Login

श्वासातून... श्वासापर्यंत भाग:४ ( अंतिम भाग)

पती पत्नीच्या भावनिक संघर्षाची कथा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक - श्वासातून... श्वासापर्यंत
भाग: ४

खरे म्हणजे धोका फक्त बाळाच्याच नव्हे तर मानसीच्या जीवालाही होता. कारण आतड्याच्या अल्सरने आता खूपच गंभीर रुप धारण केले होते. शस्त्रक्रिये दरम्यान रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकत होता आणि गर्भवती स्त्रीला तर हा धोका जरा जास्तच होता.

ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधी मानसीने रोहनचा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. रोहन तिच्या भावना समजू शकत होता, तरीही त्याने स्वतःचे मन कठोर करुन ठेवले.

"रोहन, स्वतःची काळजी घे. आपली परत भेट आता देवाच्या हातात आहे. त्याची इच्छा असेल तर नक्कीच पुन्हा भेटू."

"प्लीज, असे बोलू नकोस ना. तुला किती वेळा सांगितले आहे, मला असे बोललेले आवडत नाही."

" हो मला माहित आहे, माझा रोहन खुप 'स्टाँग' आहे." तिने तोंडावर हास्य आणण्याचा प्रयत्न करत म्हटले.

रोहनने नेहमीप्रमाणे पुन्हा आपले अश्रू रोखून धरले.

ऑपरेशन सुरू झाले. थिएटरचा लाल दिवा पेटला.
रोहनची धडधड खूपच वाढली होती. तिथे त्याला आधार द्यायला कोणी नव्हते. त्यामुळे तो स्वतःच आपल्या मनाला धीर देत होता.

ऑपरेशन थिएटरमधून नर्सचे आतबाहेर येणे-जाणे सुरू होते. त्यांची धावपळ पाहून रोहनच्या मनात अधिकच धडकी भरत होती.

'काय झाले असेल आत? मानसी सुखरूप असेल ना? बाळ कसे असेल?

जवळ जवळ तीन तास उलटले. तो विचारांच्या गर्तेत हरवला होता. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले.

"रोहन..." डॉक्टरांनी हाक मारली.

डॉक्टरांची हाक ऐकताच रोहन धावत धावत डॉक्टरांकडे गेला.

"काय डॉक्टर? ऑपरेशन व्यवस्थित झाले ना?"

"हो, ऑपरेशन तर व्यवस्थित झाले आहे, पण अजूनही काहीच खात्री देता येत नाही. पुढचे ४८ तास खूपच महत्त्वाचे आहेत."

"आणि बाळ?" रोहनने जरा अडखळत विचारले.

"बाळ सुद्धा पूर्णपणे सुखरूप आहे, असे मी म्हणणार नाही. शस्त्रक्रिये-दरम्यानच त्याला बाहेर काढावे लागले आहे. मुलगा आहे. पण साडेसात महिन्याचा असल्याने त्याला सध्या दीड महिना 'एन.आय.सी.यू.' मध्ये ठेवावे लागेल. असे समजा त्याला दीड महिना परिस्थितीशी लढावे लागेल."

हे ऐकताच रोहनचे हृदय हलले.

"मी मानसीला भेटू शकतो का?" त्याने दाटलेल्या कंठाने विचारले.

"नाही, आत्ता नाही. तिला सर्जिकल वॉर्डमध्ये ठेवावे लागेल. प्रायव्हेट वॉर्डमध्ये 'शिफ्ट' केल्यानंतर भेटता येईल."

"आणि... बाळाला?"

"नाही रोहन, बाळाची तशी स्थिती नाही, त्याला जवळ घेण्यासाठी तुला दीड महिना वाट पाहावी लागेल."


काही तासांनी मानसी शुद्धीवर आली. दुसऱ्या दिवशी तिला खाजगी रुग्णकक्षात हलविण्यात आले.

रोहन मानसीला भेटला.

"रोहन… आपले बाळ?" तिच्या बोलण्यात तिला होणाऱ्या वेदना जाणवत होत्या.

" मुलगा झाला आहे."

"कुठे आहे तो?"

" सध्या इनक्युबेटरमध्ये आहे. लहान आहे ना, आपल्याला काही दिवस वाट पाहावी लागेल."

"पण रोहन, आपला बाळ वाचणार ना ?"

मानसीच्या प्रश्नाचे उत्तर रोहन देऊ शकला नाही.

--------------
एक एक दिवस सरत होता. रोहनला तो प्रत्येक दिवस एक वर्षासारखा भासत होता.

मानसी बरी झाली होती. तिच्या जीवाला असलेला धोका आता टळला होता. बाळ सुखरूप असले तरी त्याच्यावरचे संकट मात्र अजून दूर झाले नव्हते.

आणि शेवटी तो दिवस उजाडला.

डॉक्टरांनी बाळाला इनक्युबेटरमधून बाहेर काढले.

"रोहन, तुम्ही माझ्याबरोबर या. तुम्ही आता बाळाला पाहू शकता."

हे शब्द ऐकताच रोहन धावत गेला. डॉक्टरांनी त्याला एका पाळण्यात असलेला बाळ दाखवला. खूपच गोंडस असा तो बाळ हात हलवत खेळत होता.

रोहनने आपली करंगळी त्याच्या हातात दिली. बाळाने ती घट्ट पकडली. त्या इवल्याश्या हाताच्या स्पर्शाने इतके महिने अडवून ठेवलेले अश्रू रोहन आता थांबवू शकला नाही.

"डॉक्टर, मी उचलू शकतो का याला?" रोहनने रडत रडत डोळे पुसत विचारले.

डॉक्टरांनी काहीही न बोलता हसऱ्या चेहऱ्याने होकारार्थी मान हलवली.

रोहनने अलगद बाळाला उचलले. त्याला आपल्या छातीशी धरले आणि तेजगतीने सरळ मानसीपाशी आला.

त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.

"मानसी... बघ. माझा मुलगा. माझ्यासारखाच स्ट्राँग आहे. जिंकला!" असे म्हणत त्याने रडत रडत बाळाला मानसीकडे दिले.

बाळाला आपल्या कुशीत घेताच तीही रडू लागली. मोठ्या समाधानाने रोहनने मानसीच्या खांद्यावर आपले डोके ठेवले.