Login

शापित वाडा भाग -५

शापित वाडा
भाग -५

रमेशच्या डोळ्यांत झोप नव्हती, पण मनातला निर्धार मात्र कुठल्याही थकव्यापेक्षा जास्त प्रखर होता. वाड्याच्या शापापासून पळून जाणं हा उपाय नव्हता तो संपवणं गरजेचं होतं. आत्म्यांना शांती मिळाली नाही, तर ही रक्ताची सावली त्याच्या घरावर कायमची राहणार होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी, थकलेला पण धडधडत्या छातीनं तो गावाबाहेरच्या प्राचीन मंदीरात पोहोचला. अंगणात ओल्या मातीतून आलेला धूपाचा वास आणि घंटानाद एक वेगळाच गूढपणा निर्माण करत होता. पायरी चढताच त्याच्या अंगावर काटा आला. मंद प्रकाशात, आतल्या बाजूला पांढऱ्या केसांचा एक वृद्ध पुजारी शांतपणे बसलेला होता.

रमेशने थरथरत हात जोडले. “माझ्या वाड्यात काहीतरी आहे आरशातून दिसलेलं रूप, आत्म्यांचे शब्द, आणि… शाप.”

वृद्ध पुजारी क्षणभर डोळे मिटून ऐकत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नव्हती, पण गंभीरतेचा एक खोल पटला होता. मग त्यांनी दमदार पण शांत आवाजात उत्तर दिलं,
“अन्यायाने गेलेल्या आत्म्यांना शांती हवी असते. तुझ्या घरातल्या पापाची आग अजूनही त्यांच्या आत्म्यात पेटलेली आहे. त्यांना थांबवायचं असेल तर फक्त धैर्य नाही, प्रायश्चित्त घ्यावं लागेल. विधी अपूर्ण राहिला आहे तुला तो पूर्ण करावा लागेल. पण लक्षात ठेव, रात्री ते अधिक सामर्थ्यवान असतात. तयार आहेस का या लढाईसाठी?”

रमेशच्या ओठांवर थरथर होती, पण डोळ्यांत जबाबदारीचं वजन जास्त होतं.
“हो… तयार आहे,” त्यानं ओठ घट्ट करत उत्तर दिलं.

त्या रात्री वाड्यात एक वेगळंच वातावरण होतं. जुन्या दगडी हॉलमध्ये मंद दिवे लावलेले, मधोमध तांब्याचा कलश ठेवलेला, बाजूला धूपाचा घनदाट धूर हवेत फिरत होता. पुजारी मंत्रोच्चार सुरू करत होते, शब्दांच्या लहरींनी हवा जड झाली होती. अग्निकुंडात उठलेली ज्वाळा सावल्यांना जीवंत करून सोडत होती.

रमेश हात जोडून डोळे मिटून बसला होता. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब चमकत होते.

अचानक जोराचा वारा सुटला. दिव्यांच्या ज्योती थरथरू लागल्या , सावल्या भिंतींवर नाचू लागल्या. आणि मग आरशातून ते लाल डोळ्यांचं भयानक रूप पुन्हा समोर आलं. त्याचा आवाज किंकाळीसारखा घुमला,
“शांती? आम्हाला शांती हवी आहे? तुझ्या बापानं आम्हाला जाळलं आमची किंकाळी ऐकली नाही आमचे बोलणे ऐकले नाही आता तू आमच्यासाठी काय करणार?”

रमेशचा श्वास थांबला. अंग थरथरत होतं, पण त्याने पळून जाण्याऐवजी हात जोडले आणि ठाम आवाजात म्हणाला,
“मी दोषी नाही पण माझ्या बाबांचं पाप माझ्यावर आलंय. तुमचं दुःख संपलं पाहिजे. म्हणूनच हा विधी मी करतोय. तुमच्या आत्म्यांना शांती मिळाली पाहिजे.”

त्याचा आवाज थरथरला, पण डोळ्यांत एक विचित्र तेज पेटलं होतं. पुजारींच्या मंत्रोच्चारांनी हवा दणाणून गेली होती, आणि अग्निकुंडाच्या ज्वाळांमध्ये लाल डोळ्यांचं रूप अजून तीव्र होतं.

क्षणभर वातावरण थिजल्यासारखं झालं होतं. अंगावर काटा आणणारी शांतता. जणू काळच थांबला होता. आणि अचानक वाड्याच्या काळोख्या भिंतींवर आपटलेल्या सावल्या किंकाळ्यांनी फाडून टाकल्या. कानठळ्या बसवणारे आवाज हवेत मिसळले. रात्रचं भयकंपित हृदय घेऊन थरथर कापू लागली.

अगदी त्या क्षणी, वाड्याच्या मध्यभागी पेटवलेल्या अग्निकुंडाचा ज्वालामुखी जणू जीवंत झाला. त्याचे ज्वाळांचे तांडव वाऱ्याशी भिडले आणि भिंतींवरून सावल्या वादळासारख्या नाचू लागल्या. भिंती थरथरू लागल्या, छत गडगडायला लागलं.

त्या किंकाळ्या हळूहळू मंदावल्या. सावल्या जणू विझत गेल्या. ज्वाला शांत झाल्या.

थकलेला, दमलेला रमेश कोसळला. जमिनीवर बसलेल्या त्याच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते. डोळ्यांत अजूनही भीतीच्या लाटा उसळत होत्या, पण श्वास शांत होत चालला होता.

पहाटेचा पहिला किरण वाड्याच्या तुटक्या खिडकीतून आत शिरला. त्या किरणासोबत संपूर्ण वाडा बदलून गेला.

भिंतींवरची टकटक गायब झाली होती.
आरशातलं भयानक रूप विरून गेलं होतं.
आणि हवेतली थंडगार भीती कुठेतरी हरवून गेली होती.

आता तिथे फक्त एक दाट निःशब्द शांती होती.

रमेशच्या मनाला जाणवलं त्या आत्म्यांना अखेर मुक्ती मिळाली होती. त्यांच्या किंकाळ्या शांत झाल्या होत्या.

पण एक ठसा कायमचा त्याच्या हृदयावर उमटून राहिला होता आपल्या रक्ताच्या सावल्या आपण कितीही पळालो तरी शेवटी आपल्याला गाठतातच.

समाप्त

कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

-जान्हवी साळवे.
0

🎭 Series Post

View all