Login

सासूचा मुलगा

सासूचा मुलगा आधी आईचा बाळ असतो...
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

लघुकथा स्पर्धा

©® एकता माने ( संघ कामिनी)

सासूचा मुलगा

गावातल्या त्या जुन्या वाड्यात संध्याकाळचा मंद प्रकाश पसरलेला होता. अंगणात मांडवाला लागून झोपाळ्यावर बसलेली मंगला, आपल्या डोळ्यांतले पाणी पुसत होती. तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि तिचा मुलगा, अभिजीत, दुसऱ्या बाजूला. आपल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिने आपल्या मुलालाच सर्वस्व मानून त्याच्यासाठीच आयुष्य जगत होती.

मुलाच्या लग्नाला तीन वर्षं झाली होती. स्वाती सून म्हणून त्यांच्या घरात आली. सुरुवातीला घरात हसणं-खेळणं होतं; पण जसजसा काळ गेला, तसतसे मंगला आणि स्वातीमध्ये वाद होऊ लागले. अभिजीत दोघींमध्ये अडकून जायचा.

’माझ्या मुलाकडे आता दोन शब्द आपल्या आईसोबत बोलायलाही वेळ नसतो. सगळ्यांसोबत नेहमी बोलून चालून असणारं माझं बाळ; पण आईला मात्र आता परकी समजायला लागलाय का?’ एक दिवस रात्रीच्या वेळी बाहेर हॉलमध्ये बसून मंगला स्वतःशीच विचार करत होती.

त्या वेळी अभिजीत घरात आला. ऑफिसमधून दमलेला दिसत होता.

"आई, जेवण झालं का? खूप भूक लागलीये." अभिजीतने आपल्या आईकडे पाहून तिला विचारले.

"झालं रे बाळा... पण आधी हात-पाय धुऊन घे, मी वाढते तुला." मंगलाने त्याच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करत उत्तर दिले.

स्वातीने स्वयंपाकघरामधूनच त्यांचा आवाज ऐकला तशी ती पटकन बाहेर आली.

"अभिजीत, अरे मी गरम गरम चपाती बनवत आहे. तू पटकन फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी तुझ्यासाठी ताट करते." स्वाती हसून त्याच्याकडे पाहून पटकन म्हणाली.

मंगलाच्या डोळ्यांत क्षणभर चटका लागला. पूर्वी जी जबाबदारी ती निभवायची, ती आता दुसरी कोणीतरी निभावत होती. ती विचार करत काही वेळ तशीच बसून राहिली.

दिवस पुढे सरकत होते. सुनेच्या बोलण्यात नेहमीच नकळत टोचणी असायची आणि ती तिला सातत्याने जाणवायची.

"आई, आज तुम्ही डाळीत मीठ घालायला विसरलात. मी परत करून आणते." एक दिवस जेवण खात असताना मधेच स्वातीने तिच्याकडे पाहून तिला सांगितले.


"अगं, थोडं कमी-जास्त झालं तर चालेल ना..." मंगलाने शांत चेहऱ्याने तिच्याकडे पाहून तिला उत्तर दिले.

"असं नाही आई, त्याला म्हणजे अभिजीतला आवडत नाही. त्याला सगळं परफेक्ट हवं असतं." स्वातीही तिच्याकडे पाहून हसून म्हणाली.

मंगला गप्प झाली. 'त्याला' हा शब्द तिला खूप बोचला. तिचा मुलगा आता फक्त 'स्वातीचा नवरा' झाला होता.

एका रात्री मंगला अंगणात बसलेली असताना, शेजारची आजी आली.

"मंगला, काय गं, चेहरा एवढा उतरलाय तुझा? काही बरं नाही का?" आजीने तिच्याकडे पाहत काळजीने विचारले.

"आजी, मुलगा माझ्या डोळ्यांसमोरच आहे; पण जणू दूर गेल्यासारखा वाटतो. आता तो फक्त 'सासूचा मुलगा' उरलाय, माझा बाळ राहिलाच नाही. आपल्या आईसाठी त्याच्याकडे आता क्षणभरही वेळ नाही." मंगला डोळ्यांतून पाणी काढत आजीला सांगू लागली.

एका दिवशी अभिजीत ऑफिसला जायला निघत होता. मंगला धावत आली.

"बाळा, आज थोडं लवकर परत ये. माझी डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे, मला घेऊन चलशील का?" मंगलाने उत्सुकतेने आपल्या लेकराकडे पाहून विचारले.

अभिजीत काही बोलणार तेवढ्यात स्वाती तिथे आली.

"अरे नाही रे, आज आपल्याला माझ्या मैत्रिणीकडे डिनरसाठी जायचंय. आई, तुम्ही टॅक्सीने जाऊ शकता ना? ते काय आहे ना, मला माझ्या मैत्रिणीला नाही असे बोलता येणार नाही. तर आम्हाला वेळेवर पोहोचायला पाहिजे ना." स्वातीने लगेच तिच्याकडे पाहून तिला उत्तर दिले.

अभिजीत आईकडे पाहून गप्प झाला.

