सनईच्या सुरात गुपित...भाग 6
सायलीच्या मनात एक कल्पना चमकली.
"अनिरुद्ध आपण रामकृष्णजींच्या कुटुंबाबद्दल माहिती शोधूया कदाचित त्यांच्या घरच्यांना काही माहीत असेल."
अनिरुद्धने मान डोलावली.
"हो ते योग्य ठरेल."
सायली आणि अनिरुद्ध यांनी थोडी माहिती गोळा केली आणि रामकृष्ण देशमुख यांच्या घरच्यांचा शोध घेऊ लागले.
रामकृष्णजींना एक भाऊ होता नरेंद्र देशमुख. तो आजही त्यांच्या गावी राहायचा तिथेच जिथे रामकृष्ण लहानाचा मोठा झाला होता.
त्यांनी लगेच त्या गावाला जायचं ठरवलं.
त्या संध्याकाळी सायली आणि अनिरुद्ध एका साध्या शांतशा गावात पोहोचले. तिथलं वातावरण निवांत होतं, सगळीकडे शांतता पसरली होती पण जुन्या आठवणींचं गूढ तिथे अजूनही होतं.
नरेंद्र देशमुख यांच्या घरासमोर एक मोठं वडाचं झाड होतं. अनिरुद्ध आणि सायली तिथे पोहोचताच एक मध्यमवयीन गृहस्थ बाहेर आले.
"तुम्ही कोण?"
अनिरुद्धने पुढे होत सांगितलं,
"आम्ही सरस्वती देशमुख यांचे मुलं आहोत. आम्हाला रामकृष्ण देशमुख यांच्या विषयी काही विचारायचं आहे."
नरेंद्रजी काही क्षण त्यांच्याकडे बघत राहिले मग त्यांनी त्यांना घरात बसायला सांगितलं.
"रामकृष्ण माझा मोठा भाऊ होता. तो खूप मोठी मोठी स्वप्न बघायचा, समाजासाठी झटायचा पण त्याच्या आयुष्यात एक मोठी दुःखाची गोष्ट होती."
"सरस्वतीआई बद्दल?" सायलीने विचारलं.
नरेंद्रजी हसले.
"हो... दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे पण त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा आणि समाजाचा विरोध होता मग सरस्वतीचं दुसऱ्या कुणाशी लग्न झालं आणि रामकृष्णने स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं."
"पण त्यांच्या मृत्यूबद्दल लोक काहीतरी वेगळंच बोलतात..." अनिरुद्धने संभ्रम व्यक्त केला.
"हो, लोक बोलतात... पण कुणाकडेच ठोस पुरावे नाहीत."
नरेंद्रजींच्या डोळ्यात एक वेगळीच वेदना होती.
"पण हो रामकृष्णने मरण्याच्या आधी एक पत्र लिहिलं होतं."
"पत्र?"
नरेंद्रजींनी कपाटातून एक जुनं पाकीट काढलं आणि सायलीच्या हातात दिलं.
"त्याच्या मृत्यूपूर्वी मला हे मिळालं होतं. पण मी ते कधीच उघडून पाहिलं नाही."
सायलीने हळुवार हातांनी जुन्या पत्राचं पाकीट उघडलं. आत एक पिवळसर पडलेली चिठ्ठी होती, जिचे कोपरे वाकलेले होते. तिने पत्र बाहेर काढलं आणि वाचू लागली.
प्रिय नरेंद्र,
माझ्या आयुष्यातील काही सत्यं मी आज तुझ्यासोबत शेअर करतोय. कदाचित मी हे तुला प्रत्यक्ष सांगू शकलो असतो पण परिस्थितीने मला गप्प बसायला भाग पाडलं. सरस्वती आणि मी आम्ही दोघांनी एकमेकांवर मनापासून प्रेम केलं पण आमचं नातं समाजाला आणि घरच्यांना मान्य नव्हतं. तिला दुसऱ्या कुणासोबत लग्न करावं लागलं आणि मी आयुष्यभर मनात वेदना घेऊन फिरलो.
पण खरी गोष्ट वेगळी आहे. सरस्वतीच्या लग्नाच्या काही दिवस आधीच तिचा नवरा मयूर देशमुख याने माझ्याशी भेट घेतली होती. त्याने मला बजावलं होतं जर मी सरस्वतीच्या आयुष्यात पुन्हा शिरलो तर त्याचे परिणाम भयंकर होतील. मी त्याला गांभीर्याने घेतलं नाही पण पुढे जे घडलंq ते हादरवून टाकणारं होतं.
सरस्वतीच्या लग्नानंतर काही महिने उलटले आणि एके रात्री तिचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी आली. लोकांनी सांगितलं की ती पायऱ्यांवरून घसरून पडली पण मला कधीच हे सत्य वाटलं नाही. काहीतरी गडबड होती, काहीतरी दडवलं जात होतं आणि आता मला वेगळ्याच गोष्टीची जाणीव होतेय...काय खरं काय खोटं हे जाणून घ्यायचं होतं.
मी माझ्या मरणाच्या जवळ पोहोचलोय नरेंद्र. काही दिवसांपासून कुणीतरी माझा पाठलाग करतंय. रात्री माझ्या घराबाहेर हालचाली होतात, कुणीतरी मला बघतंय कदाचित हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचेल कदाचित नाही. पण जर मी अचानक मेलो तर समजून जा ही एक नैसर्गिक घटना नसेल.
रामकृष्ण
सायलीच्या हातून पत्र थरथरत्या बोटांनी गळून पडलं. तिने आणि अनिरुद्धने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं.
"म्हणजे रामकृष्णजींचा मृत्यू साधा अपघात नव्हता... कुणीतरी त्यांचा जीव घेतला होता?" अनिरुद्धने दबक्या आवाजात विचारलं.
नरेंद्रजींच्या डोळ्यात दाटलेले अश्रू चमकले.
"मी हे पत्र कधीच उघडून पाहिलं नव्हतं... पण आता बघतोय, तर लक्षात येतं की रामकृष्णला खरंच धोका होता."
"आणि तो मयूर देशमुख कोण होता?" म्हणजे बाबा..? सायलीने विचारलं.
"हो पण त्याचंही काही वर्षांनी अचानक निधन झालं. लोक म्हणायचे की तो व्यसनाधीन होता आणि त्याच्या तब्येतीमुळे तो गेला. पण आता वाटतंय या दोघांच्या मृत्यूमध्ये काहीतरी संबंध असावा."
सायलीने अनिरुद्धकडे पाहिलं.
"आपल्याला अजून शोध घ्यायला लागेल. या मृत्यूंच्या मागचं सत्य बाहेर काढायलाच हवं."
आणि तिथेच त्या जुन्या वडाच्या झाडाखाली एका गूढ प्रवासाला खरी सुरुवात झाली...
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे ईरा फेसबुक पेज वर येतील त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा