Login

श्वासातून... श्वासापर्यंत भाग:३

पती पत्नीच्या भावनिक संघर्षाची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - श्वासातून... श्वासापर्यंत
भाग: ३

"काय? आतड्याला अल्सर?" रोहनला धक्काच बसला.

"हो आणि या अवस्थेत ते खूपच धोकादायक आहे. म्हणजे आपण त्यावर हवा तसा उपचार पण करू शकत नाही. औषधाची मात्रा खूपच कमी प्रमाणात द्यावी लागेल, नाहीतर पोटातल्या बाळावर त्याचा परिणाम होऊ शकतो."

"पण सगळे ठीक होणार ना, डॉक्टर?"

"ते मी सध्या काहीच सांगू शकत नाही. आता आपण औषधांची ट्रीटमेंट सुरू करू. त्याने रिकव्हरी झाली तर उत्तमच. नाहीतर ऑपरेशन करावे लागेल. पण ते सुद्धा प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या तिमाहीनंतरच शक्य आहे. कारण आत्ताच ऑपरेशन करणे बाळासाठी धोक्याचे आहे."

हॉस्पिटलमधून घरी येताना दोघंही एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत.

गेले तीन महिने रोहन आणि मानसी खूपच खुशीत होती, पण डॉक्टरकडून अल्सरची बातमी ऐकल्यापासून त्यांचा आनंद कुठेतरी पळाला होता. दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.

सहा वर्षांनी त्यांना जो आनंद लाभला होता, त्यावर आता विरजण पडले होते.

" देवालाही आपलं सुख बघवत नाही." मानसीने चिरणारी शांतता भंग केली. तिचे डोळे ओले झाले होते.

"मानसी, सगळे ठीक होणार. काहीच काळजी करू नकोस."

"आधी मूल होत नाही म्हणून तणावात होतो, आणि आता मूल होणार याचे सुख अनुभवत असताना मध्येच हा प्रॉब्लेम... आपण कोणाचे काय वाईट केले होते रे, म्हणून आपल्याला हे दिवस बघावे लागत आहेत?"

रोहन तसाच उठून स्वयंपाकघरात काम करायला गेला. त्याला असे वाटत होते की, मानसीला मिठीत घेऊन खूप खूप रडावे. पण त्याने आपले मन घट्ट केले, कारण त्याचे कणखर राहणे जास्त गरजेचे होते. म्हणून त्याने आपले अश्रू डोळ्यातच घट्ट अडवून ठेवले.

असेच दिवस जात राहिले आणि हा हा म्हणता सहा महिने उलटले, पण मानसीच्या पोटातला अल्सर बरा होण्याऐवजी अधिकच वाढत चालला होता. तिला अधूनमधून भयंकर अशा वेदना होत होत्या. पण डॉक्टर काहीच करू शकत नव्हते, कारण एखाद्या औषधाचा चुकीची मात्रा बाळाच्या जीवावर बेतू शकत होती.

आता पर्याय एकच होता, ऑपरेशन. पण आतल्या बाळाची योग्य वाढ झाल्याशिवाय ऑपरेशन पण करणे शक्य नव्हते.

अशाच परिस्थितीत मानसीला सातवा महिना लागला. अल्सरमधून रक्तस्त्राव होऊ लागला होता. परिस्थिती गंभीर बनल्याने डॉक्टरांनीही ऑपरेशनची तारीख ठरवली.

-------------------

हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी रोहनने मानसीसाठी गोड गोड खाद्यपदार्थ बनवले. तिला दागिन्यांनी सजवले, तिला नवीन साडी नेसवली. आपल्याच ऑफिसमधल्या एका विश्वासू अशा वृद्ध बाईला बोलावून त्याने मानसीची ओटी भरली.

हॉस्पिटलमध्ये जात असताना मानसीने रोहनकडे बघितले.

"हे सगळे का केलेस तू, रोहन?"

" कारण हा तुझा पहिलाच सातवा महिना आहे. सातव्या महिन्यात ओटी भरायची असते आणि डोहाळे जेवण पण करायचे असते."

"मला माहित आहे, तुझ्या मनात भीती आहे ना… की मी जिवंत परत येईल की नाही?" मानसी हलकेच हसत म्हणाली.

"काहीही अभद्र बोलू नकोस. येताना तू एकटी नाही, बाळालाही घेऊन येणार आहेस. खात्री आहे मला."

" माहित आहे तू खूप 'स्ट्राँग' आहेस, पण मी नाही रे."

काही वेळाने दोघंही हॉस्पिटलमध्ये पोहोचली. डॉक्टरांनी लगेच मानसीला ऍडमिट करून घेतले.

"रोहन, उद्याच ऑपरेशन करावे लागेल. पण मी स्पष्ट सांगतो, बाळ वाचेल याची गॅरंटी मला देता येणार नाही. ऑपरेशन केले नाही तर मानसीच्या जीवाला धोका आहे आणि केले तर बाळाच्या जीवाला. तुझा निर्णय काय आहे?"

रोहनला काय बोलावे तेच कळत नव्हते.

"डॉक्टर... तुम्ही ऑपरेशन करा." असे म्हणत डोळ्यात दाट भरलेले अश्रू कोणालाही दिसू नयेत म्हणून रोहनने आपला चेहरा फिरवला.