Login

शापित वाडा भाग -४

शापित वाडा
भाग -४

रमेशची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली होती. चेहरा कोमेजला होता, डोळ्याखालील काळी वर्तुळे आणखी गडद होत होती. सलग तीन दिवस झोप त्याला जवळपास चुकलीच होती. डोळे मिटले की समोर फक्त आरशातलं ते लाल डोळ्यांचं, विक्षिप्त हसणारं रूप उभं राहायचं. त्याचा आवाज नसला तरी त्याच्या हास्यात रक्त गोठवणारी भीती होती.

वाड्यातील वातावरण दिवसेंदिवस जड होत गेलं. भिंती जणू थंड श्वास घेत आहेत, छतावर कोणीतरी अदृश्य माणूस टकटक करतोय, आणि दारांच्या फटीतून झिरपणारा अंधार अंगावर कोसळतोय असं त्याला जाणवत होतं.

सकाळी तो धडपडत गावाच्य वेशिजवळ गेला. चेहऱ्यावरची भीती लपवण्याचा प्रयत्न करत असला तरी त्याच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती. गावच्या चौकात एक पांढऱ्या केसांचा वृद्ध, हातात माळ घेऊन शांतपणे बसला होता. त्याच्याजवळ रमेश जाऊन थरथरत आवाजात म्हणाला,

“काका… खरं काय आहे या घराबद्दल? लोक फक्त दंतकथा सांगतात की काहीतरी खरंच दडलेलं आहे?”

वृद्धाने नजर वर केली. त्या डोळ्यांत अनुभवाचा, पण त्याचवेळी जखमा सहन केलेल्यांचा गहिरा थर होता.

“रमेश… तुझ्या वडिलांची पापं या गावाला विसरता येणं शक्य नाही. जमिनीचे वाद, पैशाचा लोभ… त्यांनी कित्येकांच्या संसारावर पाणी फिरवलं. अन्यायाच्या किंकाळ्या त्या वाड्याच्या भिंतींमध्ये आजही अडकून आहेत. म्हणून म्हणतात तो वाडा शापित आहे.”

रमेशचा घसा कोरडा पडला.
“काय म्हणता तुम्ही? माझे बाबा? त्यांनी कधी सांगितलं नाही.पण मी या सर्वाचा दोषी नाही, मग मी का भोगतोय हे?”

वृद्धाने खोल आवाजात उत्तर दिलं,
“रक्ताच्या नात्याला सावली चिकटलेली असते. पापाचा ठसा वारशासारखा पुढे येतो. तुला सुटायचं असेल तर त्यांना शांती देणं हाच मार्ग आहे.”

त्या रात्री रमेशने दिवे विझवले. वाड्यात अंधाराचं साम्राज्य पसरलं. भीतीच्या थरथरीवर मात करत तो पुटपुटला,
“कोण आहेस तू? माझ्याकडून तुला काय हवं आहे?”

क्षणात थंड वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली. आरशातलं ते वेडसर रूप पुन्हा दिसू लागलं. पण या वेळेस ओठ हलले.

“तू दोषी नाहीस… पण तुझ्या बापने आम्हाला छळलं. आमचं आयुष्य हिरावून घेतलं. आमच्या वेदना या भिंतींमध्ये कैद आहेत. आता तू इथे आलास, तर तुला हे ओझं उचलावं लागेल.”

रमेशच्या कपाळावर घाम फुटला.
“मी काय करू? मला मार्ग दाखव!”

प्रतिबिंब धूसर होऊ लागलं. पण शेवटचे शब्द मात्र स्पष्ट होते
“शांती… फक्त शांती दे… नाहीतर तूही आमच्यातलाच होशील.”

त्या रात्री रमेशने डोळे मिटले तरी झोप आली नाही. डोळ्यांपुढे आत्म्यांच्या किंकाळ्या, लाल डोळ्यांचं विक्षिप्त हास्य आणि भिंतींवर उमटणारे रक्ताचे शब्द नाचत राहिले.

आता त्याला ठाम समजलं होतं तो फक्त वाड्यात झपाटलेला नव्हता तर त्याचं स्वतःचं अस्तित्वच अंधाराच्या खाईत ओढलं जात होतं.


कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all