सासू सून – एक ज्वलंत प्रश्न
हा एक त्रिकालाबाधित प्रश्न आहे. मुलाचं लग्न होई पर्यन्त सर्व चांगलं असतं. सर्वच संवाद प्रेमळ असतात. पण लग्न झाल्यावर काही दिवसांतच नव्याची नवलाई संपते आणि मग कोल्ड वॉर सुरवात होते. यामध्ये मुलगा जाम वैतागतो. आमच्या मुलांचं लग्न झाल्यावर आमच्याकडे सुद्धा असं घडण्याचा चान्स होताच. यावर मी एक तोडगा शोधून काढला आणि तो यशस्वी पण झाला.
लग्न झाल्यावर साधारण आठ दहा दिवसांनी मी मुलाला आणि सुनेला समोर बसवलं. अजून कोल्ड वॉर ला सुरवात व्हायची होती. मी त्यांना सांगितलं की या घरातल्या जेवढ्या जुन्या वस्तु आहेत त्या बदलून टाका. म्हणजे टीव्ही, फ्रीज, ओव्हन, मिक्सर् वगैरे, घरातले पडदे, पलंग सोफा सगळं. वसंत राव देशपांड्यांचं ते गाणं आहे न, या भवना तील सुर पुराणे जाऊद्या, हवा नवा तो नूर. त्या प्रमाणे तुमची अरेंजमेंट करा.
या सगळ्या गोष्टीवर आमची छाया आहे. आजपर्यंत तुम्ही आमच्या छायेत राहिलात. तुमची सर्व काळजी आम्ही घेतली, आता तुमची पाळी आहे. आता आम्ही तुमच्या छायेत उर्वरित आयुष्य जगणार. इथून पुढे तू मुख्य मंत्री आणि आम्ही प्रजा.
खरं सांगतो, सगळा सीनच बदलून गेला. बायको थोडी नाराज झाली, म्हणाली, आपण काडी काडी करून इतकं सारं जमवलं आणि तुम्ही खुशाल बदलून टाका म्हणालात. पण मी तिला समजावलं की सर्व गोष्टी एकदम बदलणं शक्यच नव्हतं, आणि तशाही हळू हळू बदलल्याच गेल्या असत्या. मी फक्त न मागताच ग्रीन सिग्नल दिला. तिलाही पटलं. पांच वर्ष झालीत. आम्ही नागपूर सोडून पुण्याला मुलाकडेच आलो आहोत. आणि सर्व सुरळीत चालू आहे.
चॅप्टर संपला.
दिलीप भिडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा