Login

स्मशानातील पाठलाग भाग १

Smashanatil Pathlag
चॅम्पियन ट्रॉफी 2025 जलदलेखन

स्मशानातील पाठलाग - भाग १

अमावस्येची ती काळी रात्र होती. दूरवरून कुत्र्यांचा आवाज भयाण वाटत होता. आज सकाळीच शेजारच्या रमाकाकूंची अंत्ययात्रा घरासमोरून गेली होती. राव्हल्याच्या नाकावर, कपाळावर आणि नुकत्याच फुटलेल्या मिशीवर घामाचे थेंब दिव्याच्या प्रकाशात चमकत होते. भीतीमुळे राव्हल्या आजही दिवा लावूनच झोपला होता. त्याने अंगावर पांघरूण घेतले आणि सकाळीच उठायच्या निर्धाराने कुत्र्यांप्रमाणे अंगाला एकटवून तो झोपी गेला. गुडघे छातीजवळ घेऊन त्याने भीतीला मुठीत पकडले होते.

मध्यरात्री अचानक..

"किर्रर्रर्रर्रर्र..." दरवाजाचा हलकासा आवाज त्याच्या कानांवर पडला. राव्हल्या घाबरून दरवाजाकडे धावला.

"कोण आहे?"

"कोण आहे तिकडे?"

त्याच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. दरवाजाच्या बाहेर डोकावत त्याने पाहिले.

"समोर तर, झिपरी."

झिपरी (सुरेखा) ही राव्हल्याची प्रेयसी होती.

"ये झिपरे, तिकडे कुठे निघालीस?"

"स्मशानात. तुला काय करायचंय?"

"अय झिपरे, उगाच एवढ्या रात्री कुठे जाऊ नकोस."

"थांब गं, मी पण येतो!" म्हणत राव्हल्या तिच्यामागे धावत सुटला.

झिपरी स्मशानाच्या दिशेने वेगात पळत होती.

"अगं, थांब वेडे!"

"अय झिपरे, थांब की गं!"

"तू नको येऊस इकडे राव्हल्या!"

"अगं, थांब म्हणतोय मी तुला!"

पाण्याच्या पाटातून, शेतातल्या बांधावरून झिपरी पळत होती आणि राव्हल्या तिच्यामागे धावत होता. झिपरी एका खांबाजवळ येऊन थांबली. राव्हल्याच्या छातीची धडधड बरीच वाढली होती. गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून, मान जमिनीकडे झुकवून तो दम घेऊ लागला.

"अरे, दमलास का रे जाड्या?" झिपरीने टोमणा मारत पळ काढला.

राव्हल्या पुन्हा तिच्यामागे,
"थांब झिपरे, थांब झिपरे..." असे म्हणत धावत होता.

स्मशान आता फार दूर नव्हते. राव्हल्याची तिच्यामागे दमछाक होत होती, तरीही तो ओरडून सांगत होता.

"अरे झिपरे, तिकडे स्मशानाचा रस्ता आहे. तिकडे कुठे पळतेस?"

"भीतोस का रे जाड्या?" झिपरी टोमणा मारत पळत होती.

गाव ओलांडून दोघे गावाबाहेर आले. स्मशानाजवळ येऊन झिपरी थांबली आणि खाली बसली. तिने मान खाली घालून केस पुढे सोडले. राव्हल्या धापा टाकत हळूहळू तिच्याजवळ आला. त्याचा आवाज अडखळत होता.

"झिप...रे, अगं किती पळवलंस...!"

"मी फक्त तुझ्यासाठी इथे आलोय गं. खूप प्रेम आहे गं तुझ्यावर आणि अशी भुतासारखी मान खाली घालून का बसलीस? हं?"

राव्हल्याने तिचा हात हलवला, "हं... हं..."

"भीती दाखवतेस काय? चल घरी?" राव्हल्याने तिला पुन्हा हलवले.

तिने मान वर करून मोठी किंकाळी फोडली.

"येssssss..." आणि ती मोठमोठ्याने हसू लागली.
राव्हल्या मागे फेकला गेला.

"ही तर आपली झिपरी नाही...!"