची लावली. घामाने कपडे चिंब झाले होते.

त्याच्या टेबलावर ठेवलेली वही अचानक स्वतःच उघडली.
पेन आपोआप हललं आणि त्यावर अक्षर उमटलं

“मी इथेच आहे.”

रमेश थिजून गेला. त्याच्या डोळ्यांसमोर पेन चालत होतं. हात आपोआप थरथर कापू लागले.

त्याने वही उचलली. पण त्या पानावर अक्षरं लालसर झिरपत होती जणू रक्ताने कोरलेली.
“हे स्वप्न नाही हे खरोखरच घडतंय काहीतरी या वाड्यात आहे आणि ते आता माझ्या अगदी जवळ आलंय”

त्याच्या कपाळावर थंड घाम गळत होता. बाहेर वाऱ्याचा आवाज अधिक जोरात घुमू लागला.
आणि त्या अंधाऱ्या वाड्यात रमेश एकटा होता पण खरी भीती ही होती की तो एकटा नव्हताच.


कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all