Login

फक्त चार दिवस सुनेचे? भाग ३ (अंतिम भाग)

सासरी सून ही फक्त चार दिवसाची पाहुणी नसते.
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद लेखन

फक्त चार दिवस सुनेचे ? भाग ३ (अंतिम भाग)

©® एकता माने

तिसऱ्या दिवशी गावातले सगळे नातेवाईक घरी आले. अंगणात गप्पांची मैफल रंगली. कुणी तिला बघून कौतुक केलं तर कुणी दोष काढले.

“सूनबाई थोडी बारीकच आहे वाटतं, शेतात काम कसं करेल?” काही गावातली माणसं तिच्याकडे पाहून कुजबुज करत होती.

“अगं, ही शहरातली पोरगी. गावचं रितीरिवाज कितपत पाळेल कोण जाणे.” काही बायकांच्या तोंडातून तिला अशी वेगळी वाक्यंही ऐकायला मिळाली.

हे शब्द तिच्या कानावर पडत होते. तिला खूप अपमानास्पद वाटत होतं. ती घराच्या मागच्या खोलीत जाऊन बसली. डोळ्यांतून अश्रू ओघळले.

“अनाया…” विक्रम शांतपणे आत आला होता.
त्याला पाहून तिने गडबडून आपल्या डोळ्यांमधले अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला; पण तरीही तिच्या चेहऱ्यावरची नाराजी मात्र ती लपवू शकली नाही.

“तू का इतकी काळजी करतेस? अरे लोकांचं तर असंच काम असतं ना. ते प्रत्येक गोष्टीला नावच ठेवत असतात. मला तुझ्यावर विश्वास आहे. तू हळूहळू सगळ्यांना आपलंसं करशील.”

त्याच्या प्रेमभरल्या शब्दांनी तिच्या मनाला धैर्य मिळालं; पण तरीही मनामध्ये कुठेतरी प्रश्न निर्माण होत होते की ‘खरंच! आपलं हे नवीन आयुष्य आपल्याला पहिल्यासारखं तितक्याच आत्मविश्वासाने जगता येईल का ? हे घर, या घरातली माणसे आपली होतील का?’


आता हा लग्नानंतरचा चौथा दिवस होता. सकाळीच अनायाच्या आईचा फोन आला. अनाया आपल्या आईसोबत फोनवर बोलत असताना तिच्या आवाजातली उदासी आईने बरोबर हेरली.

“बाळा, तू ठीक आहेस ना? खूप थकलेली वाटतेस आवाजावरून.”

अनायाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं.

“आई, सगळं नवीन आहे. मला खूप जड जातंय; पण... मी निभावून नेईन.” अनायाने आपल्या शब्दांनी स्वतःच्या मनाला आणि आईला धीर देण्याचा प्रयत्न केला.

“मलाही माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. समोर कोणताही प्रसंग असो ती त्याच्यामधून नक्की मार्ग शोधेल.” आईने पण आपल्या शब्दांनी तिच्या धीराला बळ दिले.

पण त्या दिवशी एक वेगळीच घटना घडली. सासूबाईंनी अनायाला दुपारी बोलावलं. दुपारची वेळ असली तरी घरातली सगळी मोठी माणसं मधल्या अंगणामध्ये जमली होती. सगळ्यांना असे एकत्र बसलेले पाहून अनायाच्या मनामध्येही वेगळे विचार येऊ लागले. बिचारी आतून थोडी घाबरली; पण चेहऱ्यावर तसे काहीही न दाखवता सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहिली.

“सूनबाई, तू फार प्रयत्न करतेस हे दिसतंय. खरं सांगायचं तर मलाही तुझ्या मनाचा थांग घेता आला नाही. मला वाटलं होतं, शहरातली मुलगी म्हणजे घरात टिकणार नाही; पण तुझ्या डोळ्यांतली प्रामाणिकता पाहून मला खात्री झाली, तू आमच्या घराची खरी लक्ष्मी आहेस. तू प्रत्येक गोष्ट जागतीने आणि आत्मविश्वासाने करून दाखवते ना, तेच खरं कौतुकास्पद आहे.” सासूने समोर येऊन सगळ्यांच्या समोर तिचे कौतुक केले.

“हो सूनबाई. आम्हालाही असेच वाटले होते की शहरातली मुलगी आहे म्हटल्यावर ही गावाकडच्या वाड्यात राहायला नकार देईल; पण तुझ्याकडून मिळालेला होकार ऐकून खरंच तुझ्याबद्दल मनामध्ये आदर निर्माण झाला.” विक्रमचे आजोबा हसून तिच्याकडे पाहत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत उत्तरले.

“खरंतर शहर, गाव असे काहीही नसते. जर एका मुलीने जिद्द पकडली तर ती कुठेही आपला संसार अगदी व्यवस्थित, सुखाने आणि आनंदाने करून दाखवू शकते. तू या गोष्टीचं अगदी सुंदर उदाहरण आहेस. लहानपणापासूनच शहरात वाढलेली तू गावामध्ये चार दिवसही राहणार नाहीस असे सगळ्यांना वाटत होते; पण तू सगळ्यांच्या मनातले हे विचार धुडकावून लावले आणि अगदी आत्मविश्वासाने आणि सुंदर पद्धतीने या घराला तसंच या घरातल्या प्रत्येक माणसाला आपलेसे केले.” अनायाची आजीसासूही प्रेमाने तिचे कौतुक करू लागली.

हे ऐकताच अनायाच्या डोळ्यांतून येणारे अश्रू थांबले नाहीत. तिला पहिल्यांदाच वाटलं ‘हो, हे घर माझं होऊ शकतं.’ तिने या घराला आपलंसं करण्याचा प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे केला होता आणि त्याचे फळ तिला आज मिळत होते. तिच्या मनात असलेल्या सगळ्या शंका दूर झाल्या आणि मन आनंदाने भरून पावले.

विक्रमही तिकडे उभा राहून आपल्या घरच्यांचं सगळं बोलणं ऐकत होता. सोबतच अनायाच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होता.

तो अनायाच्या जवळ आला आणि हसत म्हणाला,
“मग ठरलं. फक्त चार दिवस सुनेचे नव्हे बरं, तर आता आयुष्यभर या घराची खऱ्या अर्थानं कन्या झाली आहे माझी बायको.”


घरात येणारी सून ही ‘फक्त चार दिवसाची पाहुणी’ नसते, तर तिलाही हक्कानं त्या घराचा भाग मानलं गेलं पाहिजे. तिच्या प्रयत्नांना, तिच्या भावनांना ओळखायला हवं. कारण सासरचं घर तिला फक्त चार दिवस सुनेचं न राहता, आयुष्यभरासाठी तिचं स्वतःचं घर बनवायचं असतं.

अनायाने पूर्ण विचार करून विक्रमसोबत ठरलेल्या आपल्या नात्याला होकार दिला. तिने जिद्दीने आणि आत्मविश्वासाने घरातल्या माणसांचे मन जिंकून घेतले. घरी आलेली सून ही घराची खरी गृहलक्ष्मी असते हे तिने तिच्या वागण्यातून सिद्ध करून दाखवलेले.

समाप्त.
©एकता माने ( संघ कामिनी )
0

🎭 Series Post

View all