'ज्याने पहिले पाऊल टाकायला शिकवलं, आज त्या पावलांना आधार द्यायला याला वेळ नाही.' मंगलाच्या मनामध्ये विचारांची गर्दी निर्माण झाली होती.

दिवसेंदिवस हे अंतर वाढत गेलं. अभिजीत दोघींतल्या तणावाला घाबरून बहुतेक वेळ शांत बसायचा; पण एक दिवस मात्र घरात मोठं वादळ आलं.

स्वातीला माहेरी जायचं होतं.

"पाहिलंस का, माझ्या आईला पण तू किती वेळा भेटतोस; पण तुझी आई मात्र रोज तुझ्या मागे लागलेली असते. खरंच, काही आई स्वतःच्या मुलाला कधी मोकळं जगू देत नाहीत." स्वाती आपल्या मनातले विचार त्याला सांगू लागली.

मंगला तिकडून जातच होती की हे सगळे शब्द तिच्या कानावर पडले. तिच्या मनाला जबरदस्त धक्का बसला.

"स्वाती, मी तुझ्या संसारात कधी लुडबुड केली का? मी कधी तुझ्या आयुष्याला अडथळा ठरले आहे का? इतक्या दिवसांत मी कधी तुमच्या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न केला का? तरीही तू माझ्याबद्दल असे विचार करत आहेस." मंगलाने थरथरत्या शब्दांमध्ये तिला जाब विचारला.

"आई, तुम्हाला समजत नाही. आम्हालाही थोडं स्वतःचं असं आयुष्य हवं असतं." स्वाती उदास चेहरा करून म्हणाली.

यावर मंगला काही बोलली नाही. ती शांतपणे आपल्या खोलीमध्ये निघून गेली आणि दरवाजा बंद करून बसली. अभिजीतला मात्र त्या दोघींचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं.

त्या रात्री अभिजीत आईजवळ आला.

"आई, तुला वाईट वाटलं का? स्वातीला तसं म्हणायचं नव्हतं." अभिजीत हळू आवाजात आपल्या आईजवळ म्हणाला.

"बाळा, मी आयुष्यभर फक्त तुझ्यासाठी जगले. तुझं सुख पाहिलं, तुझं दुखणं सहन केलं. आज तुझ्या आयुष्यात नवीन माणसं आली आहेत, हे मलाही ठाऊक आहे; पण एक गोष्ट लक्षात ठेव, संसार कितीही मोठा झाला तरी आईची सावली कधी लहान होत नाही." मंगलाने अश्रू गाळत त्याच्याकडे पाहून त्याला सांगितले.

अभिजीत गप्प झाला. त्याला अपराधी वाटू लागलं. आपल्या आईने आपल्याला वाढवण्यासाठी किती कष्ट केले ते सगळे दिवस त्याला आठवू लागले.

काही दिवसांनी अचानक मंगला आजारी पडली. तिला रुग्णालयात दाखल केलं गेलं.

"तणाव आणि एकटेपणा, हेच आजारपणाचं मोठं कारण आहे. तुम्हाला जास्त काळजी घेणं गरजेचं आहे." डॉक्टरांनी एक नजर अभिजीतकडे पाहून त्याला सांगितले.

अभिजीतला हे ऐकून थोडं अपराधी वाटलं. रुग्णालयाच्या बेडवर पडलेली मंगला, चेहऱ्यावर हलकेसे हसू घेऊन मुलाकडे बघत होती. यावर अभिजीतने ज्या नजरेने स्वातीकडे पाहिले, तिला त्याची नजर आणि त्याच्या मनाची अवस्था समजली.

"बाळा, मी काही दिवस जगले तरी पुरे; पण माझी फक्त एक इच्छा आहे, तू कधीही तुझ्या आईला 'ओझं' समजू नकोस." मंगला हळू आवाजात आपल्या मुलाकडे पाहून म्हणाली.


"आई, मी चुकीचं वागलो. तुझं प्रेम, तुझा त्याग मोजता येणार नाही. मी फक्त 'स्वातीचा नवरा' नाही, मी आधी तुझा मुलगा आहे. मी तुला वचन देतो, तुझं स्थान माझ्या आयुष्यात कुणी घेऊ शकणार नाही." अभिजीतने प्रेमाने आपल्या आईचा हात हातात घेतला आणि हळव्या स्वरात तिच्याकडे पाहून म्हणाला. हे बोलत असताना त्याच्या डोळ्यांतही अश्रू आले.

त्या दिवसानंतर घरातल्या वातावरणात बदल झाला. स्वातीही थोडी मवाळ झाली. मंगलाने सुनेला खऱ्या आईसारखं जवळ केलं. हळूहळू घर पुन्हा हसण्याने भरलं.

आईचं नातं अनमोल असतं. संसार, जबाबदाऱ्या, नाती बदलली तरी आईचं स्थान कायम अविचल राहतं. मुलगा आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असो; पण तो सगळ्यांत आधी 'सासूचा मुलगा' नसून 'आईचा बाळ' असतो.

समाप्त
© एकता माने
0