" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "
जलद लेखन
फक्त चार दिवस सुनेचे ? भाग २
©® एकता माने
लग्नाचा दिवस आला. अनाया लाल रंगाच्या साडीत, खूप सारे दागिने अंगावर चढवून मंडपात उभी राहिली. खरंतर तिला एवढे सगळे दागिने घालण्याची सवय नव्हती; परंतु गावांमध्ये असे दाखवण्याची रीतभात असल्यामुळे तिच्या घरच्यांनीही तिच्यासाठी बनवलेले सगळे दागिने तिला घालायला दिले होते. तिच्या चेहऱ्यावर थकवा लपवता येत नव्हता; पण डोळ्यांतलं स्वप्न अजूनही जिवंत होतं, एक सुंदर संसार उभा करण्याचं...
“बघा! काय गोड दिसतेय पाटलांची सून!”
“वा! सोन्याहून पिवळी दिसतेय.” गावातल्या सगळ्या लोकांमध्ये कुजबुज चालू झाली. जो तो कुतूहलाने तिच्या रूपाला निहाळत होता. मंगलाष्टकांसाठी दोघेपण एकमेकांच्या समोर उभे होते. त्यांच्यामध्ये अंतरपाट पकडण्यात आले होते आणि गुरुजी मंगलाष्टके बोलत होते. मंगलाष्टके संपली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या आणि पतीपत्नी म्हणून आयुष्याची सुरुवात झाली.
विक्रमने तिच्यासाठी बनवलेले पाच तोळ्याचे मोठे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातले. आधीच दागिन्यांच्या ओझ्याला ती त्रासलेली. अजून एक दागिना पाहून खरंतर तिच्या मनामध्ये वेगळेच भाव निर्माण होऊ लागले; पण मंगळसूत्राचे खरे महत्त्व तिलाही माहीत होते आणि आज तिच्या गळ्यातही तो दागिना आला होता त्यामुळे या दागिन्यासोबत आलेली जबाबदारीही आपण पूर्ण मनापासून पार पाडायची, असा तिने मनोमन विचार केला.
पहिल्या दिवशीच अनायाला जाणवलं की हे घर खूप वेगळं आहे. मोठा वाडा, आतल्या दारांतून येणारे आवाज, शेतातली कामं, आजीची कडक शिस्त, सासूबाईंचं सततचं बोलणं, हे सगळं तिच्या शहरातल्या लहानशा फ्लॅटच्या दुनियेपेक्षा खूपच वेगळं होतं.
“सूनबाई, उद्या सकाळी चार वाजता उठायचं हं! घरात पहिल्या दिवशी लक्ष्मी आली की लवकर उठते असं म्हणतात.”
सासूबाईंचं बोलणं ऐकून ती हसत होकार देत होती; पण मनात विचार करत होती, ‘चार वाजता? हे जमेल का मला?’
दुसऱ्या दिवशी सकाळी तिला गजर वाजल्यावर कसंबसं उठावं लागलं. शहरामध्ये कधी अशाप्रकारे न वावरणारी ती आज डोक्यावरून जड घुंगट ओढून अंगणात उतरली. तिथं आधीच सासूबाई आरतीची तयारी करत होत्या.
“सूनबाई, देवळात दिवा लाव आणि नंतर स्वयंपाकघरात चल. आज पहिले स्वयंपाक तुझ्या हातचा असायलाच पाहिजे. नवीन सुनेने गोडाचं जेवण बनवण्याची परंपरा आहे आमच्या घरी.”
अनाया थोडी नर्व्हस झाली; परंतु मनामध्ये एक जिद्द होती. अनायानं मन घट्ट करून सगळं केलं; पण सासूबाई प्रत्येक गोष्ट नीट बघत होत्या. तिच्या प्रत्येक हालचालीकडे त्यांचे बारीक लक्ष होते.
“अगं, पोळी गोल नाही झाली.”
“भाजीमध्ये मीठ कमी पडलंय.”
सासूबाई तिच्या प्रत्येक कामामध्ये काही ना काही चूक शोधून काढत होत्या आणि तिला लगेच सांगत होत्या. अनायाला दडपण आल्यासारखं वाटू लागलं. त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटू लागले. अनायाच्या डोळ्यात पाणी आलं. विक्रमही तिकडेच काही अंतरावर बसलेला असल्यामुळे त्याला बहुतेक तिची अवस्था समजली असावी.
तो तिच्या जवळ आला आणि हलकेच म्हणाला,
“काळजी करू नकोस, हळूहळू शिकशील. मला पोळी अगदीच छान वाटली.”
“काळजी करू नकोस, हळूहळू शिकशील. मला पोळी अगदीच छान वाटली.”
तो आधार तिच्यासाठी अनमोल होता.
क्रमशः
©एकता माने
©एकता माने
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा