Login

फक्त चार दिवस सुनेचे? भाग १

सासरी सून फक्त चार दिवसाची पाहुणी नसते.
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद लेखन

फक्त चार दिवस सुनेचे? भाग १

©® एकता माने

गावच्या जुन्या पद्धतीनं अजूनही बऱ्याच घरांत मोठ्या थाटामाटात लग्नं व्हायची. वऱ्हाडी मंडळींच्या गर्दीत, गावभर दिवसभर गडबडीत, तासनतास चालणाऱ्या जेवणावळींमध्ये तर एक वेगळाच उत्साह दडलेला असतो. अशाच गडबडीत सरपंच नाना पाटलांच्या घरातला एकमेव मुलगा विक्रम याचं लग्न ठरलं.


“नाना, आपली नवीन सून जेव्हा या घरात येईल तेव्हा आपलं घर उजळून जाईल. बघितलं तर असे किती दिवस राहिले आहेत लग्नाला! लग्नाच्या कामाची गडबड होणार आहे.” असं सगळ्या बायका एकमेकींना सांगत होत्या.

लग्नाच्या आधीपासूनच गावी चर्चा होती की पाटलांची सून म्हणजे सोन्याचीच. कारण मुलगा विक्रम तर शहरात इंजिनिअर होता आणि त्याच्यासाठी घरच्यांनी पसंत केलेली मुलगी ही उच्चशिक्षित होती. अनाया हे नाव ऐकूनच गावातल्या बऱ्याच मुलींना हेवा वाटत होता.

लग्नाच्या आदल्या दिवशी गावभर सगळीकडे दिवे, सजावट तर होतीच आणि सोबतीला ढोलताशांचा गजरही सुरू होता. विक्रमच्या बहिणी, आत्या, चुलत भावंडं सगळे आनंदात नाचत होते. विक्रमही त्यांच्यासोबत अगदी आनंदी होता.

अनायाच्या घरचे सगळेच खूप खूश होते. तिचं सासर म्हणजे गावातील प्रतिष्ठित घराणे, गावामध्ये त्यांना खूप मान होता. विक्रमही दिसायला देखणा, घरच्यांच्या संस्कारात वाढलेला, सगळ्यांचे ऐकणारा मुलगा म्हणून आपल्या मुलीसाठी तिच्या घरच्यांनी विक्रमला पसंत केले.

अनायाचे आईवडील लहानपणापासूनच शहरात राहत होते त्यामुळे अनाया पण शहरामध्ये लहानाची मोठी झाली. तिला पहिल्यापासूनच शहरात राहण्याची सवय होती; पण सुट्टीला ती आवर्जून गावी येत होती आणि गावात आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत आनंदाने राहत होती.

अनाया आपल्या आई-वडिलांची खूप लाडकी होती. लहानपणापासूनच तिच्या घरात तिचे खूपच लाड झाले. तिच्यावरही योग्य ते संस्कार झाले होते त्यामुळे आपल्या आई-वडिलांना दुखावण्याचा कधी विचार तिच्या मनात आला नाही. तिने तसंही आपल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले होते त्यामुळे तिच्या मनामध्ये दुसरे कोणीही नव्हते म्हणून तिने घरच्यांनी आणलेल्या स्थळाला होकार दिला.

दोन महिन्यांपूर्वीच त्या दोघांच्याही बघण्याचा कार्यक्रम झाला होता. शहरातून तिच्या आई-वडिलांसोबत ती गावी आली होती. दोघांचीही जोडी एकमेकांना पूरक अशी होती त्यामुळे घरच्यांनाही जोडी आवडली. त्या दोघांना एकमेकांसोबत बोलण्यासाठी बाहेर अंगणात पाठवण्यात आले. विक्रम आणि अनाया दोघेही बाहेर अंगणात जाऊन शांत बसले होते. दोघांचीही ही पहिलीच भेट असल्यामुळे एकमेकांसोबत काय बोलावे त्यांना सुचत नव्हते.

“तुला गावात राहायला जमतं का?” विक्रमने सहजच हसून तिच्याकडे पाहून तिला विचारले.

ती गडबडली होती.

“मी... मी शहरातच वाढले; पण प्रयत्न करेन. मला नाती टिकवायला आवडतात.” अनायाने चेहऱ्यावर हसू आणत त्याला उत्तर दिले.

त्याच्या डोळ्यातला तो विश्वास पाहून तिनं होकार दिला. घरच्यांच्या आग्रहाखातर ती लग्नाला तयार झाली; पण मनाच्या आत कुठेतरी तिला हळूहळू अस्वस्थता जाणवू लागली होती.

‘मुलगा जरी शहरात राहत असला तरी त्याचा पूर्ण परिवार गावी राहतो त्यामुळे आपल्यालाही जर गावात राहायला लागले तर? आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेता येईल का? आपल्या घराप्रमाणे विक्रम आणि त्याचे घरचे आपल्याला सांभाळून घेतील का?’ असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले.

क्रमशः
©एकता माने
0

🎭 Series Post

View all